स्फुट पदें २६ ते ३०

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


२६.
देशिक प्रकट निदान, वेद सांगे ॥ध्रु०॥
भवहर सुखकर बोधिती सुज्ञान ॥देशिक०॥१॥
मीपण टाकुनि, चिन्मय होउनि, मग लाहे समता समान ॥देशिक०॥२॥
निजरंगें रंगपणें मन, उन्मन होउनि, सांडीं तूं देहभान । वेद सांगे, देशिक प्रकट निदान ॥३॥

२७.
सुखकर भजन हरीचें तुम्हि करा । करा करा भव तरा ॥ध्रु०॥
सारासार विचार करुनि हा, भवसिंधु तुम्ही तरा ॥सुखक०॥१॥
दुरितहरणपदीं शरण शरण पण, निजरंगीं अनुसरा ॥ सुखकर भजन हरीचें तुम्हि करा । करा करा भव तरा ॥२॥

२८.
श्रीराम जयराम आनंदकदा । हरहृदयविश्रामा जय जय परमानंदा ॥ध्रु०॥
नित्य राम शंकर ध्याय । तेणेंकरुनि मन उन्मन होय । मन उन्मन होउनि विषयार्णव । ऐसा राम म्हणतां जन्म हा जाय ॥श्रीराम०॥१॥
सदा सर्वदा होतें पूजन । तेथेंचि हें चित्त लावितां मन । रात्र आणि दिवस करितां ध्यान । नपवति गर्भवास सद्गुरुवचन ॥श्रीराम०॥२॥
सबाह्याभंतरीं श्रीराम एक । गुरुसी शरण जावें तुझा विवेक । तव ............नेनें हा लोक । सहज निजनंदीं रंगला हो नि:शंक ॥ श्रीराम जयराम आनंदकदा । हरहृदयविश्रामा जय जय परमानंदा ॥३॥

२९.
तैसें सुख या संसरीं । मानुनि हित केलें दूरी ॥ध्रु०॥
मृगजळ भावी दृढ पाणी । धांवुनि शिणतो मृग रानीं ॥तैसें०॥१॥
पतंग दीपीं सुख मानी । नेणे आपुलिच कीं हानी ॥तैसें०॥२॥
आवडि सेवी गळ मासा । न कळे होइल खेळ कसा ॥तैसें०॥३॥
लोभ धरीतो कोंसला । करुनि आपणचि गुंतला ॥तैसें०॥४॥
ऐसें विषयीं जे भुलले । ते सहज निजरंगीं अंतरले ॥ तैसें सुख या संसरीं । मानुनि हित केलें दूरी ॥५॥

३०.
मंगलधामा कल्याणा रामा ॥ध्रु०॥
भाविकभूषन सात्विकतोषण । साधकपोषणनेमा ॥मंगल०॥१॥
दानवभंजन भवभयगंजन । सज्जनरंजननामा ॥मंगल०॥२॥
राक्षसमर्दन सन्मतिवर्धन । चरणीं करित प्रमाणा ॥मंगल०॥३॥
निजरंगपदीं कधिं भंग न पावे । देईं भक्तिप्रेमा ॥ मंगल्धामा कल्याणा रामा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP