निरंजन स्वामी कृत - अभंग ३१ ते ३५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अभंग ३१.
आइके हो कांते माझें हें उत्तर । लटवी संसार सर्व कांहीं ।
उत्तम - वसनें भांडें पात्र धन । संग्रह करणें काशा आह्मां ॥२॥
लिहिलें प्राक्तनीं न चुके सर्वथा । मग कां हें वृथा सांठवावें ॥३॥
ऐसा बोलुनीया शुद्ध निरंजन । दिला लुटवून संवसार ॥४॥

अभंग ३२.
आत्मा तो निर्गूंण अवयवावीण । सांगतों मी खूण त्याची तुह्मा ॥१॥
बोलतां जे नये बोलोनि दावीतों । चंद्र दाखवीतो शाखेहूनी ॥२॥
टाकोनि पोकळी शब्दाचा किंकार । पाहे चिदाकार आकाशासी ॥३॥
चिद तो प्रकाश सदा अविनाश । दिवसरात्रि वास नाहीं जेथें ॥४॥
निरंजन ह्मणे तेंचि चिदकाश । आत्मा सावकाश ओळखीतो ॥५॥

अभंग ३३.
काय वर्णूं त्याचीं थोरी । नित्य वाचे ज्याच्या हरी ॥
अहो सर्व चराचर । दृष्टि पाहे ब्रह्माकार ॥२॥
तेणें योगायोग केले । सर्व कर्मे संपादीले ॥३॥
निरंजन वदे वाणी । तोचि संतशिरोमणी ॥४॥

अभंग ३४.
पामर जनाचा काय संवसार । वृथा भूमिभार केला तेणें ॥१॥
शिणविली माता पिता दोघें जण । जन्मासि येऊन श्रमी जाला ॥२॥
वाचेलागि कदा नये रामनाम । कर्मही निष्काम नाहीं केलें ॥३॥
निरंजन ह्मणे तयाचें हें मूख । पाहूं न सन्मूख दृष्टीलागीं ॥४॥

अभंग ३५.
आह्मी जालों रे भाग्यवंत । घरा आले साधुसंत ॥१॥
आजि सुदिन आह्मासी । प्राप्त झाली सूखराशी ॥२॥
जाली आनंदाची सीमा । नाहिं जयासी उपमा ॥३॥
निरंजन मन धालें । पापतापदैन्य गेलें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP