ॐ नमोजी स्वामी श्रीगुरुवर्या, सच्चित्सुखसूर्या । भवतमनाशक तूं क्षणमात्रें, तुझी अगाधचर्या ॥१॥
प्रबोध बाणलिया चित्ता, तुझी सर्वही सत्ता । परब्रह्म मूर्तिमंत तूं, श्रीगुरुदेवदत्ता ॥२॥
तुझिया स्वरूपाचें वर्णन, वर्णितां परिच्छिन्न । वेदश्रुती धरियेलें मौन, म्हणतां ‘ तन्न तन्न ’ ॥३॥
ऐसा निर्विकल्प कल्पतरु, माझा सद्गुरु । श्रीरंग निजमूर्ति उदारु, पूर्ण परात्परु ॥४॥
देशिक सर्वज्ञ दयाळ, भक्तवत्सल । अनन्य शरणागत प्रतिपाळ, कर्ता केवळ ॥५॥
सच्छिष्य साधनसंपन्न, शरण अनन्य । त्राहें त्राहें म्हणवून, बोले वचन ॥६॥
म्हणे देवा करुणानिधाना, आनंदघना । संशय झाला तो या मना, फेडी जगजीवना ॥७॥
बद्धमोक्ष म्हणती तें काय, कैसा अभिप्राय । श्रवणें होईल प्रत्यय, सत्य मुनिश्चय ॥८॥
छेदावा जी माझा संशय, म्हणूनि धरिले पाय । कृपेनें तो बोळला गुरुराय, तोचि तरणोपाय ॥९॥
गुरु म्हणती शिष्य सुमति, बद्धमोक्ष हे भ्रांति । उदय अस्तु नेणें गभस्ति, सिद्ध स्वयंज्योति ॥१०॥
आपुली कल्पना निश्चयें, बद्धता ते स्वयें । लोंबतसे धरूनियां पायें, शुकनलिकान्यायें ॥११॥
अहं देही ऐसे जें भान, तेंचि अज्ञान । अज्ञानानें सबळ बंधन, होय पतन ॥१२॥
कल्पनेनें ब्रह्मीं संसार, स्थाणु तो चोर । कल्पनेनें भासे स्थिरचर, वांझेचें पोर ॥१३॥
कल्पनेनें पिंड ब्रह्मांड, पृथ्वी नवखंड । कल्पनेनें मायेचें बंड, तंडवितंड ॥१४॥
कल्पनेनें भासे जीव, शिव भाव अभाव । माया अविद्यावैभव, भक्त आणि देव ॥१५॥
ऐसा कल्पनेचा खेळ, भवबंधन मूळ । कल्पना शून्य तैं सकळ, मिथ्या भजाळ ॥१६॥
कल्पनेचें होय संहारण, यासि कारण । सेवितां सद्गुरुचरण, चुके जन्ममरण ॥१७॥
कारण निद्रा हे स्वप्नासि, त्यासि प्रबोध नाशी । रविबिंबीं कैंची दिननिशी, स्वयंप्रकाशीं ॥१८॥
स्वप्नावस्था प्रबोधीं जैसी, बद्धता तैशी । स्वरुपीं स्वानंदराशी, कळे ज्याचें त्यासि ॥१९॥
बद्धता मुळीं मिथ्या जे ठायीं, तेथें मोक्ष तो कायी । अजन्म्यासि पाहतां कोठेंही, मरण झालें नाहीं ॥२०॥
बद्धमोक्ष म्हणणें हा भ्रम, भ्रांतबुद्धिश्रम । वाउगाचि शीण संभ्रम, पूर्णानुक्रम ॥२१॥
एवं दोन्ही मिथ्या मृगजळ, भासे तुंबळ । पूर्णानंदीं पाहतां केवळ, बद्धमोक्ष तो टवाळ ॥२२॥
वेदवेदांतप्रतिपाद्य, वस्तु स्वसंवेद्य । हरिहरां सद्गुरुपद वंद्य, अनादिसिद्धाद्य ॥२३॥
बद्धमोक्षाचें विवरण, प्रश्नोत्तर जाण । संशयनिरसन संपूर्ण, करितां होत श्रवण ॥२४॥
निजानंद रंगला, रंगीं, जैसें तोय तरंगीं । बद्धमोक्ष कैंचा निस्संगीं, सुवर्णरंगीं ॥२५॥