३६.
फिरोनियां काय, वन वन वन ॥ध्रु०॥
गोड दिसे बहिरंग जनांप्रति, अंतरिं उध्वस, वण वण वण ॥फिरोनियां काय०॥१॥
तीर्थतपें बहु केलीं जरि ते, जागति षड्रिपु, दण दण दण ॥फिरोनिया काय०॥२॥
पूर्णरंग निजशांति नये जरि, कामज्वरें तनु, फण फण फण ॥ फिरोनियां काय, वन वन वन ॥३॥
३७.
सांडुनि कां मातें, प्राणी भजती कामातें ॥ध्रु०॥
शाश्वत निजसुखदायक त्या मज, नेणति श्रीरामातें । काम्य निषिद्धें कर्में करिती, होती प्राप्त श्रमांतें ॥प्राणी०॥१॥
दु:खरूप हा विषमसमागम, नेइल अंधतमातें । देखत देखत अंध बधिर नर, नेणति परिणामातें ॥प्राणी०॥२॥
मी निजरंग अभंग तया मज, मुनिमनविश्रामातें । सांडुनि विषय विषासम सेविती, सांगुं किती अधमांतें ॥ सांडुनि कां मातें, प्राणी भजती कामातें ॥३॥
३८.
आतां वसुधातळहि बुडो । वरि हें नभमंडळहि पडो ॥ध्रु०॥
निश्चय कीं निजराम स्मरावा, हा सहसा न खुडो ॥वरि हें०॥१॥
शेवटील पाळी, येणें गोड करूं समूळीं । आन उपाय नसे या काळीं, ध्यावा वनमाळी ॥वरि हें०॥२॥
जन म्हणो वेडें, परि मी न पाहें त्यांच्याकडे । साधन तें साधावें ऐसें, परम पद जोडे ॥वरि हें०॥३॥
असेल प्रारब्धीं, तरि हें न चुके कर्म कधीं । मृगजलास्तव क्लेशी होणें, विषम हे बुद्धि ॥वरि हें०॥४॥
उरलें असेल करणें, भजनीं लावावीं करणें । लक्ष चौर्यांयशीं जन्माचें, येथे संकट निस्तरणें ॥वरि हें०॥५॥
सहज पूर्ण निरंजना मजवरि, करिं गा अनुकंपा । पूर्णकृपे अवलोकुनियां मज, पावन पथ सोपा ॥ आतां वसुधातळहि बुडो । वरि हें नभमंडळहि पडो ॥६॥
३९.
धांव कृपावंते माय माझे विठ्ठले । तुजविण गमेना चित्तालागीं । मम वृत्ति चरणीं लागुं दे ॥ध्रु०॥
कर्म प्रवृत्ति यांच्या प्रवाहांत गुंतलों । वासना सर्पिण इच्या योगें बहु त्रासलों । कुठवर आतां आंवर करूं मी, तुजविण कवणाशीं सांगूं ॥धांव०॥१॥
सत्कर्म पाहूं जातां आड येतें कर्म गे । कर्मचि लीन होतां नये कैसा खुंट गे । प्रारब्धानें वेष्टियेलें नेईं नेईं पार गे ॥धांव०॥२॥
जन्मयोनि फिरतां फिरतां मोठा झाला शीण गे । सुकृतातें साह्य म्हणतां अंतर नाहीं शुद्ध गे । शुद्ध सुमतिचा भाव दावुनी आपुल्या रंगीं नेईं गे ॥धांव०॥३॥
निजरंगी निजदेहीं स्फुरण अंतरीं । तुझिये नामीं माझी वृत्ति ठसो ही जरी । निजरंगें हा करुणाशब्दें पुष्पमाला अर्पि गे ॥ धांव कृपावंते माय माझे विठ्ठले । तुजविण गमेना चित्तालागीं । मम वृत्ति चरणीं लागुं दे ॥४॥
४०.
रुमझुम धुमधुम थिरिकिटि धिग् धिग् नाचाप्रति गणपती । आधारचक्रीं नाचुं लागले स्वानंदें नाचती । नाच नाच मोरेश्वर म्हणती ईश्वर दाक्षायणी । उत्तम गौतम गार्गी गालव वसिष्ठ बसले मुनी । ऐशा ऐशा अनसूयादिक ऋषिपत्न्या कामिनी । चाल । त्या नाच म्हणति सकळाल्या, अहो मोरया । देव नाचूं ते लागले, अहो मोरया । नाचे ब्रह्मांड भ्रांतितें, अहो मोरया । चाल पहिली । नाच नाचला देवचि झाला संत गुणीं गोंविती ॥रुमझुम०॥१॥
कामसरिता नाचुं लागल्या क्रोधादिक पर्वत । मोहसिंध तो नाचुं लागला अहंवृक्ष नाचत । शान्तीधरणी नाचुं लागली ज्ञानानर नाचत । वासना उतरंडी नाचे भक्तिचूल नाचत । चाल । गुरुकृपाशिंकिं नाचती, अहो मोरया । देव देव्हारे नाचती, अहो मोरया । चाल पहिली । जारज अंडज स्वेदज उद्भिज वृक्ष पहाड नाचती ॥रुमझुम०॥२॥
एकविस स्वर्गें नाचुं लागलीं नाचति रात्रंदिस । सप्त पाताळ नाचुं लागले शेषादिवराह सकळिक । नाचसंधिसी त्रिपुरासुर तो कपटी कीं मायिक । त्रिपुरामध्यें शिरोनि बसला मनामधें घातक । चाल । म्हणे पार्वती पुरे मोरया, अहो मोरया । घे उचलुनी कडे मोरया, अहो मोरया । जड लागे बाळ मोरया, अहो मोरया । चाल पहिली । क्षितिवरि गणपति पार्वति उतरी देव मनीं शोधिती ॥रुमझुम०॥३॥
पाय झाडिला दैत्य मारिला व्यासा सांगे विधी । योजन बास प्रेतपसारा त्र्यंबकक्षेत्रामधीं । चाल । नाचे भगवान् चिंतामणि, अहो मोरया । नाचे निजरंगीं रंगुनी, अहो मोरया । नाचे सिंधूपुरीं, अहो मोरया । चाल पहिली । म्हणुनि अहो मोरया अहो मोरया नाच ऐकती । स्वानंदें निजानंदसुखपदीं अक्षयची रंगती ॥ रुमझुम धुमधुम थिरिकिटि धिग् धिग् नाचाप्रति गणपती । आधारचक्रीं नाचुं लागले स्वानंदें नाचती ॥४॥