साधुरीति

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीची आवडि न तसी हरिस, जसी नित्य साधुरीतीची.
न सुधा सुकविबहुमता; ऐसी नाहींच माधुरी तीची. ॥१॥
कोणी साधु म्हणे, ‘ हो ! दासी चुकली, क्षमा कर, सोडा.
वृत्ति न चालेल इची, न इचे, माझेचि, पाय हे तोडा ’. ॥२॥
अनता अपवित्राही साधु हित, जसा नता पवित्रास.
साधु सुहृत् सर्वांचा, कोणासहि दे न ताप, वित्रास. ॥३॥
खळ निंदी; साधु रडे; पुसतां ‘ यास्तवच मीं ’ म्हणे ‘ रडलों;
नरकीं पचेल निंदक, या दु:सह दु:खसागरीं पडलों. ’ ॥४॥
हुरडा घेतां ताडी, पाडी, देवूनियांहि जो गाळी,
साधु इनाम करुनि दे सेत, सुता तातसा, तया पाळी. ॥५॥
लाजे, विरे बहु स्त्री, जीचा सध्वनि सरे अधोवायु,
तत्संकोच नुराया, साधु बधिरसाचि होय, जों आयु. ॥६॥
त्याचा होय ब्राह्मण जन, लग्नीं बहु गृहस्थ जो अडला.
परिचित करी महत्व प्रकट, म्हणुनि, साधु खळखळां रडला. ॥७॥
सुत सांपडला, वधिला, करितां धनिकाचिया गृहीं चोरी.
बहु हरिजन साहित्यें हर्षे; हे साधुरीतिची थोरी. ॥८॥
‘ न्यावी सामग्री, स्त्री मज अर्पावी, ’ असें वदे वाणी.
तर्पुनी हरिजन हर्षे, साधु करी साच आपुली वाणी. ॥९॥
निर्धनमित्रस्त्रीनें, वधिला, पचवावयासि नग, बाळ.
साधु न तन्मन दुखवी. याहुनी यश अन्य काय न गबाळ ? ॥१०॥
ठक हरिजन होय, वधी वित्तार्थ स्त्रीस, रगडितां पाय.
साधु समाधान करी त्याचें; न म्हणे मनांतही ‘ हाय ! ’ ॥११॥
स्त्री हाणी पोतेरें, त्याच्या दीपीं वळूनि दे वाती.
साधु म्हणे, ‘ तारावी; न बुडो दुरितें मळूनि देवा ! ती. ’ ॥१२॥
मृतपुत्रश्वशुर पुसे, ‘ रडतां ज्ञाते तुम्हीं कसे स्वामी ? ’
साधु म्हणे, ‘ वाटाया तुजचि समाधान रडतसें बा ! मीं. ’ ॥१३॥
चोरांनीं गृह लुटितां, निरुपम हर्षासि होय तें मूळ.
साधु ग्रामीं वांटी शेषधनाचा घरोघरीं गूळ. ॥१४॥
नि:सीम छळ सोसी, पोसी, सत्वासि, संकटीं धीट.
साधु म्हणे, ‘ याचक हा जन्मोजन्मीं असो, नसो वीट. ’ ॥१५॥
शतपुत्रक्षय होतां, साहे नि:सीम शोकतापातें.
साधु न दे शापातें; जाणे तन्मूळ पूर्वापापातें. ॥१६॥
एकत्र नग्न सुप्त स्वस्त्रीपरपुरुष मंदिरीं पाहे.
साधु तयांतें झांकी; परहृदयक्लेश नच मनीं साहे. ॥१७॥
‘ चोंटांत तुझा गुरु ’ या खळवचनें दु:ख मानितां मोटें,
साधु म्हणे, ‘ बा ! आहे बहु सत्पुरुषांत, काय हें खोटें ? ’ ॥१८॥
दुष्टें गाळी देतां, शिष्य म्हणे, ‘ यासि ताडितों स्वामी ! ’
साधु म्हणे, ‘ घेत नसे, देतो; बा ! जाणतों भला या मीं. ’ ॥१९॥
तोवि सिधा द्याया ये, शिष्य न घे, गुरु म्हणे, ‘ अरे ! पाहें
वाइट तें मद्वचनें घेवुनि, घेसी न कां बरें बा ! हें ? ’ ॥२०॥
छळितां पाठी लागे जें भस्म करावयासि वक्रातें.
साधु म्हणे, ‘ विप्राच्या भंगें जें मज नकोचि, चक्रा ! तें. ’ ॥२१॥
मातेचे पाय जसे, छळ करित्याचे तसेचि जो पाहे.
साधु निवे, नच कोपे, न दुरुक्तक्षोभ मानसीं राहे. ॥२२॥
भोजन दे चोरांला, आदर आग्रह करी स्वयें मोटा.
साधु प्रसन्नचित्तें बांधुनि लागे वहावया मोटा. ॥२३॥
रीति न कोणाचीही, या अतितर सरळ रीतिसीं, तुकली.
साधु म्हणे, ‘ तस्कर हो ! घ्या तुमची एक आंगठी चुकली. ’ ॥२४॥
आंगावरि नित्य थुके; एके दिवसीं न त्या खळा पाहे.
तद्द्वाअरीं साधु उभा, तें तद्रत चालवावया, राहे. ॥२५॥
फ़िरफ़िरुनि मुते, पादे, उघडी ठेवूनि मस्तकीं, गांड.
साधु म्हणे, ‘ जन हसवुनि, रिझवुनि, धन मेळवू, सुखें भांड. ’ ॥२६॥
नरकींचे वदले, ‘ बा ! सुख निकट उभा असोन, दे बा ! तें. ’
साधु म्हणे, ‘ हेंच बरें; जें स्वर्गींचें असो न देवा ! तें. ’ ॥२७॥
जे जीव पतित नरकीं,  ते पुण्यें उद्धरूनियां सर्व,
साधु स्वर्गा गेला, ज्याच्या चित्तीं न लेशही गर्व. ॥२८॥
जों जों प्रायश्चित ब्राह्मण, आग्रह करूनियां, देती,
तों तों साधुमनांत प्रीति; न चतुराननींहि नांदे ती. ॥२९॥
जो विष पाजी, भाजी, त्याच्याही नरकयातना चुकवी.
गाती सात्विकभावव्याप्त सदा साधुरीतितें सुकवी. ॥३०॥
प्रभुनें छळिला आंगें, सर्वस्व हरूनि, बांधिला छद्में;
परि साधुनें भुलविला प्रभु, अळि सौगंधिकें जसा पद्में. ॥३१॥
वाढवि अन्याणुगुणा साधु सदा, वायु जेंवि फ़ुणगीतें.
सुयशानें जरि साजे, लाजे परि फ़ार आत्मगुणगीतें. ॥३२॥
ज्यासह घडतें दैवें सहज पथीं चालणें पदें सात,
त्या ‘ मित्र ’ साधु म्हणती, देतीच व्यसनसागरीं हात. ॥३३॥
समजुनियां गर्भवती झाली, भ्याली उदंड रंडा, तें.
साधु म्हणे, ‘ घे माझें नाम; मुलि ! भिवुं नकोचि दंडातें. ’ ॥३४॥
गेली निघोनि, आली दुकळीं, घेवूनि ती पती पोरें;
साधु तिला प्रतिपाळी; गावी सद्रीति आदरें थोरें. ॥३५॥
कोणी बहु बोधेंही, सोडुनि सुक्षेत्र, आग्रहें जाय.
ज्याच्या शब्दें परते, साधु खराचेहि त्या नमी पाय. ॥३६॥
प्रणत जनाचें, जाया सिद्धिप्रति, सर्व योजिलें कार्य,
साधु मरण पथकरिती; ऐसी सद्रीति वर्णिती आर्य. ॥३७॥
दे अन्न अंत्यजां, जें केलें तर्पावयासि पितरांतें;
हें साधुशीळ दुर्लभ, लोकीं काळत्रयींहि, इतरांतें. ॥३८॥
अंत्यजतोक कडे घे उष्णीं, ज्या फ़ार लाळ सेंबुड, तें
अद्भुत सुकृत, न गातां साधूंची रीति, आळसें बुडतें. ॥३९॥
ज्याचीं चरणाब्जरजें ब्रह्मेंद्राद्यमरमस्तकीं लेणीं,
तत्प्रियसख साधु वळी, आपण पुरवावया मठीं, सेणी. ॥४०॥
निंदा, शापहि, घ्यावा, परि ‘ हरिस भजा ’ असेंचि सांगावें.
हें सछील त्यागुनि, कुशळें तीर्थादि अन्य कां गावें ? ॥४१॥
हस्तीं धन आलें जें, तें देवब्राह्मणांसि अर्पावें;
स्वापत्य तसें प्रेमें अन्नार्थि प्राणिजात तर्पावें. ॥४२॥
कृष्णीं प्रेम जयांचे, तव्द्यभिचारासही न लेखावें.
रेखावें साधुजनें हृदयीं; त्यांतें गुरुच देखावें. ॥४३॥
सद्रीति हे, अभक्ता जरि, तरि मातेसही न मानावें.
वानावें वेश्येसहि, भुलली जी काय ‘ राम ’ या नावें. ॥४४॥
साधु, प्राणी पाहुनि संसारीं तापले, असुख पावे.
‘ व्हावें जग मुदित ’ म्हणे, तद्दु:खें आपले असु खपावे. ॥४५॥
विषय विषचि बा ! हो हरिजन ! कां पा ! यांस भाळला जीव ?
विधि, विभुच्या, लावुनि हितजनकां, पायांस भाळ, लाजीव. ॥४६॥
कवि म्हणति, ‘ ज दुग्धगृहा - आंतुनि होवूनि खर्व ओतु निघे;
साधुसभेंत वस तसा, हरियश कर्णांत सर्व ओतुनि घे. ’ ॥४७॥
साधु अभयवर दिधले न कधींच, जसे करी, रद बदलती,
जसि सद्रीति जडांची, श्रीप्रभुजवळि न करी, रद बदलती, ॥४८॥
हे, दुर्मति - घूस करी रंध्रें बहु मानसा, धुरी तीतें;
यास्तव सर्वहि हरिजन देतिल बहुमान साधुरीतीतें; ॥४९॥

( श्लोक )

हे साधुरीति लिहिली मयूरें रामनंदनें.
या ग्रंथें पूर्ण साधूंचा हो जैसा काम नंदनें. ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP