निरंजन स्वामी कृत - अभंग ३६ ते ४०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अभंग ३६.
प्रथम नमन मारुतिरायासी । चिंतन मानसीं करूनीया ॥१॥
जेणें सीताशोक केला निवारण । लंकेसी जाळून शुद्ध केलें ॥२॥
तो हा बलभीम येवो या कीर्तनीं । देवो प्रेमधणीं आह्मालागीं ॥३॥
रघुवीरगूण गाय निरंजन । वायूचा नंदन आठवोनी ॥४॥

अभंग ३७.
स्वामि रुद्रअवतार । त्यासि वंदूं वारंवार ॥१॥
गाउं वाचेलागीं गूण । धन्य मारूती ह्मणून ॥२॥
मनीं करूनीया ध्यास । नयनिं पाहूं सावकाश ॥३॥
जो कां निरंजनवासी । भावें शरण आह्मी त्यासी ॥४॥

अभंग ३८.
देंवा देई तुझे भक्ती । आह्मां नको चारी मुक्ती ॥१॥
देवा देई ऐसें प्रेम । जेणें येई तूज घाम ॥२॥
गुण गाऊं वेळोवेळां । तुज येई कळवळा ॥३॥
जो कां निरंजनवासी । भावें शरण आह्मी त्यासी ॥४॥

अभंग ३९.
काय वांचूनीया केलें । तुज नाहीं आठविलें ॥१॥
व्यर्थ घातलें आयुष्य । भोगविषयाच्या मिसें ॥२॥
देवा गेलों गेलों वाया । धांव धांव विठूराया ॥३॥
करि कृपेचें पोषण । ह्मणे दास निरंजन ॥४॥

अभंग ४०.
दवा देईं ऐसें देणें । नको कोणासी मागणें ॥१॥
पुरे होऊंदे वासन । सर्व माझी नारायणा ॥२॥
हेंचि देई मजलागीं । धन्य होईन मी जगीं ॥३॥
निरंजन लागे पायां । कृपा करा रघूराया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP