महद्विज्ञापना १

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीरामभरतलक्ष्मणशत्रुघ्न ! महादयालु हो ! पावा.
ओपावा अभयवर प्रणतीं, दीनीं न सुज्ञ कोपावा. ॥१॥
श्रीयाज्ञवल्क्यशिष्यप्रवरमहाराजजनकवरकन्ये !
सदये ! वद, येइल, यश, मानेल प्रभुसि वच तुझें धन्ये ! ॥२॥
प्रभुच्या चरणवियोगें स्वात्मा तुज पोळला सुतनु ! ठावा.
माता म्हणेल काय ‘ स्वपदावरि लोळला सुत नुठावा ’ ? ॥३॥
वायुसुता ! आर्जविला त्वां दास्यें राम कंजनाभ वनीं.
स्तविली लोकेशांच्या अदितिशिवाशीच अंजना भवनीं. ॥४॥
तारावें दीनातें हे ! सदया मारुते ! मनावरि घे.
काय जडाहि प्रेरिल ताराया सागरीं न नाव रिघे ? ॥५॥
तूतें स्वसमसमर्थ प्रख्यात सकृप म्हणोनि आर्यातें
चिरजीवी करुनि प्रभु गेला ठेवूनि याचि कार्यातें. ॥६॥
नमितों पाय वसिष्ठा ! शरणागत जामदग्न्य हा बा ! मीं;
कामी, क्रोधी, लोभी, सांगुनि शिष्यासि, उद्धरा स्वामी ! ॥७॥
विश्वमित्रा ! तूंही गुरु, कीर्ति तुझीहि होय मुद्धारा;
आज्ञा करितांचि, करिल माझ्या श्रीरामचंद्र उद्धारा. ॥८॥
देतात गौतमा ! मज कामक्रोधादि हे खल त्रास.
‘प्रभु उद्धरिल ’ असें म्हण; आला प्रत्यय तुझ्या कलत्रास. ॥९॥
अत्रे ! अनसूये ! मजविषयीं दत्ता सुतासि सांगावें.
म्यां होउनि मुक्त सुखें नित्य तुम्हां सदयमानसां गावें. ॥१०॥
भीताभयदानस्वव्रत घटजमुने ! मनांत आठीव,
माझ्या उद्धाराचा श्रीरामातें निरोप पाठीव. ॥११॥
बा ! पाव जामदग्न्या ! रामा ! तूं शत्रुमृगकुळीं हरिसा,
मज तव गोत्रोत्पन्ना पीडिति कामादि नित्य हे अरि सा. ॥१२॥
न सुचे उपाय; झालें अरिषट्का चित्त वश्य पापा हें
सांग सुतासि, मजकडे तूं तरि हो सदय कश्यपा ! पाहें. ॥१३॥
सांग भरद्वाजा ! तूं, प्रभु वंदी तव पदासि सुतसा जो,
न करिल काय वचन ? तो पुण्ययशें उभयविश्वनुत साजो. ॥१४॥
माते अरुंधति ! तुवां मद्विषयीं एकदाचि बोलावें,
गुरुचें, गुरुपत्नीचें वचन सुशिष्यें समान तोलावें. ॥१५॥
प्रभुचा परम प्रिय तूं बंधु, सखा, सचिव, बहुकृपापात्र;
बा ! त्रस्त तुजसमचि मीं ‘ तारावा दीन ’ बोल हें मात्र. ॥१६॥
तुज सर्व साधु म्हणती श्रीरामपदप्रसादपात्रास
तूं परम धन्य. नाहीं काळापासुनि तुलाचि बा ! त्रास. ॥१७॥
धन्य प्रह्लाद, बळी असुरांत; निशाचरांत तूं धन्य,
अन्य प्रख्यात नसे. तव बंधु ज्येष्ठ पंडितमन्य. ॥१८॥
सुगळासि पांचवा, तुज वदली प्रभुबंधु कविसभा सावा,
इतराची काय कथा ? हा धर्मन्याय रविस भासावा. ॥१९॥
लंकेचें राज्य दिलें तुज यावत्काळ चंद्रमातरणी;
धरणीं तों रामकथा जोंवरि भवसागरीं महातरणी. ॥२०॥
भगवत्प्रसादभाजन बा ! जन तूं साधु पुण्यपदशील;
योग्य तुज प्रणताचा उद्धार; प्रभुसि कां न वदशील ? ॥२१॥
परमयशस्कर कीं हा दीनजनोद्धार तूं करिव, राज्या !
याचि यशातें पावो, प्रभु पावे तारितां करिवरा ज्या. ॥२२॥
भक्त श्रीरामाचा मीं, हा झाला जगांत बोभाट
ज्या प्रभुतें जो वर्णी सत्कार्य प्राकृताहि तो भाट. ॥२३॥
जरि न समुद्धरिला, तरि विश्वांत करील भंड हा नीच.
प्रभुकीर्तिस होय, परें करितां दासासि दंड, हानीच. ॥२४॥
न धरुनि शंका लंकानाथा ! वद ‘ जरिहि पतित, पाव नता;
श्रीरामा ! रुसवावी आदरिली ती न पतितपावनता. ’ ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP