नरहरिनामा पावे संत न सोनार दास - मान कसा ?
तरला, करुनि भवाचा अंत; नसो नारदासमान कसा. ॥७६॥
कान्होपात्र श्रीमद्विठ्ठलरूपीं समानता पावे.
तापत्रयें जन, यशा या पिवुनि अमृतसमा, न तापावे. ॥७७॥
बहु मानिती न कोई जे रोहिदास चर्मका मानें.
ते न पहावे; पाहुनि तपन पहावाचि धर्मकामानें. ॥७८॥
गावा, नच मानावा चोखामेळा महार सामान्य;
ज्याच्या करि साधूंचा चोखा मेळा महा - रसा मान्य. ॥७९॥
तारिति न कीर्तिच्या, जो न लवे, त्या मुसल - मानवा, नावा.
हर्षें सेखमहांमद भगवज्जन मुसलमान वानावा. ॥८०॥
गावें, नतपद्मांतें जो दे नि:सीम शिव, दिनकरा या.
पटु हित उपासकांचें, श्रीशिवदिन तेंवि, शिवदिन कराया. ॥८१॥
जो आत्मसुखसमुद्रीं मीन, जया म्हणति देवताबावा;
प्रेमा तत्पदपद्मीं, गुरुसद्मीं शिष्य तेंवि, राबावा. ॥८२॥
दावी, जसा प्रपंचीं, परमार्थींही प्रभाव संताजी.
वंश, जया पावुनि, घे ती आराम प्रभा वसंता जी. ॥८३॥
मोटा साक्षात्कारी मोराबा देव चिंचवडगांवीं.
सुरतरु कवींस म्हणतिल कीं, ‘ स्वयशें निंब, चिंच, वड, गावीं. ’ ॥८४॥
असती जरि जन पंडित, तरि, जनपंडित - समान ते नसती.
सौभाग्यें वैदर्भी अधिका, इतरांसमा न ते न सती. ॥८५॥
श्रीचक्रपाणिदत्तें क्षिप्र निवे जेंवि गज गदी शातें.
तेंवि निवाला शरणागत कोण स्मरुनि न जगदीशातें ? ॥८६॥
बहु शोभला शिवाजीबावा सद्वृत्तशुद्धलेण्यांत.
महिमहिलेच्या नाकीं मौक्तिकमणि साधुरूप लेण्यांत. ॥८७॥
निपतनिरंजनसूक्तिप्रति रंभा काय ? उर्वशी लाजे.
केले रक्त विरक्तहि, उरुशीला पात्र उर्वशीला जे. ॥८८॥
द्वारावती त्यजुनी, ये रात्रींतचि वरदराज डांकीरा.
भक्त गुरुहि अगुरु खळां, लिखितहि कागद जसा जडां कोरा. ॥८९॥
गावा त्रिलोचनाभिध, अखिलशुभगुणार्थिकल्पनग, वाणी.
हरिजनयशींच रमशिल तरि काय मना ! सुखासि मग वाणी ? ॥९०॥
कैलास शिवें, तैसा धन्य अचळचिद्धनें गड पनाळा.
या गा, यम, कंठाच्या तोडून करावया गडप, नाळा. ॥९१॥
जयरामस्वामीतें तारुनि, जो कृष्णदास संत तरे.
चित्ता ! वित्ता जैसा कृपण, स्मर तत्पदास संतत, रे ! ॥९२॥
देवू पुढें, बहु दिवस आपण मात्रा खलू, कदा साजे ?
ते शोभले, स्वपरगदहर नर भजले मलूकदासा जे. ॥९३॥
बा ! तुळसीदास न जरि बाल्मीकीसमान मानवा ! तुळसी
तरि, राम दूर कीं ती, ही उक्ति समा न मान वातुळसी. ॥९४॥
नेउनि भवजलधीच्या तो सत्तीरा मला, वितानातें
उभउ यशाच्या, प्रभुसीं जो हत्तीराम लाविता नातें. ॥९५॥
‘ अंतर जितुकें इछाभोजनदा आणि अग्रदा ’ साधु
‘ ज्या, अन्या ’ म्हणति; मना ! निजमळ, त्या स्मरुनि अग्रदासा, धु. ॥९६॥
ख्यात, तुकारामस्तुत, साधुसभाप्राणवल्लभ, लतीबा,
हृदया ! स्मर त्यासि; असो श्रीभगवद्भक्तजाति भलती बा ! ॥९७॥
गातां रंका बंका, होय क्षय सर्वथा महापंका;
लंकासंसृति, हरिजन हनुमान् म्हणतां, धरूं नये शंका. ॥९८॥
ताप न हरी, दिसे परि केवळ न वलक्षसा, लयाला जो
पावे, त्या चंद्रासम म्हणतां, नवलक्ष सालया, लाजो. ॥९९॥
बोले मधुर, मनोहर, मृदु, शाहसुसेननामक फ़कीर.
तेंवि न वाणीचाही, कंठीं नसतांहि लेश कफ़, कीर. ॥१००॥
बहु मानिला, स्वगुरुसा, संतत जसवंत संत संतानीं.
भगवज्जनीं जसें यश, औदार्यगुणें तसें न संतानीं. ॥१०१॥
शंभुसखीं धनदींहि न तें, जें निजवित्तज यश शिवरामीं.
भुललों यातें, जाणुनि निर्मळता, चित्तजय, शशिवरा मीं. ॥१०२॥
जें हृदय न द्रवेचि, श्रवण करुनि सुयश कूर्मदासाचें;
तें वश, दुर्दैवबळें, झालें कलिमंत्रिदुर्मदा साचें. ॥१०३॥
लाजविलेचि निजयशें दुग्धाब्धितरंग रंगनाथानें.
भक्ति ज्ञानें ज्याची मति पोषी, जेंवि अंगना थानें. ॥१०४॥
रामप्रसाद, ज्याचें ऋण हरि हरि; तत्सुकीर्तिं आलिकडे
आलि, कडे लंघुनि, मज गंगेची घ्यावयासि आलि कडे. ॥१०५॥
श्रीचित्रकूटवासी, स्तुत, मनसुकदास, पुण्यकथ नाकीं;
ज्याच्या स्त्रीच्या घाली, वारुनि ऋण, रामराज नथ नाकीं. ॥१०६॥
नमिला सद्भक्तिमय श्रीमदनंताख्य जो उपाध्याय.
मूर्त श्रीगीतेच्या अकराव्याचाचि तो उपाध्याय. ॥१०७॥
नमिले यमिलेखर्षभ अद्वैतानंदनामक स्वामी.
स्वामीव - क्षय होइल, येणें पावेन मामकस्वा मीं. ॥१०८॥
प्रह्लादप्रमुखाखिलहरिजनगुरुवर मुनींद्र नारद या
श्रीसन्मणिमालेचा मेरु, जयाच्या मनांत फ़ार दया. ॥१०९॥
भक्तप्रियवैकुंठप्रभुकंठीं रामनंदनें मोरें
हे श्रीसन्मणिमाला वाहिलि, वंदूनि, उत्सवें थोरें. ॥११०॥