पुण्यश्लोकशिखामणि, विठ्ठलपदभक्त, बोधला, गावा.
ऐशा प्रेमळ साधुस्मरणें, निजवस्तुशोध लागावा. ॥५१॥
नरसोजी रणखांब स्मर, कृत्यें त्यजुनि लक्ष; बा ! हुरडा
भक्षुनि, तदरींस म्हणे दत्त, नतोद्धारदक्षबाहु, ‘ रडा. ’ ॥५२॥
जो भक्तिसरित्पूरीं षडरींची सर्व वाहवी सेना;
रुचला मनास बहुतचि, तो, भगवद्भक्त, नाहवी सेना. ॥५३॥
सजणा नाम जयाचें, ज्या, गाती साधुजन, कसायास,
भगवान् पळहि न विसरे ज्यातें, विसरेन मीं कसा यास ? ॥५४॥
‘ पिंजारी ’ न म्हण मना, स्मर, जाया सर्व ताप, दादुस रे;
मत भक्तिच्या न, अधरीकृतकांचनपर्वता, पदा, दुसरे. ॥५५॥
बहु हरिहरिभक्तांच्या जपला आराधना धना जाट.
मोटे मोटे वर्णिति याचें यश, नृपतिचें जसे भाट. ॥५६॥
धन्या, मीराबाई, भगवज्जनवृदवर्ण्यकुलशीला;
प्रबला विभागिनी जी झाली श्रीला, तसीच तुलशीला. ॥५७॥
देवकिनें ओगरिल्या ताटीं नानाविधान्न जो विचडी;
तो, कर्माबाईची, मिटक्या देवूनि, भक्षितो खिचडी. ॥५८॥
भक्तांत भवांत, पुह्नां भेटि न व्हाया कदापि, वैरा गी
ज्याची निर्मी; ऐसा रामानंद प्रसिद्ध बैरागी. ॥५९॥
माया हे संसृतिची, जाळूनि सशोक तोक, बी, रमला
रामपदाब्जीं अलिसा; बहुमत सुमुदोक तो कबीर मला. ॥६०॥
कष्टें जोडुनि, देतो जेंवि सुता वल्लभा जनक माल;
भजन करी कबीर, न करुनि उणा वल्ल, भाजन, कमाल. ॥६१॥
जो संतत हरिहरिजनपदभजनामृत यथेष्ट पी, पाजी;
कोण असा जन, ज्याच्या हृदया तो मानला न पीपाजी ? ॥६२॥
साधु म्हणावे, म्हणती नर माधवदास साधु याला जे.
अतिसारीं ज्याचे पट न रमाधव दाससा धुया लाजे. ॥६३॥
सिजल्यात भक्षुनियां, मग उगळी जो सजीव मीनातें;
त्या नानकसिद्धसीं लाविन गुरुभक्त हेंचि मीं नातें. ॥६४॥
ताठो न मदें म्हणउनि, जो विनयमहीतळांत मान पुरी.
विष्णुपदीं विष्णुपदें जरि वाहे रसपदेंहि मानपुरी. ॥६५॥
‘ बहु सुप्रसन्न ’ म्हणतों, सुकवि म्हणुनि, ‘ सूरदास मजला हो. ’
प्रभु अल्पतुष्ट रत्नद शिव मुद्रमसूरदा समजला हो. ॥६६॥
भ्रमलें चित्त परस्त्रीसौंदर्यें बहु; पुह्नांहि अनय न हो;
या भावें, योगीश्वर चर्पट झाला स्वयेंचि अनयन हो. ॥६७॥
प्रभुदर्शनार्थचि नयनलोभ धरी बद्धपाद लोंबकळे;
कीर्तिभवन यवनहि मुनि, शालिगुण, विलोकितांचि लोंब, कळे. ॥६८॥
केशवदास महाकविसम, ‘ हा कविता सलक्षणा करितो, ’
ऐसें म्हणोनि कोणी दाविल ज्या, तदवतार बा ! तरि तो. ॥६९॥
साधु बिहारीलाल ख्यात करी ग्रंथ सप्तशत दोहा;
ज्या सुरभि म्हणति ‘ अर्थक्षीररस यथेष्ट रसिक हो ! दोहा. ’ ॥७०॥
सुविरक्तें बाजीदें प्रभुतें चिंतूनि संतत पठाणें
वैकुंठीं बैसविलें, करुनि जगीं धन्य संत तप, ठाणें. ॥७१॥
श्रीरुक्माण्णापंतें ज्या उत्तममध्यमाधमा त्रात्या
भवगदशमनार्थ दिल्या जोडुनि बहु कीर्तिवित्त मात्रा त्या. ॥७२॥
आनंदतनय अरणीकर शोभवि फ़ार कवन यमकांहीं.
तत्सूक्ति पाठ ज्याला, त्याचें पाहे न भवन यम कांहीं. ॥७३॥
विठ्ठलकविच्या भलता लंघूं न शकेचि चित्र - कूटातें.
प्रबळतरहि पर जेंवि श्रीरामनिवास - चित्रकूटातें. ॥७४॥
जडभरताहूनि उणें वैराग्यगुणांत न मनसारामीं.
त्याच्या अदेहभाना करितों ध्यानाहि नमन सारा मीं. ॥७५॥