रामजन्म अध्याय २ रा
रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.
येरे दिनी ऋषि समस्तहि नित्यकर्मै । सारुनि वेदविहितें उचिते स्वधर्मै ॥
आले त्वरा करुनि सर्वहि यज्ञशाळे । सन्मानिलें विनित होउनियां नृपाळे ॥१॥
जो जो स्थळी योग्य जेथे । शृंग क्रमे योजित तेथ तेथे ॥
यज्ञासि जे हव्य उचीत काळी । देऊनि ते पध्दति सांग पाळी ॥२॥
वेदमंत्रघोष विप्र सुप्रसन्न होउनी । गर्जती विशुध्दवर्ण चित्तवृत्ति देउनी ॥
परस्परे निजाक्षरे सुयुक्त सुस्वरध्वनी । अर्थयुक्त दावितां विशेष तोषले मुनी ॥३॥
भूपतीस थोर हर्ष दर्शनेंचि वाटला । याग सांग देखतां विशेष तोष दाटला ॥
कामना मनांत आजि पूर्ण लाभ लाभला । शिष्ट इष्ट होय की बृहस्पती भला भला ॥४॥
पुत्रविना परलोक नसे श्रुति निश्चित हेच वदे कुसरी हो ।
अंतरसाक्ष दयानिधि केवळ हा बिरुदे लटकी न करी हो ॥
आर्त चकोर मी शंभु सुधाकर वारिल दुस्तर मात खरी हो ।
भानुकुळी ध्वज तो आजआत्मज यापरिचा अनुताप धरी हो ॥५॥
घृत चरु तिल पात्री सांग वेदोक्त मंत्री ।
करिति यजन कुंडी विप्र जे अग्निहोत्री ॥
निघति अति विशाला सोज्वळा ज्वाळमाळा ।
हरुष बहु भुपाळा लक्षितां यज्ञशाळा ॥६॥
द्विजराज जसें शशिसूर्य तसे । तप भेदुनि जाय अकाश असे ।
जगती तर या सम साम्य नसे । नयनीतिलयांधिकुलोक पिसे ॥७॥
मांडलीक राय सर्व घेउनी उपायने ।
येति मंडपा सवे विशेष नाट्यगायने ॥
मेरि काहळा विचित्र नाद दुंदुभिस्वरी ।
अचाट भाट वर्णिताति गर्जती परोपरी ॥८॥
अष्टही दिशापतीस यज्ञभाग पावला ।
तुष्टला सुरेंद्र चंद्रसूर्यही सुखावला ॥
तृप्त भूमि जाहली फणा फणेद्र डोलवी ।
धन्य भाग्य योग्य की वसिष्ठ सर्व चालवी ॥९॥
धन्य ती ऋषीकुळे प्रवीण आणि निर्मळे ।
पूर्ण ते तपोबळे समुद्र तो जसा जळे ॥
काळ कांपतो छळे विरोष तेज आगळे ।
शासनासि मानिती दिवी भुवी रसातळे ॥१०॥
यज्ञकंकण करी नृपतीते । अंगनात्रय - विनीत - पतीते ॥
हव्य होमिति ऋषीसह जाणा । तोषला अनल तो सुरराणा ॥११॥
बोले ऋषी राजंनिधीस जाणा । यथार्थ पूर्णाहुति शीघ्र आणा ॥
योजूनियां युक्त पदार्थजाती । राया करी देत मुनी द्विजाती ॥१२॥
वाद्ये वाजविती गती विगतिची नृत्यांगना नाचती ।
घोषे वेद विशुध्द तीव्र पढती यंत्रे बळे सोडिती ॥
यज्ञाचे निघती सुधूम्त्र गगनी ब्रह्मांड ते भेदिती ।
गाती एक विचित्र कीर्ति पढती सद्रन्न वाखाणिती ॥१३॥
घेऊनि पूर्णाहुति आदराने । समर्पिती राजनिधीकराने ॥
तों यज्ञानारायणमूर्ति आली । प्रदीप्त होमांतुनियां निघाली ॥१४॥
वैश्वानराची तनु ईश्वराची । कीं वोतिली आकृति भास्कराची ॥
प्रसन्नवक्त्रे वर नाभिकारे । बोले करी ताट सदन्नभारे ॥१५॥
दिनकरवंशी मंडपा राजवर्या ।
सकळ विदित झाली वेदशास्त्रार्थचर्या ॥
करुनि यजनयागां इच्छिसी ज्या अभीष्टा ।
वरद तुज तथास्तु मानि तूं एकनिष्ठा ॥१६॥
भागत्रया करुनि पिंड तिघीस देणे ।
होती जगत्त्रयविभूषण पुत्र तेणे ॥
निर्दाळिती दनुज देव सुखी कराया ।
शीला तरे पदरजेंचि विचित्र राया ॥१७॥
शंभूसुखावह शिळा तरती समुद्री ।
नांदे सहस्त्र वरुषे अकरा सुभद्री ॥
देऊनियां वरद देव अदृश्य झाला ।
आश्चर्य वाटत असे ऋषिराजयांला ॥१८॥
वैचित्र याग परिपूर्ण अविघ्न ऐसा ।
योजी विभांड ऋषिराज निरोप जैसा ॥
रायासि बोलत वधूत्रय शीघ्र आणा ।
देऊं विभाग मग यागसमाप्ति जाणा ॥१९॥
अति चतुर गुणज्ञा राजसा राजभार्या ।
उचित वचन बोले त्यां त्वरा तो आचार्या ॥
न भरत पळ आल्या राजसा संनिधानी ।
जनपद निजहस्ते दूरि केलें प्रधानी ॥२०॥
कौसल्येप्रति राजसिंह पहिला दे पिंड हस्तांतरी ।
सौमित्रेसि दुजा प्रसन्न वदने दे आवडीने करी ॥
कैकेयीसि तिजा प्रसाद दिधला. सर्वत्रही लक्षिती ।
आली घारि मुखी धरुनि गगना गेली त्वरे मागुती ॥२१॥
हाणी कपाळ धरणीवरि हांक फोडी ।
वक्ष:स्थळी स्वकर मारुनि केश तोडी ॥
हा ! हा ! ह्मणोनि वरि नेत्र करुनि लक्षी ।
पक्षी नसे गगन केवळ अंतरिक्षी ॥२२॥
बोले वसिष्ठ अति स्पष्ट विचार राया ।
दोघीजणीस उचितार्थ असे कराया ॥
( द्या ईस अर्ध अपुला ) मग भाग तीते ।
देवोनियां बहुत तोषविले पतीते ॥२३॥
आनंद थोर ऋषिराय समस्त लोकां ।
नालोकिले श्रवणही न कदापि लोकां ॥
राजा ह्मणे शुभ मनोरथ आजि झाले ।
उत्तीर्ण नोहे तुह्मि जे उपकार केले ॥२४॥
सत्कारिले ऋषि समस्तहि आणि राजे ।
जे आलिया यश सहस्त्रगुणे विराजे ॥
ते पूजिले परम नम्त्र यथाक्रमे हो ।
जे शोभती तपविशेषपराक्रमे हो ॥२५॥
वंदूनि रायासि समस्त गेले । राजा ऋषीलागुनि वाक्य बोले ।
मी स्वामिंचा अंकित की जिवाचा । जैसा असे दास सदाशिवाचा ॥२६॥
मंत्राक्षता घेउनि हस्तकी हो । दीर्घस्वरे टाकिति मस्तकी हो ॥
यज्ञासि संरक्षक पुत्र राया । होती तथा विश्वहि उध्दराया ॥२७॥
क्वचित ब्रह्मचारी न पाहेचि नारी । गृहस्थाश्रमी एक सत्कर्मकारी ॥
क्वचित काननी एक एकांतवासी । चतुर्थाश्रमी एक राहे प्रवासी ॥२८॥
फळाहारी केव्हा क्वचित पयपानी मति धरी ।
क्वचित प्रत्याहारी कचित जलपर्णाशन करी ॥
क्वचित ध्यानी मौनी क्वचित वितरागी जनिं वनी ।
समाधानी ज्ञानी रमति हरि सर्वत्र नमुनी ॥२९॥
जया योग्य जें भोग्य देऊनि हस्ते । ऋषींची शते बोळवीली समस्ते ॥
नमस्कार साष्टांग घालूनि बोले । मशीं धन्य केले सुखे पूर्ण डोले ॥३०॥
बोले नृपाळ गुरुराज वसिष्ठदेवा । शॄंगीऋषी सहविभांडक गौरवावा ॥
यांच्या करें करुनि यज्ञविधान झाले । यांचे कृपेस्तव मला यश पूर्ण आले ॥३१॥
शृंग तथा ऋषिराज विभांडक यांसि वसिष्ठ वदे मृदु वाचे ।
यज्ञविषी प्रतिसूर्य तपोनिधि केवळ कीं निजभक्त शिवाचे ॥
राय यथाविधि पूजूनि बोलत मी शरणागत मानुनि साचे ।
होतिल पुत्र तदा परदर्शन वांछित वाक्य असो अभयाचे ॥३२॥
तथास्तु बोलोनि निजाश्रमातें । जाती द्विजाती हरिती श्रमाते ॥
राये प्रधानां सहअल्पलोकां । यथाविधि गौरविले विलोका ॥३३॥
यानंतरे दोन भरोनि मासा । तो वर्तला राणिवसा तमासा ॥
नृपांगनांची ह्रदयारविंदे । विकासली चित्रविचित्र छंदे ॥३४॥
कुळगुरु वदती अजआत्मजा । त्रय वंधूसि पुसा प्रिय शीघ्र जा ॥
वचन शिष्ट निरंतर बोलती । तदनुसार समस्तहि चालती ॥३५॥
गुरुमुखे असे वाक्य आदरे । नृप शिरी धरी मानुनी बरे ॥
निजमनांतरी बहुत आवडे । त्वरित चालिला कैकयीकडे ॥३६॥
शोभे सगर्भ बहु कैकयि राजकांसा ।
राजा पुसे प्रिय तुते वद सांडि चिंता ॥
माझेंचि राज्य इतरांसि वनासि धाडा ।
हा आवडे बहुत राजनिधी पवाडा ॥३७॥
वाटे वसिष्ठसह कष्टहि भूपतीला ।
यावीण आणिक दुजे न धरी मतीला ॥
भेदे उरी वचन लक्षणपूर्ण भाला ।
हा ! हा ! वदे कवण येउनि लाभ झाला ॥३८॥
गेला वसिष्ठसह जेथ असे सुमित्रा ।
जे पीयुषपरिस गोड शशांकवक्त्रा ॥
धांवे धरेवरि समर्पित सर्वगात्रा ।
आलिंगली दशरथे प्रियपद्मनेत्रा ॥३९॥
तोषोनियां पुसत तीस अवो सुमित्रे ।
संतुष्ट मी तुज अभीष्ट वदे पवित्रे ॥
हांसे वदे वडिल सर्व हि मी तयांची ।
होईन दासि पदसेवननिश्चयाची ॥४०॥
प्राणांपरीस मज वाटत गोड सेवा ।
याहून आन नलगे प्रभु देवदेवा ॥
वेदांतशास्त्रमुखसंमत जे प्रतिष्ठा ।
ते पाळिजे अति सुखावह एकनिष्ठा ॥४१॥
वंदूनि पाय मग मौन धरुनि राहे ।
संतुष्टचित्त पदपंकज लक्षिताहे ॥
ठेवोनियां अभयहस्त शिरी सतीते ।
देती आशीर्वचन इष्ट वसिष्ठ तीते ॥४२॥
विचित्रे पवित्रे अशी ब्रह्मपुत्रे । ऋषीराजेय लक्षिली पद्मनेत्रे ।
ह्मणे ईश्वरी आंकळे केविं माया । जिणें लाविलें विश्व काळक्रमा या ॥४३॥
धरुनि कर करे हो, चालती सत्वरे हो ।
तंव अभिनव लीला दाविली ईश्वरे हो ॥
नृपति दशरथाची ज्येष्ठ कांता, मृगाक्षी ।
रघुवर उदरी जो तोचि बाहीर लक्षी ॥४४॥
न साहे कौसल्ये सदन अथवा मंचक मनी ।
सुवस्त्रापुष्पाचे निकर उपभोगासि न मनी ॥
करी निद्रा जेथे जनपद नसे पादतळी ।
धरी मुद्रा मौनी ह्रदयकमळी राम कवळी ॥४५॥
नृपाळे ते काळी अति निकट जाऊनि नयनी ।
विलोकी तो जाया अतिसुखभरे भूमिशयनी ॥
ह्मणे वो कौसल्ये प्रिय परम उद्गार मज दे ।
निरीक्षी भूपाळा परि वचन कांहीच न वदे ॥४६॥
अत्यादरे धरुनि हस्तक हस्तकी हो ।
लावोनियां विमल मस्तक मस्तकी हो ॥
बोले प्रिये न वदसीच असोनि जागी ।
त्यागीन मी सकळ वैभव तूजलागी ॥४७॥
कौसल्येचा हेतु रामी बुडाला । मी माझे हा भाव सर्वे बुडाला ॥
अंतर्बाह्यी दाटला रामराणा । तर्केना जो वेदशास्त्रां पुराणां ॥४८॥
कैची कांताकांत ? मिथ्या उपाधी । राया वायां कां तूतेआधि बाधी ॥
मारी वैरी कामलोभादि भारी । विद्वतसंगे आपुले रुप साधी ॥४९॥
कर्णी वाणी ऐकतां लोकपाळे । मानी ऐसे मांडले कां कपाळे ॥
मोठी झाली भूतबाधा प्रियेते । कैसा हा हो मानवी धर्म ईते ॥५०॥
वदे राय मी पातलो कोण कार्या । पुसे डोहळे प्रीय मानूनि भार्या ॥
अभिप्राय तो दूरि टाकूनि मागे । वृथा कां कथा बोलसी या विरागे ॥५१॥
तुझे लग्न तै रावणे विघ्न केले । असो तेंचि भोगासि आले भुकेले ॥
पुढे काय होईल चर्या ? कळेना । मतिभ्रंश माते तुझा आकळेना ॥५२॥
आकर्णितां रावणमाता कर्णी । यथाक्रमे राघवकीर्ति वर्णी ॥
आला मुनी कौशिक पुण्यखाणी । ज्या वानिती देव मुनी पुराणी ॥५३॥
द्विजा दुर्बळाच्या गृही दुग्ध नाही । तदां आणिली धेनु मौल्येचि पाही ॥
अकस्मात ते कामधेनूच झाली । गृहा क्षीरसिंधूच घेवोनि आली ॥५४॥
प्रसंगे तसा विप्र कौशीक आला । करुं दास्यभावा अती शीघ्र चाला ॥
पुढे भासती कार्यसंभार नाना । ऋषी वाल्मिके गाइला जो तनाना ॥५५॥
धांवा सवेग शरकार्मुक शीघ्र आणा ।
संतोषवूं ऋषिगणां सकळांसि जाणा ॥
सत्कीर्ति शौर्य निजभूषण राजयाचे ।
यावीण ते धिक जिणे सहसा तयाचे ॥५६॥
स्पर्शे सुरेंद्र कपटे वधु गौतमाची ।
झाली शिळा जडतनू निबिडा तमाची ॥
ते उध्दरुं पदरजे स्वपदासि जाया ।
होईल योग्य ऋषिराजपदे भजाया ॥५७॥
अमित्रांचा बंधू शरण इतरां एकचि गती ।
करुं राजा लंके बिभिषण वदो आणिक किती ॥
सखा तो प्राणाचा अनुज विजयी साह्य मजला ।
किती कैसे कोणी कपिकटक नाही समजला ॥५८॥
स्थापूं सुरां निजपदीं असुरांसि दंडु ।
पाषांड बंड अतिलंड कुमत्त खंडू ॥
सत्कर्म धर्म हरिभक्ति विरक्ति जोडू ।
संमोहशोकाविवेकसमूह तोडू ॥५९॥
सत्यासि छत्र धरवूं दुरितासि जाळू ।
गोब्राह्मणा विनत होउनि पूर्ण पाळूं ॥
दीने अनाथ गतिहीन तया कृपाळू ॥
देऊनि अन्नधन, कांचन, आर्ति टाळू ॥६०॥
पीडा प्रजांसि न करुं परबाध वारुं ।
वेदानुवादविधिदूषक यांसि मारुं ॥
माता पिता सुजन भाविक भक्त निंदी ।
घालूं तया यमपुरीस अघोर बंदी ॥६१॥
राजा वदे बरळते वधु ईस फांटा ।
आली असेल विवसीच अघात मोठा ॥
आतां उपाय मज काय ? पुसे वसिष्ठा ।
त्या लागली परम पावन पूर्णकाष्ठा ॥६२॥
आहा ! कसे ! गजबजोनि पिटी कपाळा ।
आरंभले परम संकट लोकपाळा ।
नानाश्रमेंकरुनि मागितले अपत्या ॥
तों जोडिली वधुसहीत अचार्यहत्या ॥६३॥
राजा स्वयेचि मतिहीन अशक्त झाला ।
पाळी तदा कवण येउनियां प्रजांला ॥
तैसा वसिष्ठ कुलपालक साह्यकारी ।
झाला धमीत मग संकट कोण वारी ॥६४॥
आक्रंदतां नृप गुरु उघडोनि डोळे ।
डोले सुकेह सुदिन आजि विशेष बोले ॥
राया तुझें परम भाग्य अतर्क्य पाही ।
ब्रह्मादिदेवनिगमांप्रति गम्य नाही ॥६५॥
साक्षात परब्रह्म मुसावलें की । पतिव्रतेलागिं ठसावलें की ॥
समाधि शेजेसि विराजताहे । लोकत्रयी दुंदुभि वाजताहे ॥६६॥
राय बोलत गुरो मम जावा । भासते त्वरित देह त्यजाया ॥
सन्निपात जडला दृढ जाणा । दक्ष कौशिक ऋषीप्रति आणा ॥६७॥
मातापितातनुजआदिकरुनि घाता ।
केले वनी स्मरत चित्त तया अघाता ॥
स्वामीसही निरखितांचि तटस्थ मुद्रा ।
जालो बहूत भयभीत दयासमुद्रा ॥६८॥
प्रत्यक्ष सूर्य गुरुवर्य वसिष्ठदेवे ।
संबोधिले दशरथप्रति हो सदैवे ॥
हो सावधान रविवंशजमंडणा रे ।
झाली तुझी त्वरित पंकि विखंडणा रे ॥६९॥
जाया तुझी परम पावन शुक्ति साचे ।
श्रीराम मुक्त अति उत्तम चिद्रसाचे ॥
यज्ञेश्वरासहित सर्व ऋषेश्वरांचा ।
झाला प्रसाद तुज केवळ ईश्वराचा ॥७०॥
येथे नसेचि विवशी आणि भूत राया ।
भूभार वारुनि जगत्त्रय उध्दराया ॥
नामेंकरुनि भवसिंधु जनां तराया ।
आला परेश तव संकट निस्तराया ॥७१॥
ब्रह्मांडांच्या लक्षकोट्यानुकोटी ।
होती जाती नांदती सर्व पोटी ॥
होणे जाणे सर्वथा यासि नाही ।
लीलारुपे खेळ खेळे विदेही ॥७२॥
विकासूनि नेत्रांबुजे राजदारा । ह्मणे लक्ष्मणा क्षात्रधर्मै उदारा ॥
वधी इंद्रजीता महत्कार्य साधी । वियोगे सितेच्या मते आधि बाधी ॥७३॥
अरे अंजनीनंदना येचि काळी । पुरी राक्षसाची अती शीघ्र जाळी ॥
तनू अक्षयाची दुजा जंबुमाळी । विदारी करी वैरियासी धुमाळी ॥७४॥
दावूनियां चित्रविचित्र चर्या । झाली तदां सावध राजभार्या ॥
पाहे अचार्या आणि राजवर्या । तै सांवरी देह अवेव ( ? ) कार्या ॥७५॥
बंदी गुरुची चरणारविदे । अनुक्रमे राजपदे आनंदे ॥
अद्भूत की वोढवले कपाळा । माझ्यापुढे क्लेश बहू नृपाळा ॥७६॥
कुर्वाळिला मस्तक श्रीवशिष्ठे ।
वाक्पे जशी पीयुषतुल्य इष्टे ॥
तपे तुझी पावन पुण्यराशी ।
आला कृपे राघव गर्भवाशी ॥७७॥
राजा स्वये गद्गद कंठ बोले ।
प्रिये तुते क्लेश विशेष झाले ॥
त्यजूनियां राज्य वनासि जावे ।
वाटे मना देह परित्यजावे ॥७८॥
कौसल्येची मानुनीयां प्रतिज्ञा ।
आचार्या तो देत रायासि आज्ञा ॥
जावें आतां मंदिरा स्वस्थ चित्ते ।
न्यावी जाया सारसाक्षी स्वहस्ते ॥७९॥
दशरथ सहकांता मंचकारुढ होता ।
नयनयुगुल झांकी लागले ध्यान चित्ता ॥
वदत गुरुवराते पातली पूर्वचर्या ।
विगति गति इयेची मी धरुं केवि धैर्या ॥८०॥
सुप्रसन्न वचने गुरु बोले ।
धन्य भाग्य आमुचे ह्मणे झाले ॥
पूर्णमास भरती नव जेव्हा ।
राजया परम उत्सह तेव्हां ॥८१॥
जों दशा न उमटे दशमाची ।
तोंचि तो अजि कथा विषमाची ॥
धैर्य स्थैर्य निजशौर्य धरावे ।
बोलिले विहित तेंचि करावे ॥८२॥
ओसरे नवम तो नभपोटी ।
वाजती सघन दुंदुभि कोटी ॥
पातले सुरसमूह विशेषे ।
गर्जती सकल मंगळ घोषे ॥८३॥
बोलती विजय आजि सुरांचा ।
नाश येथुनि गमे असुरांचा ॥
नारदादि मुनिवृंद आनंदे ।
दाविती परम कौतुक छंदे ॥८४॥
आयुधे सह चतुर्भुज वेषे ।
मंदिरी प्रकट होय विशेषे ॥
तेज सोज्वळ दिनेश जसा हो ।
भासला प्रभु सतीस तसा हो ॥८५॥
घालूनि साष्टांग पदारविंदे ।
वंदोनिया ---- करी अनंदे ॥
मी दीन हीनाहुनि हीन जाया ।
नाही यथायोग्य तपास जाया ॥८६॥
पुन:पुन्हा दंडवतेचि घाली ।
विद्युल्लता जेवि नभी निघाली ॥
टाकोनियां लौकिक लाज मागे ।
वंदी पदाब्जाप्रति सानुरागे ॥८७॥
जाणोनिया उत्तम भाव तीते ।
प्रसन्न मी तूज वदे सतीते ॥
शिशुत्व मांडीवरि अंगिकारी ।
निस्सग जो निर्गुण निर्विकारी ॥८८॥
प्रसूतिचा भाव नसेचि झाला ।
होईल तो जन्म कसा अजाला ॥
लोकी निकी बाळदशाच दावी ।
लीला तयाची कवणे वदावी ॥८९॥
सौमित्रही याचपरी अयोनी ।
शेष स्वये रुप धरी न योनी ।
तजागळा चंद्र गमे अकाशी ।
शोभे तसा बाळक सावकाशी ॥९०॥
प्रसूत कैकयी तदा न येचि वेणही कदा ।
सुपुत्र शंख चक्र ते गणील कोण संपदा ॥
कळेचिही महत्कळा श्रुतीसि नेणवे लिला ।
धराधरा विधीवरा अतर्क्य याचिया बला ॥९१॥
सुविप्र सर्व देशिचे सवेग तेथ पातले ।
सुकीर्ति ऐकतां मनी आनंदरुप मातले ॥
सुयुक्त ज्योतिषी तथा मिमांसकारि धांवले ।
विशुध्दसत्व सद्विवेकवंतही सुखावले ॥९२॥
ब्रह्मचर्य वानप्रस्थ मस्करी तथा गृहस्थ ।
तापसी, जटासुयुक्त त्यक्त दूरि कामना ॥
मानुनी विशेष पर्व टाकिती पदार्थ सर्व ।
पाहती अपूर्व राजपुत्रवर्य आनना ॥९३॥
विधाने विधीयुक्त याज्ञीक पाहो ।
क्रिया दाविती, फोडिती मंत्रटाहो ॥
भरे अंबरी नाद दीर्घ स्वराचा ।
रुपा राम आला सखा ईश्वराचा ॥९४॥
सप्तस्वरे किन्नर गीत गाती ।
गंधर्व विद्याधर तान घेती ।
दिक्पाळ इंद्रादिक सर्व जाती ।
विलोकितां हालवितां न पाती ॥९५॥
भेरी मृदंग वरि झल्लरि नाद गाजे ।
घंटानिनाद अति मंजुळ वेणु वाजे ॥
पात्रानुसार सकळांसि यथापरत्वे ।
घेऊनि लक्ष धन बोळविती सहत्वे ॥९६॥
गोदान भूमिजलवस्त्रसदन्नदाने ।
संतोषवूनि सकलांसि विधीविधाने ॥
लक्षानुलक्ष फलपत्ररसप्रदाने ।
संस्थापिली निजसुतां विविधाभिधाने ॥९७॥
कौसल्यात्मज राम लक्ष्मण दुजा सौमित्राचा जन्मला ।
कैकेयीस पवित्र दोन दोन भरत शत्रुघ्न तो धाकुला ॥
विश्वामित्र वसिष्ठ कश्चप ऋषी भृंग्वाद सर्वै सुखे ।
नामे देउनि ठेवुनि कर शिरी गले स्वधामा सुखे ॥९८॥
ज्योतिषी बहुत शोधुनि जातके ।
निर्मिली सकलविघ्ननिपातके ॥
कीर्तने दहन सर्वहि पातके ।
जन्ममृत्युपतनासि घातके ॥९९॥
वृंदारकी सिध्दगणी मुनेश्वरी ।
गंधर्वविद्याधरयक्षकिन्नरी ॥
दिक्पाळ भूपालक सर्वही करी ।
पुष्पांजली वाहति बाळका शिरी ॥१००॥
दिसति बाळके विश्वपाळके ।
भुवन - मंडणे सर्व चाळके ॥
दनुजकुंजरा वीर केसरी ।
कवण पावती यांचिये सरी ॥१०१॥
बालार्कतेजे सम दिव्य दीप्ती ।
पहावया चंद्र सुरेंद्र येती ॥
लोकत्रये थोर अनंद केला ।
जो तो वदे आजि सुदनि केला ।
जो तो वदे आजि सुदीन जाला ॥१०२॥
अयोध्यापुरी राम हा जन्मला हो ।
अह्मी घेउं या भक्तिचा पूर्ण लाहो ॥
असे बोलती भक्तवृंदे समस्ते ।
करुं पूजने सर्वदा स्व=स्वहस्ते ॥१०३॥
सुरगण दशवक्त्रे घातले बंदिशाळे ।
ह्मणवुनि रविवंशी जन्मला हा स्वलीळे ॥
पुनित जन कराया भूतला मूर्ति आली ।
परि गुणमयि माया मोहनी भ्रांति घाली ॥१०४॥
श्रीराम लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
चौघे बंधू समसमान । दिवसेंदिवस वाढले ।
देत्या दानवांशी काळ । वाटे कौसल्येसी बाळ ।
भक्तजनां प्रतिपाळ । ऐसे लोकी रुढले ॥
मुनिजनांचे ध्येयध्यान । पूर्ण ब्रह्म सनातन ।
भानुवंशी हा चिदभान । साधुसंता वाटले ॥
जो निर्गुण नि:संग । निजानंद जो अभंग ।
सर्वारंगी एकरंग । हे बोल खुंटले ॥१०५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP