१.
सखया रंगा रंगवीं माझें मन, संशय तोडूनि जोडावें समाधान ॥ ध्रुवपद ॥
कोठें आहे तद्धाम ? मायापुरीं । मायापुर कोठें तें ? आत्मनगरें । कैसा वर्ते सिद्ध तो ? नटापरी । पुनर्जन्म आहे कीं ना ? संसारी ॥स०॥१॥
भक्त कोण ? जो भूतदया वाहे । ज्ञानी कोण ? जगचि मिथ्या पाहे । कर्म कोण ? निर्हेतुक होत आहे । कोण विद्वान् ? आपणां जाणताहे ॥स०॥२॥
शूर कोण ? कामादि संहारिले । मित्र कोण ? धर्मासि वोडियलें । थोर कोण ? कीर्तीतें जोडियलें । नीच कोण ? आपणा बुडवीलें ॥स०॥३॥
सुख कोण ? शांति ही, दु:ख ? भ्रांति । हानि कोण ? आपणा आपण विस्मृति । लाभ कोण ? आपणा आपणप्राप्ति । रामदास निज रंगा आलिंगिती ॥स०॥४॥
देवस्वरूप कोणतें ? आहेपण । मायास्वरूप कोणतें ? नाहींपण । संतस्वरूप कोणतें ? । संतपण निजानंद रंगला रंगीं पूर्ण । सखया रंगा रंगवीं माझें मन, संशय तोडूनि जोडावें समाधान. ॥५॥
२.
सखया सज्जना अंतरिंच्या सांगे गोष्टी । बहुत भाग्यें जाहली तुझी भेटी ॥ध्रु०॥
भेटलासि तूं जिवलग गडी । माझ्या जीवींची पुरवीं बा तूं आवडि । बोल कांहीं स्वरूपपरवडि । जेणें नाश पावती संशयकोडी ॥स०॥१॥
विश्वीं राम कीं विश्व असे रामीं । जाहल्या प्रतीति वर्तणें केंवि कर्मीं । वर्ते प्रारब्धें तयासि कोण नेमी । जीव शिव एक कीं दोन नामीं ॥स०॥२॥
बोलीं तोषला बोलतां संवगडा । तूं तंव जाणता पुससी लोकचाडा । सावध होऊनि परियसेसें पदझाडा । भला जोडला आजि बा साधुजोडा ॥ सखया सज्जना अंतरिंच्या सांगें गोष्टी । बहुत भाग्यें जाहली तुझी भेटी ॥३॥
सखया सज्जना अनुभवीं मुळींच्या खुणा । जाणणें त्यजूनि समूळ जाणपणा ॥ध्रु०॥ घटीं मृत्तिका मृत्तिकेंत घट नाहीं । पटीं पाहतां तंतुचि सर्वदाही । हेम अळंकारीं तैं बुद्धिभेद नाहीं । तैसें विश्वीं रामरूप एक पाहीं ॥स० अ०॥४॥
कर्मीं वर्ततां साहजिक संस्कारें । कदा न शिणें कर्तव्यभोगभारें । ब्रह्मीं हुत करीं ब्रह्मार्पणद्वारें । कर्ता कर्म कार्य जाण एकसरें ॥स० अ०॥५॥
ज्ञानकाळीं संचित दग्ध झालें । अहंत्यागें क्रियमाण सर्व गेलें । वर्ते प्रारब्ध निश्चया जना आलें । कर्मीं वर्ते त्रिविधबोधबळें ॥स० अ०॥६॥
जेंवि आकाशा लघुत्व घटाकाशीं । मठीं अनेक प्रकारें पाहें त्यासी । जीव शिव एकचि ज्ञानराशी । भेद नाहीं जीवशिवां निश्चयेशीं ॥स० अ०॥७॥
संवादीं या दोघांचें पुरलें कोड । प्रीति नांवरे बोलतां गोड गोड । ब्रह्मवेत्त्या ब्रह्माची नाहीं भीड । अन्य दीपाची दीपासि नाहीं चाड ॥स० अ०॥८॥
ऐसें अंतरा अंतर एक झालें । तेथें सांगतां ऐकतां एक ठेले । दोघां दोनपण समूळीं हारपलें । निजानंदीं रंगलेपणहि गेलें । सखया सज्जना अनुभवी मुळींच्या खुणा । जाणणें त्यजूनि समूळ जाणपणा ॥९॥
३.
परमेश्वर हरि खास, तोचि परमेश्वर हरि खास ॥ध्रु०॥
पंचभूतांचा निर्णय करितां, शून्यीं राहे भास ॥तोचि०॥१॥
माझें माझें खंडित करितां, शेवटीं राहे आस ॥तोचि०॥२॥
निजमत निजमत सिद्धचि करितां, सर्वां दे समरास ॥तोचि०॥३॥
निजधर्मीं जो लवलवकाळीं, दाखवी आत्मप्रकाश ॥तोचि०॥४॥
जागृतिस्वप्नसुषुप्तींस साक्षी, चेतवि परअपरास ॥तोचि०॥५॥
ज्याकरितां जन करिती कर्में, निजरंगांत विलास ॥ तोचि परमेश्वर हरि खास ॥६॥
४.
जडदेहा घेउनि वाणी, गेला ती ऐका वाणी ॥ध्रु०॥
घट फोडुनि जनकादिक ते, अनुभविते झाले माती । हा नोहे तुकया तैसा, घट राखुनि धरिली चित्तीं ॥जडदे०॥१॥
इतर ते हारुनि दुग्धा, परिणामक घेती पाणी । हा नोहे तुकया तैसा, पय राखुनि चाखी लोणी ॥जडदे०॥२॥
इतरें तें फोडुनि कोहं, मग चाखियला तो सोहं । हा नोहे तुकया तैसा, अच्छेद्य पचविला कोहं ॥जडदे०॥३॥
इतरें त्या मिश्रे पुटातें, देउनियां जड टाकियलें । तो नोहे तुकया तैसा, परिसानें हेमचि केलें ॥जडदे०॥४॥
जडबुद्धि अहं या देहा, निजस्वरुपीं वाहुनि गेला । निजरंगीं रंग पहाया, रंगानें निश्चय केला ॥जडदे०॥५॥
या बोला सारचि कथितों, दिसणें जें हाचि जन्म । अदृश्य मरण योग्यांचें, निजरंगी अघटित धर्म ॥ जडदेहा घेउनि वाणी, गेला ती ऐका वाणी ॥६॥
५.
तोचि यत्नि पुरुष साचार ॥ध्रु०॥
मृगजलडोहीं हरिपदनौका, घालुनि झाला पार ॥तोचि०॥१॥
वेष्टुनि औटी व्यापित सृष्टी, सारित सारासार ॥तोचि०॥२॥
व्यसनी झाला हरिभजनाला, फिरुनि करी उच्चार ॥तोचि०॥३॥
निजानंद निजरंगीं रंगुनि, केला यत्नीं थार ॥ तोचि यत्नि पुरुष साचार ॥४॥