( साकीवृत्त )
महिमा साध्वीचा परिसा, गातां उद्धरितो हरिसा. (धृ.)
होता कौशिक विप्र क्रोधी, अतिवृद्ध, गलितकुष्टी,
तन्मन सती धराया न शके, पार्याला जसि मुष्टी. (१)
निधिला लुब्ध तसी फ़ार जपे, परि तो उगाचि गांजी.
चित्तींहि सति न म्हणे, ‘ छळितां दोषावांचुनि कां ? जी ! ’ ॥२॥
बहुबेभत्सहि साध्वीला दे पतिचें न वपु त्रास.
प्रेमभरें प्रतिपाळी जैसी जननी नव पुत्रास. ॥३॥
तो स्त्रीस म्हणे, ‘ मार्गीं जातां आजि निरखिली गणिका,
ती मदनाग्निज्वाळाझाली, माझी धृति घृतकणिका. ॥४॥
त्वत्कर तिच्या प्रसादार्थ तिला तत्प्रिय बहुविध वाहो,
नाहीं तरि आतांचि मला जळ सोडुनि, तूं विधवा हो ’. ॥५॥
त्या संकटीं तिचें तीस म्हणे व्रतपुण्य, ‘ न कांपो हे. ’
बुडत्याहि जडा वाहुनि, नौका जलधींत न कां पोहे ? ॥६॥
स्कंधीं स्थापुनि पतिला, माथां वाहुनि अर्थ, निघाली,
नि:शंक तमीं साध्वी जैसी तत्पतिबुद्धि रिघाली. ॥७॥
लागे पाय तयाचा शूलप्रोता मांडव्याला
जेंवि अकस्मात् आसन्नमरण - करगत कांड व्याला. ॥८॥
‘ जेणें चाळविलें मज शूळीं, जो निर्दय बहु पापी,
सूर्योदय होतांचि मरो तो, ’ मुनिपति ऐसें शापी. ॥९॥
मुनिच्या शापें कांपे साध्वी जैसी वातें कदली,
‘ पाहों बरें, कसा रवि उदया येतो ! ’ ऐसें वदली. ॥१०॥
उगवेनाचि सतीच्या तेजें देव तपन कांपविला,
मग भंगील अशा साध्वीचें दिव्य तप न कां पविला ? ॥११॥
व्याकुळ करी महासंकट तें गुरुतें सशतमखातें.
मुनिही म्हणति, ‘ जगा बुडवाया, रविचें यश तम खातें. ’ ॥१२॥
विधिला विनउनि शक्र म्हणे, ‘ हा न घडो प्रलय अकाळीं,
व्हावीं आम्हां लोकपतींची अयशें मुखें न काळीं. ’ ॥१३॥
ब्रह्मा म्हणे, ‘ अमर हो ! तेजें तेज, तपें तप शमतें;
गमतें भय वारिल अनसूया निजसुकृतें विश्वमतें. ’ ॥१४॥
कंजज, हरि, हर सकळ दिगीश्वर, मुनि झले एकवट,
सुरगण मार्कंडेयचि, अत्रिपरिग्रह तो एक वट. ॥१५॥
सर्वांतेंही पूजुनि सुखवी, जैसी भगवल्लीली,
देइल देवांच्या लाज न कां बहु ती मग वल्लीली ? ॥१६॥
अनूसया बोले, ‘ न मला गा, निजकरुणापर मा गा;
आलां ज्याकरितां, तो, सोडुनि शंकेला, वर मागा. ’ ॥१७॥
देव म्हणति, ‘ सूर्योदय व्हावा, आम्हां दे हाच वर;
शोभउ तुज्या व्रता यश, जैसें सत्प्रभुदेहा चवर. ॥१८॥
‘ समजाउनि कौसिकपत्नीतें, करित्यें तुमच्या कार्या. "
कथुनि असें, स्वपतिमतें भेटे शीघ्र तिला ते आर्या. ॥१९॥
मातेनें सुखवावी, अर्पुनि निजसर्वस्वा, दुहिता,
अनसूयेनें तसि तोषविली, करुनि कथा स्वादु हिता. ॥२०॥
तीस पुसे, ‘ होतें कीं पतिमुख सुखद सदा नवनवसें ?
नैमिषनंदन पतिपदचि, वरुनि इतर कदा न वन वसें. ॥२१॥
सकळांही देवांहूनि अधिक मानिसि कीं तूं पतितें ?
पतिसेवा जें कांहीं देती, नेदी सुरभे सति ! तें. ॥२२॥
सुकृतार्ध सुखें पदरा, भजतां पतिपदसारस, येतें;
पतिभजनेतर जें जें, न म्हणसि कीं तूं सार सये ! तें ? ॥२३॥
पतिसेवेचा अद्भुत महिमा, मज आला अनुभव हो !
जीचा जो पति, तो तो बाई ! साक्षात् नरतनु भव हो ! ’ ॥२४॥
ऐसें परिसुनि, ती विप्रस्त्री बहु सुख पावे, डोले;
ओले प्रेमाश्रुभरें गल्लस्तन करुनि, असें बोले. ॥२५॥
‘ माते ! वाढविली त्वां माजी श्रद्धा, झालें धन्या;
स्त्रीला या लोकीं परलोकीं गति पतिच, नसे अन्या. ॥२६॥
आर्ये ! कवणा कार्योद्देशें आलीस ? महाभागे !
काय करूं ? वद, अतिथिभजनरत मद्देह न हा भागे. ’ ॥२७॥
ती तीस म्हणे, " हे ब्रह्मादिक देव मजकडे आले,
देनयज्ञव्यवहारविलोपें सर्व व्याकुळ झाले. ॥२८॥
म्हणुनि तुजकडे आल्यें, चालो व्यवहार जसा पहिला;
लोक तमाला भ्याले, दर्दुरमूषक जैसे अहिला. ’ ॥२९॥
विप्रवधू वदली, ‘ माझें धन, जीवन, सर्व स्वामी;
शापें भस्म न व्हाया वेचिन तनुसह सर्वस्वा मीं. ॥३०॥
‘ रविच्या उदयीं मरशील ’ असा मांडव्याचा शाप
प्राण हरिल, न चुकेलचि, बाई ! जेंवि दुखविला साप. ’ ॥३१॥
अनसूया तीस म्हणे, ‘ मी हें कार्य तुजें पथकरित्यें,
तुझिया सौभाग्या भय कांहीं नाहींच; शपथ करित्यें. ॥३२॥
मतिमति ! सति ! पति अतिविश्वास्सें माज्या हातीं दे हा;
विसरतिल लवों नित्य निरखितां याच्या पातीं देहा. ॥३३॥
उगवो रवि, पावो, पावोनि त्रास, तिमिर विलयातें;
जग रक्षुनि, यश साधीं; साधुसभा सति ! मिरविल यातें. ॥३४॥
दे आज्ञा रविला, न उगवतां गेले याम अशीती. ’
धरुनि हनु, करी अत्रिवधू बहुमानें साम अशी ती. ॥३५॥
आज्ञा दे, स्वस्थ बसे, होतां अनसूया जामीन,
गंगेनें कर देतां, कां न म्हणेल भया ‘ जा ’ मीन ? ॥३६॥
होतां अभय, चढे उदयशिरीं, आक्रमुनि नभा, सविता,
साधु म्हणति, ‘ विश्वास सतीमहिमाचि, रवि न भासविता. ’ ॥३७॥
पावे त्रिशंकुसा तो रविच्या उदयीं सहसा पतन;
न पडों दे अनसूया, गाधिजदृष्टि जसी, करि जतन. ॥३८॥
त्या समयीं अत्रिकलत्र म्हणे, ‘ अति अधिक, न इतर मला;
माजा आत्मा जाणुनि पतिपदभजनीं बहु हित रमला; ॥३९॥
हें जरि सत्य, तरि न हा कौशिक विप्र मरो, हो रुचिर;
शुचि रत्नाकर पुण्यगणांचा स्त्रीसह नांदो सुचिर. ’ ॥४०॥
यापरि अनसूयेनें करितां बहु सुकृतामृतवृष्टी,
ब्राह्मण उठला, द्युतिनें मोही देवांच्याही दृष्टी. ॥४१॥
केली सुकुसुमवृष्टि सुरानीं, वाजविलीं बहु वाद्यें;
स्तविली सकल त्रिदशांहीं, त्या सर्वांच्याही आद्यें. ॥४२॥
देव प्रसन्न होउनि म्हणती, ‘ अनसूये ! वर मागें,
कोणाचेंहि असें नायकिलें यश विस्मयकर मागें. ’ ॥४३॥
त्यांसि म्हणे अनसूया, ‘ म्हणतां जरि मजला वर सति ! घे;
विधिहरिहर ! हो द्या मज, होउनि मत्सुत, सुख सरस तिघे. ’ ॥४४॥
ते प्रभु विधिहरिहर, ‘ मागितला तुज दिधला वर ’ म्हणती.
ऐसी गुरुता देउनि जातां, कां न करितिल प्रणती ? ॥४५॥
ती अनसूयेसि म्हणे, ‘ कन्या मीं, कौशिक जामाता;
सत्या तूं, त्या दाया जाल्या, असतिल मज ज्या माता. ’ ॥४६॥
कौशिकहि, करुनि वंदन, ऐसें मागे मुख वासून,
‘ बाई ! पुत्रचि मानुनि जन हा, हेही सुखवा सून. ’ ॥४७॥
सुखउनि त्या दोघांसि; सती ती स्वाश्रमपदासि आली;
विश्वसृग्निश्वंभरविश्वेश्वरजननी मग झाली. ॥४८॥
चंद्र चतुर्मुख, दत्त दानवांतक, धूर्जटि दुर्वासा;
कविगणगणपतिशिरीं कीर्तिसह पंचमूर्ति दुर्वा सा. ॥४९॥
मोह ग्रासित होता ज्याला, अर्कासि जसा राहू,
केला मुक्त अलर्क प्रभुनें, अर्जुन दशशतबाहू. ॥५०॥
जैसा सेतु समुद्रीं केला प्रख्यात श्रीरामें,
तैसा योगपथ श्रीदतीं स्वपदाश्रितहितकामें. ॥५१॥
तो तो गुरु गणिला, योगोचित गुण जेथें आढळला;
ज्याचा दास न कल्पांतींही पावुनि सुपदा ढळला ॥५२॥
भजती भोळे भाविक भावें श्रीमद्दत्ताला जे,
काळहि किंकर - सा, दावाया त्यांला सत्ता लाजे. ॥५३॥
नित्यत्वें निगमहि दत्ताच्या दासांसचि मानवले;
मानव, लेख, इतर सारेही काळाचे कानवले. ॥५४॥
उपसंहार
भक्तमयूरमुदिर दत्तानें केला ज्या उपदेश
त्या मानवले मानव, लेख, ब्रह्मादिहि सुपदेश. ॥५५॥