निरंजन स्वामी कृत - अभंग ११ ते १५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
अभंग ११.
हिर्याचे शस्त्रानें हिर्याची घडणी । दुसरि करणी नाही तेथें ॥१॥
काष्टसंघट्टनीं निघे जैसा अग्नी । काष्टातें जाळूनी टाकीतसे ॥२॥
तैसें हें मनानें मनचि मारावें । सहजची व्हावें ब्रह्म मग ॥३॥
निरंजन सांगे रघुनाथाची खूण । करा त्याप्रमाणें तुह्मी सर्व ॥४॥
अभंग १२.
धन्य रघुनाथ सद्गुरू पाहिला । संशय हा गेला ऊठाऊठी ॥१॥
वेदशास्त्रें ज्यासी देताती संमत । तें हें मूर्तीमंत दाखवीले ॥२॥
बहूत ठिकाणीं पाहियलें ज्ञान । परि ते अज्ञान दिसुनी आले ।
निरंजन ह्मणे रघुविरासारिखा । दुजा नाहीं देखा कलीमाजी ॥४॥
अभंग १३.
रघुनाथ माझा सदुरु सोयरा । नाहीं पारावारा त्याचे गूणा ॥१॥
बहूता जनाशी तारक तो जाला । धर्म प्रगटला कलीमाजी ॥२॥
एका द्विजालागीं काशिक्षेत्रामाजी । दर्शन जी तेथें त्यानें दीलें ॥३॥
निरंजन ह्मणे द्वारके माझारी । दर्शन द्विवारीं मज जालें ॥४॥
अभंग १४.
दयाळा कृपाळा स्वामि दिगंबरा । कृपेच्या दातारा दीनबंधू ॥१॥
संसाराचे संगें बहु कष्टी झालों । त्रितापें तापलों देहसंगें ॥२॥
तुजवीन कोण आह्मांसी निर्वाणीं । येई चक्रपाणी धांवोनियां ॥३॥
निरंजन ह्मणे देई आतां भेटी । नको करूं कष्ट देवराया ॥४॥
अभंग १५.
दिगंबरा स्वामि अगा दयाघना । येऊंदे करुणा अनाथाची ॥१॥
मायामोहजाल टाकावे छेदून । करावें धावणें दीनबंधू ॥२॥
अनाथासि आह्मां तुजवीण आतां । कोण आहे त्राता सर्वापरी ॥३॥
निरंजन ह्मणे देई आतां भेटी । नको करूं कष्टी देवराया ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP