स्फुट पदें १६ ते २०
रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.
१६.
तो एक निजयोगी, निजयोगी । परदारा स्वयें स्वयें भोगी ॥ध्रु०॥
निशंक मात्रागमनी, भक्षी अभक्ष्य शंका नमनी ॥तो०॥१॥
गोवध घडला ज्याला, नित्य सुरापान जो प्याला ॥तो०॥२॥
निजरंगीं रंगेला, अपुले उगमीं संगम जाला ॥ तो एक निजयोगी, निजयोगी । परदारा स्वयें स्वयें भोगी ॥३॥
१७.
बोल रे बोल कान्हा । काय बोलसी निजनयना ॥ध्रु०॥
बोल बोलवीत कोण । बोल उद्भवला कोठून । त्याचे एकांतीं आहे कोण । त्याचा न कळे महिमान ॥बोल रे०॥१॥
कृष्ण म्हणे अहो आई । मूळ शोधोनियां पाहीं । निजमूळ पडतां ठायीं । चुकेल जन्ममरण ॥बोल रे०॥२॥
निजरंगी रंगतां तद्रूप । पाह्तां सद्गुरुपूर्णस्वरूप । आपेंआप होइंजे । बोल रे बोल कान्हा । काय बोलसी निजनयना ॥३॥
१८.
बापा तें नोहे, तें नोहे । व्यर्थचि श्रमि कां व्हावें ॥ध्रु०॥
साधुनि आसन मुद्रा, । शब्दज्ञाना बोलति क्षुद्रा ॥बापा०॥१॥
नवरस करूनि कवि, । पोटासाठीं सोंगें दावी ॥बापा०॥२॥
म्हणती काळें पिवळें । दाबुनि धरिती बळकट डोळे ॥बापा०॥३॥
बळेंचि शिष्य करिती । विशाळ यंत्रांतें पसरिती ॥बापा०॥४॥
व्यर्थचि टिळाटोपी । समाधि म्हणूनि जाती झोंपी ॥बापा०॥५॥
निजरंगीं रंगलें । रंगुनि रंगपणा मावळलें ॥ बापा तें नोहे, तें नोहे । व्यर्थचि श्रमि कां व्हावें ॥६॥
१९.
भवजलनिधितरणोपाया, श्रीहरिचे गुणगण नौका ॥ध्रु०॥
अरे नाना चरितें श्रीहरिलीला । दूरि करिति कलीला । ऐसें जाणुनि नवघननीला । न भजसि दु:शीला । विषयीं रत होउनि अनुदिनिं पडलासी । धिग् धिग् तूं नरकीं बुडसी । वावुगी मानुनि शंका ॥भव०॥१॥
तरले जन हे हरिभजनेंकरुनी । सद्भावा धरुनी । रमती हरिचरणीं ममता हरुनी । चिन्मयपद धरुनी । दीक्षा लावुनि ते मुमुक्षु भजनीं । लाविति मन अनुदिन रजनी । प्रक्षालुनि संसृतिपंका ॥भव०॥२॥
कैंचा भवसागर कैंची माया । जड जीव श्रमाया । स्वप्नीं गृह सुत पति कांचन जाया । चित्रतरूची छाया । मिथ्या सर्वहि पूर्ण प्रबोधीं । रंगीं रंगला निजानंदीं । निस्तरुनी भवभयशोका । भवजलनिधितरणोपाया, श्रीहरिचे गुणगण नौका ॥३॥
२०.
जें जें झालें दैवयोगें । तें तें योगी मानी हें वावुगें ॥ध्रु०॥
सुखदु:खात्मक देह वळखुनी । चित्त स्वरूपीं स्थिर करि वळुनी । चंद्र जसा निश्चळ परि गगनीं । फिरें जेंवि अभ्रयोगें ॥जें जें०॥१॥
अज्ञदशे जें कर्म निपजलें । कर्ता मी हें म्हणुनि वाटलें । उसनें त्या मापें फेडियलें । भोक्ता अहं योगें ॥जें जें०॥२॥
यापरि योगी सांडुनि शोका । नुपेक्षी गृहवासनादिकां । सहज निजरंगीं रंगूनि सम्यका । झाला किंतया आंगें ॥ जें जें झालें दैवयोगें । तें तें योगी मानी हें वावुगें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP