निरंजन स्वामी कृत - अभंग २६ ते ३०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
अभंग २६.
स्वामी दिगंबरा न येस दातारा । निश्चय हा खरा ऐके माझा ॥१॥
पहिल्यासारीखे सिद्ध व्हावे ग्रंथ । हेंचि मनोरथ पूरवावें ॥२॥
नाहिंतरी देह तवपायीं ठेवीला । निश्चय हा केला पूर्णपणें ॥३॥
निरंजन ह्मणे धाऊनीया यावें । ग्रंथ ऊठवावे जलाले तें ॥४॥
अभंग २७.
इतुक्यानें तूज कष्टवीतों देवा । परंतु केशवा न बोलेचि ॥१॥
तुझा पूर्णपणें मजसी भरंवसा । ह्मणोनियां ऐसा निश्चय केला ॥२॥
तुझे कीर्ती गूण वर्णिले ज्या ग्रंथीं । त्याची रक्षा माती व्हावी काय ॥३॥
निरंजन ह्मणे धाऊनीया यावें । ग्रंथ ऊठवावे जळाले तें ॥४॥
अभंग २८.
ऐसे पांच दिन सरोनिया गेले । रात्रिं स्वप्नीं आले दत्तात्रय ॥१॥
ह्मणति निरंजना खेद न करी मना । ग्रंथ अवलोकना ऊठ वेगीं ॥२॥
जागें होवोनिया रक्षेसि पाहीलें । तंव ते ग्रंथ जाले पहिल्यावाणी ॥३॥
निरंजन ह्मणे धन्य आजी झालों । आनंद पावलों गुरुकृपें ॥४॥
अभंग २९.
रघुवीरकृपा बरि संपादीली । तेचि कामा आली यथाकाळीं ॥१॥
दत्तात्रय स्वामी संकष्टा पावले । दु:ख नीवरीलें सर्व माझें ॥२॥
धन्य आह्मी जालों संसारा येऊन । आतां गाऊं गूण श्रीगुरूचे ॥३॥
निरंजन ह्मने अपराध क्षमा । करा सर्वोत्तमा अनाथाचा ॥४॥
अभंग ३०.
येई येई दत्तात्रया । माझ्या कीर्तनाच्या ठाया ॥१॥
रंगदैवता आमुची । तूंचि सर्वापरी साची ॥२॥
गावे तूझे कीर्तिगूण । ऐसें इच्छी माझें मन ॥३॥
निरंजन ह्मणे देवा । घेई आताम माझी सेवा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP