अघ काय तुजपुढें ? बा ! तें तृणसें, तूं प्रदीप्तपावकसा;
देवा ! वाल्मीकिगुरो ! मज तारायास धांव, पाव कसा ! ॥५१॥
बा ! भवदनुग्रहेंचि ध्रुव बाळ ध्रुवपदासि तो पावे.
त्वां, तुज ‘ नमोsस्तु ’ म्हणतां, प्रणतां पुरुषार्थ सर्व ओपावे. ॥५२॥
बाळ प्रह्लादहि तो अहितोपद्रबशताब्धिला तरला.
तो त्वत्प्रसाद कीं मति झाली स्मरणीं न विष्णुच्या तरला. ॥५३॥
होतांचि तव अनुग्रह, हरिचा होतोचि नारदा ! साचा.
प्रभुनें केला आहे बहुमान तुझ्याचि फ़ार दासाचा. ॥५४॥
फ़िरसि सदा, उद्धरिसी प्राणी संसासंकटीं पडला;
अडला नुपेक्षिला त्वां. दीनजनोद्धार बहु तुला घडला. ॥५५॥
वदलासि यशें व्हाया सत्यवती जेंवि अदिति हा साजो.
फ़ार निवविला तोही त्वांचि, रची सुकवि सदितिहासा जो. ॥५६॥
गातों प्रभुसि यथामति; मजवरि तूं सुप्रसन्न, आइ कसी !
सद्यश वीणारा हो; वीणा राहोचि; कां न आइकसी ? ॥५७॥
अथवा गा तूंचि, जसें गासी ‘ श्रीराम ! कृष्ण ! राम ! हरे ! ’
भागवतमुखेंचि प्रभुनामश्रवणेंचि सर्व काम हरे. ॥५८॥
प्रेमें गातोसि महाभागा बा ! गा तसेंचि नाकर्षे !
भागवतगीतभगवत्सुगुणश्रवणेंचि चित्त आकर्षे. ॥५९॥
प्रभु भक्तगीतनिजगुण ऐके, मग तूंहि कां न आइकसी ?
बा ! बाळकवचनातें देती सप्रेम कान आइ कसी ? ॥६०॥
युक्ति शिकिव मज बा ! मीं गाय, नसे वानरा मना माया
काय करूं ? बहु माने गायनसेवा न रामनामा या. ॥६१॥
मातें तारावें हें वाटें आलेंहि जह्रि मना काम,
प्रभुचें मन सचिवाच्या पाहे, तव संमता तसें नाम. ॥६२॥
भागवत बरा वाटे, माझा उद्धार मानला आहे;
नाम मन प्रतिनिधिचें प्रभुच्या अनुमोदना तसें पाहे. ॥६३॥
भगवन्नाम तव मुखीं बा ! वास करो तसा दयालो ! हें
पावावा त्वच्चरनस्पर्शमणिवरप्रसाद या लोहें. ॥६४॥
प्रह्लाद व्याळाच्या दिगिभाच्या चुकविना रदास; मज
दे सत्व, तसें त्वद्यश हो, हें तूं सुकवि नारदा ! समज. ॥६५॥
प्रह्लादा ! गुरुसि रुचे जी बोले परम लाडिका वाणी,
मुनितें विनवुनि चिकटिव तच्चरणीं पर मला डिकावाणी. ॥६६॥
तुज गुरुचें, श्रीहरिचें दर्शन आहेचि सर्वदा साचें,
प्रभुनें कथिलेंचि असे पुरवाया इष्ट सर्व दासाचें. ॥६७॥
म्हणतां ‘ माग ’ विनविला त्वां प्रभु, जडजीव उद्धरायातें.
व्यासशुकप्रमुखसुकवि गाती यश परम शुद्ध राया ! तें. ॥६८॥
बा ! त्वत्पुत्र विरोचन, याचक सुर विप्रवेष हें कळलें,
तरि दे स्वायुष्य सुखें, स्वमनांत म्हणे, ‘ सुपुण्य हें फ़ळलें. ’ ॥६९॥
पुरवी शंकर सांगे जें स्वामीसाचि बाण पणतू तें,
धन्यतमा ! वर्णाया आहे कोणास जाणपण तूतें ? ॥७०॥
त्वत्सम अधिकहि वाटे प्रह्लादा ! पौत्र जो तुझा बळि तो,
तत्कीर्ति - सुरभि म्हणती, ‘ कवि अन्या कीर्तिधेनु कां बळितो ? ’ ॥७१॥
बळिला विनवूं कैसा ? सोडूनि तुला महाप्रभा वढिला,
प्रभु तव वचनें स्तंभीं प्रकटे; झाला न हा प्रभाव ढिला. ॥७२॥
अथवा बळिस विनवितों; वाटे निपटचि लहान हें कार्य,
तुजचि कसें मीं सांगों ? जैसा प्रभुवर तसाचि तूं आर्य. ॥७३॥
बा ! बळि ! उद्धरिव कसा, सांगुनि सद्वारपाळका मातें,
कार्य निरोपेंचि करिल; न चुके सद्द्वारपाळ कामातें. ॥७४॥
तूं ब्रह्मण्य, ज्ञाता; दीनजनोद्धार हे प्रभुक्रीडा;
आयकिलें सुवदान्या ! नाहीं न म्हणोंचि दे तुज व्रीडा. ॥७५॥