निरंजन स्वामी कृत - अभंग २१ ते २५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
अभंग २१.
नाहीं आह्मां पापपुण्यासी कारण । नाहीं येणें जाणें स्वर्गलोकीं ॥१॥
पातकाचा वाटा निंदकासी दीला । स्तुति करिति त्याला पुण्य दीलें ॥२॥
दोन्हीभागीं आह्मी अलिप्त सर्वदा । स्तुती करो निंदा कोणी तरी ॥३॥
निरंजन ह्मणे निरंजन आह्मी । कर्मया कर्मीं अलिप्तची ॥४॥
अभंग २२.
दत्तत्रया स्वामि सर्वाचा हो दाता । नाहीं ठाव रीता तयावीण ॥१॥
भागीरथीमाजी सारूनिया स्नान । करि भिक्षाटन कोल्हापूरी ॥२॥
पंचाळेश्वरासी भोजनासि जावें । आसन करावें शेषाचळीं ॥३॥
माहूरपर्वतीं करुनिया निद्रा । गिरिनारीं मुद्रा सारीतसे ॥४॥
निरंजनिं वनिं अक्षई रहातो । धावूनीया येतो आठवितां ॥५॥
अभंग ( ग्रंथाचे ) २३
येई वो श्रीगूरू स्वामि दत्तात्रया । दयाळा सखया दीनबंधू ॥१॥
अनाथाचा नाथ कृपेचा सागर । बहो तूं उदार सर्वागूणें ॥२॥
भक्तकाजासाठीं धाऊनियां येसी । हेचि वागवीसी ब्रीद सदा ॥३॥
निरंजन ह्मणे धाउनिया यावें । ग्रंथ ऊठवावे जळाले ते ॥४॥
अभंग २४.
गिरनारा ठाई भेटुनीया तुवां । शब्द देवदेवा बोलीलासी ॥१॥
नि:संग कविता गाई माझे गूण । निर्गूण सगूण कैसे तरी ॥२॥
करिसि जे कविता चालेल पृथ्वीवरी । होईल सर्वापरी मान्य सदा ॥३॥
निरंजन ह्मणे तरि त्वां सत्वरि यावें । ग्रंथ ऊठवावे जळाले ते ॥४॥
अभंग २५.
त्झे आज्ञेवरुनी वदलों कविता । पद आणि ग्रंथा करूनीयां ॥१॥
तेथें जालें विघ्न जळाली कविता । रक्षा आली हातां मुष्टीभरी ॥२॥
तेचि रक्षा आतां बांधोनीं पदरीं । सप्तशृंगावरी आलों स्वामी ॥३॥
निरंजन ह्मणे धाऊनीया यावें । ग्रंथ ऊठवावे जलाले तें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP