निरंजन स्वामी कृत - अभंग ५० ते ५४
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
अभंग ५०.
आह्मी आहों त्या गांवींचे । जुनें मिराशी आधींचे ॥१॥
रूपालागीं नाहीं ठाव । त्या गांवाला कैचें नांव ॥२॥
नाहीं द्वैताचा सोस । तेथें कैचा गांग - कूस ॥३॥
जग कुळवाड्याची वाण । तेथें कैंचें पाटिलपण ॥४॥
फिकीं अनंत ऊपमा । तेथें कैचे चतु:सीमा ॥५॥
नाहीं मायेचें अंजन । म्हणवुनि होय निरंजन ॥६॥
अभंग ५१.
प्रल्हाद - कैवारी येई नरहरी । हृदयस्तंभांतरीं प्रगटे माझ्या ॥१॥
काम हा दुर्धर हिरण्यकश्यपु । मारोनिया रिपु टाकी माझा ॥२॥
मग मी होईन सर्वापरि सुखी । तुझें नाम मुखीं गावोनिया ॥
निरंजन म्हणे स्वामी रामराया । दूर लरी माया - मोह माझा ॥४॥
अभंग ५२.
अंजनी - नंदना येई वायुसुता । सकळ - गुणवंता कळानिधि ।
तुझें नाम जरि उच्चारिलें वाणी । काळाचिये मनीं धाक वाटे ॥२॥
तुझिया बळाची कोण करि सीमा । स्वामि बलभीमा महारुद्रा ॥३॥
निरंजन भावें शरण आला तुज । राखि माझी लाज सर्वापरी ॥४॥
अभंग ५३.
शिव जाला मार्तंड । मोडावया दैत्यबंड ।
करि दुष्टालागी दंड । भक्ताखंड रक्षिता ॥१॥
मागूं प्रेमाची हे वारी । नरदेह रविवारी ।
आलिया संसारीं । चुकवूं फेरी सर्वस्वें ॥२॥
स्मरोनिया त्याचे गुण । येळकोट गाऊं गाण ।
भुंकूं होउनिया श्वान । त्याचे द्वारीं सर्वदा ॥३॥
निरंजन आला वाघा । जाउनि मल्हारीला सांगा ।
चरणीं थोडी जागा । द्यावी भागा येइल ती ॥४॥
अभंग ५४.
हिंगणा शेजारीं उगवला चंदन । परि त्याचा गूण याला नये ॥१॥
बोरीच्या शेजारीं केलें केळीवन । परि त्याचा गूण याला नये ॥२॥
मर्कटा शेजारीं बांधिलें हरिण । परि त्याचा गूण याला नये ॥३॥
खळाचे शेजारीं साधु निरंजन । परि त्याचा गूण याला नये ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP