श्रीएकाखडी - ओंव्या
रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.
करितां सारासारविवेक । कर्मचि कर्मा मोचक, ।
काम्य निषेध रहित एक । निष्काम उत्तमश्लोक आचरती. ॥१॥
खरें पाखरूनि घेतां लेख । खर्चूं जातां परम सुख ।
खोटं लागतां वाटे दु:ख । पिशुन देख हांसती. ॥२॥
गर्विष्ठांचे कर्म सांग । गजांत लक्ष्मी परि मातंग ।
गर्भांधवनितेचा चांगभाग । न देखे निजांग आपुलें ॥३॥
घंटाघोषें निष्काम ओघ । घडघडां वाहती अनघ ।
घन पावावया सिंधूचें सैंघ । धांवती अमोघ चपळत्वें ॥४॥
न धरूनि कर्मानिमान । नानापणार्पणविधिविधान ।
नरवैडुर्यें करितां पावन । ब्रह्मसनातन पाविजे ॥५॥
चकोरांचा खर्चवेंच । चंद्रामृतचि साच ।
चंदन सर्वांगें फळतोच । हो कां उंच नीच भलतैसा ॥६॥
सत्रींचें अन्न उदक स्वच्छ । छेदी सुकृतहंसाचें पिच्छ ।
छलना करी तया साधु तुच्छ । मानिती जेंवि मत्स्य मद्यातें ॥७॥
जया काम्यकर्माचें बीज । जन्ममृत्यूचें नाचवी भोज ।
जनीं जनार्दन भावी तो सहज । सायुज्यशेज तयासि ॥८॥
झकवेना तो कैसा बुझे । झडोनि गेलिया माझें ।
झडपितां महद्भूतें ओझें । उतरलें द्वैतबुद्धीचें ॥९॥
यानंतर कर्ता कार्य क्रिया । या त्रिपुटी गेलिया विलया ।
यामार्ध लव पळ नवचे वायां । ब्रह्मसमन्वयावांचूनि ॥१०॥
टाकूनि जगद्भानपट । टाळी पिटिली समसकट ।
टवाळ जाणोनि सेवट । देखती एक चित्तंतु ॥११॥
ठक पडलें वेदासि उत्कट । ठसावलें हृदयीं वैकुंठपीठ ।
ठायिंच्या ठायीं निराकारमठ । बोलतां ओंठ उमलेना ॥१२॥
डाव साधला प्रचंड । डळमळीना पडतां ब्रह्मांड ।
डंवरला चित्तें जैसा मार्तंड । अखंड दंडायमान तो ॥१३॥
ढाल निजविजयाची गूढ । ढळेना उभी केली दृढ ।
ढेंकर देऊनि स्वसुखासनारूढ । झाला प्रौढ स्वानंदें ॥१४॥
नभ सर्वी सर्वत्र व्यापून । न मिळे अलिप्त समसमान ।
नलिनीपत्रावरि जीवन । असतां अभिन्न त्यामाजी ॥१५॥
तैसा कर्मीं वर्तत । तया बोलिजे जीवनमुक्त ।
तक्रामाजी जैसें नवनीत ॥ घातलिया होत वेगळें ॥१६॥
थापटूनि सद्गुरुनाथ । थडिचे पाववितो समर्थ ।
थोर अर्थ स्वार्थ परमार्थ । देऊनि अनर्थ चुकवितो ॥१७॥
दयार्णव तो ज्ञानप्रद । दवडूनि माया मोह मद ।
दश दिशा ब्रह्मानंद । करितो भाग्यमंदासि ॥ १८॥
धन्वंतरि सद्गुरु प्रसिद्ध । धांवे घेऊनि दिव्यौषध ।
धगधगीत शुद्ध बुद्ध । पूर्ण बोध पूर्ण मात्रा ॥१९॥
न कळे करितां साधन । न कळे धरितां मौन ।
न कळे करितां निरोधन । तें अवलोकनमात्रें आंगळे ॥२०॥
पढतां वेदशास्त्र जप । पर्वतीं बसोनि करितां तप ।
परंतु न कळे निजरंगस्वरूप । तें सद्गुरु आपेंआप दाखवी ॥२१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP