निरंजन स्वामी कृत - अभंग ४१ ते ४५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
अभंग ४१.
नको नको संवसार । देव अंतरला दूर ॥१॥
जळो विषयवासना । वीसरलों नारायणा ॥२॥
जन्म व्यर्थ घालवीला । अंतकाळ नेटीं आला ॥३॥
निरंजन ह्मणे आतां । धांव पाव रघूनाथा ॥४॥
अभंग ४२.
सर्पाचिये तोंडी विषयाची गरळ । चालणें सरळ नाहीं कदा ॥१॥
तैसा निंदक जो जातीनेंही खळ । बोले अमंगळ सर्वा जना ॥२॥
साधु तरि त्याच्या बापाचा वयरी । दाटुनिया करी निंदा त्याची ॥३॥
निरंजन ह्मणे शांतीचा तो मंत्र । तेणें अपवित्र आकळावा ॥४॥
अभंग ४३.
आपूण नरकीं बुडोनि वडील । बाळासी पुढील सांगताती ॥१॥
करावा संसार चांगला थाटून । लोकीं भलेपण मेळवावें ॥२॥
न कळे आपण केला संवसार । काय हितकर जाला बहु ॥३॥
निरंजन ह्मणे रांडेच्या गाढवा । काय हितठेवा बोललासी ॥४॥
अभंग ४४.
तेंचि वयराग्य म्हणूं आह्मी पूरें । नाहीं तरी बा रे जैसें जैसें ॥१॥
सर्व विश्व डोळां पाहे आत्माकार । द्वईत विकार न ये कदा ॥२॥
मृगजळवत उपभोग नाना । दिसतातीं जाणा जयालागीं ॥३॥
विषयातें घेणें आणिक टाकणें । विसरलें मन ज्याचें सदा ॥४॥
निरंजन ह्मणे तो गुरु आमूचा । अनुभव साचा ज्याशीं आहे ॥५॥
अभंग ४५.
सुखासाठीं जग भोगीति विषय । परि दु:खमय होती बहू ॥१॥
जैसा पतंग धावे दीपावरी । सुख नाहीं परी दु:ख होय ॥२॥
सर्व संवसार दु:खाचा सागर । नाहीं अंतपार तयालागीं ॥३॥
निरंजन ह्मणे सोडा संवसार । उतरील पार हरी तुह्मां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP