पवित्र उपदेश
श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।
॥ श्रीराम समर्थ ॥
श्री मुकुंदराज महाराज बांदकर यांनीं सपत्नीक तीर्थयात्रेस जातानां आपले प्रिय चिरंजीव कृष्णानंद व स्नुषा सौ. राधिका यांस केलेला पवित्र उपदेश
पद १ लें
नाम तुझें बा कृष्णानंद, करुनि हरिभजन वरीं आनंद ॥धृ०॥
परस्त्री मातेसम पाहीं । याविण अन्य व्रत नाहीं । जगीं तुज उणे न मग कांहीं । होउनि शुद्ध मना राहीं । जोडीं श्रीराघव सुखकंद ॥ना०॥१॥
भरवंसा नाहीं देहाचा । होइं अंकित श्रीगुरुचा । भूषविं हरिवर्णनिं वाचा । विवरीं सत्पथ सुजनांचा । नश्वर त्यजिं विषयांचा छंद ॥ना०॥२॥
परधन आसक्ती सोडीं । घेईं स्वस्वरुपीं गोडी । वासना विषयांची मोडीं । टांकीं देहभान खोडी । सत्वर तोडीं हा भव बंध ॥ना०॥३॥
आठवीं पितृ जनक चरणा । ठेविं त्यां समचि सदाचरणा । य़ेउनी श्री हरिला करुणा । सुचविल उपाय भवतरना । नुरविल देह बुद्धिचा गंध ॥ना०॥४॥
अतिथी अभ्यागत सदनीं । येतां त्यां बहु सन्मानीं । छळिं न त्यां सेवासम मानी । पुण्य बहु अन्न उदक दानीं । तोषविं प्रेमें सज्जन वृंद ॥ना०॥५॥
आहे तितुकें देवाचें । वर्तन ठेविं निश्चयाचें । असें हें वचन समर्थांचे । झळकत दासबोधिं सांचें । सद्वचसेवनिं नच निर्बंध ॥ना०॥६॥
माझ्या सद्गुरुनीं मजला । शिकविलें कथिलें तें तुजला । कृष्ण सुत विनवि सुजनाला । घ्या या पदरीं दासाला । नसे अधिकार खरा मतिमंद ॥ना०॥७॥
श्लोक
मी माझें हरि विघ्न जो गणपती श्रीराम सीतापती । श्रीमद्वैष्णव कृष्ण सद्गुरुवरां वंदुनियां निश्चितीं ॥ जें बोधामृत पाजिलें गुरुवरें पूर्णकृपेनें मला । त्या बोधा कथितों सुयोगचि पहा राधे तुला लाभला ॥१॥
राधा नाम तुझें वरूनि सुयशा बाधा भवाची हरी । साधाया हित राम देव गुरुची तूं नित्य सेवा करी ॥ साध्वी धन्य पतिव्रता ह्मणवुनी घे सज्जनाच्या मुखें । कृष्णानंदपदीं सदैव रमुनी सौभाग्य भोगीं सुखें ॥२॥
माझ्या सद्गुरुनीं मला शिकविलें कीं संतसंगा धरीं । कोणाचें दुखवीं न चित्त सुख त्यां तूं अन्नदानें करीं ॥ यद्दाना सम अन्य दान न जगीं जाणूनि शांती वरीं । जी प्राप्त स्थिति तीच सौख्यकर हें मानूनि राहें बरी ॥३॥
हरिभजन करावें तीर्थ यात्रेसि जावें । न विषय विष प्यावें साधु संतां नमावें ॥ स्वसुख रत असावें चित्त रामीं वसावें । गुरुचरणिं जडावें मानसा आवडावें ॥४॥
सकल जन सुखाचे जे दिल्या घेतल्याचे । पुरति जरि मनाचे हेतु तैं चित्त नाचे ॥ निखिल जग असें हें यांत माझा न कोणी । परम कठिण काळीं सोडवी चक्रपाणी ॥५॥
वैराग्या परतें न भाग्य कथिलें जें सद्गुरूंनीं पहा । आला प्रत्यय कीं न चित्त विषयीं रंगे महा लाभ हा ॥ जी प्राप्त स्थिति गोड तीच गमते ही राघवाची दया । जी वृत्ती करि पात्र जन्ममरणा ती जाहली चिन्मया ॥६॥
स्वसुखमय दिसे हें सर्वही विश्व मातें । सकळहि व्यवहारीं सौख्य वाटे मनातें ॥ सदय गुरुवरें ज्या बोधिलें साधनाला । दृढ धरुनि मनी त्या लाधलों या पदाला ॥७॥
जननि जनक राधा कृष्ण माझ्या जिवाचे । हरिति भय भवाचें नाम गातांचि वाचे ॥ अनुभव सुख माझें बोलतां कंठ दाटे । तनु मन धन सारें सद्गुरूरूप वाटे ॥८॥
संतोषरूप रघुराज मनीं प्रकाशे । देहात्मभाव भवबंध समूळ नाशे ॥ आनंदपूर्ण तरि चिंतन चित्त सोडी । वाटे न त्या कधिंच या विषयांत गोडी ॥९॥
निवांत जागीं करिं या विचारा । प्रपंच हा दुःखद जाण सारा ॥ चित्तास शांती तिळमात्र नाहीं । याचें असे ह्या परि रूप पाहीं ॥१०॥
अशा या संसारीं रत मनुज भोगूनि विषयां । सदां मोहीं गुंते नच कधिं मनीं मानि विषयां ॥ घरीं आला कोणी अतिथि तरि त्या दे न कवडी । कुसंगानें ऐसा फुकटचि पहा काळ दवडी ॥११॥
हा पापी नर जाउनी यमपुरीं भोगी बहू यातना । दुष्कर्मीं वय घालवी प्रतिदिनी ज्याची कुडी वासना ॥ राधे काय वदूं तुला, पशुचि ते जे यापरी वागती । झाले धन्य सदा विमुक्त जन जे संतांपदीं लागती ॥१२॥
असो इतर या कथा हृदयिं सत्पथा तूं वरीं । सुसंगति धरीं सदा कधिं न तूं अकार्या करी ॥ तरी प्रिय तूं राधिके रघुपतीस होसी पहा । हरूनि दुरितें तुझीं करिल तो सुखी पापहा ॥१३॥
बहुत सुख मिळावें सर्वही दुःख जावें । विविध विषय भोगीं सर्वदा कीं रमावें ॥ अशिच सकळ जीवां वासना मानसीं ती । परि न घडत ऐसें ही जगाचीच रीती ॥१४॥
विषय नश्वर हें सकळां कळे । परि न वृत्ति सुख स्वरुपीं वळे ॥ पडति मृत्यु मुखीं जन पाहती । तरि हि त्यांतचि लोळुनि राहती ॥१५॥
पडे विस्मृती राघवाच्या पदाची । मला वाटतें ती खरी आपदाची ॥ घडी एक जो रामराया न सोडी । तया देतसे तो निजानंद गोडी ॥१६॥
विअराग्या परतें न भाग्य वदती जें संत साधू मुखें । सत्यत्त्वें मनुजें मनी धरुनि तें लोकीं रहावें सुखें ॥ ऐसा लाभ दुजा नएस नर तनू जी राघवें दीधली । झालें सार्थक ती जरी निशिदिनी त्याच्या पदीं लागली ॥१७॥
घडी आयुष्याची बहुत धन देतांहि न मिळे । असा जातो व्यर्थ प्रतिदिनिं कसा काळ न कळे ॥ मुखें निंदी संतां परि नच अनंता मनिं धरी । अशा या पापानें मिळवि नर तो दुर्गति खरी ॥१८॥
न कोणी कोणाचा सकळ सुख शोधीत फिरती । जरी लाभे पूर्ण स्वसुखतरि त्या वृत्ति विरती ॥ करावें अभ्यासा गुरुचरणिं विश्वास धरुनी । स्मरावें तन्नामा घडि घडि अहंता विसरुनी ॥१९॥
मी माझें करि पत्र जन्ममरणा जो त्याग याचा करी । तो ज्ञानी गुरुभक्ति युक्त गमतो निष्ठा जयाची खरी ॥ जे जे वृत्ति उठे तिला मिळवि जो आत्मस्वरूपीं बरी । राहे यापरि धारणा धरुनियां तो विश्व हें उद्धरी ॥२०॥
प्रपंच वाटे जरि गोड व्हावा । निष्कारण क्रोध मुळीं त्यजावा ॥ हें तत्त्व थोड्यांतमनीं पटेना । बैसे अहंवृत्ति न ते उठेना ॥२१॥
कुटुंबी जनी राघवाच्या चरित्रा । मनी आठवावें कृती ती पवित्रा ॥ सदा पूर्ण कल्याण होईल जाणा । स्वभक्ताभिमानी प्रभू रामराणा ॥२२॥
दिलें वचन एकदां रघुवरें जयासी पहा । असत्य न करीच तें जगिं अशीं सुकीर्ती महा ॥ तशीच वनिता सती जनकजा तिच्या वांचुनी । स्त्रिया सकळ मानितो जननि त्या मना पासुनी ॥२३॥
रामावतार सकळां बहु पूज्य वाटे । आदर्शभूत अति तत्तम दावि वाटे ॥ दे भुक्ति मुक्ति शरणागत जो तयाला । सांगें कसा विसरुं या तरि दातयाला ॥२४॥
अदृष्टें जयां लाभलें अन्न पाणी । न व्हावें तयां नम्र जोडूनि पाणी ॥ सदा जानकीनाथ चित्तीं धरावा । प्रयत्नें तया आपुलासा करावा ॥२५॥
विपत्काळीं माझ्या परमसदयें सद्गुरुवरें । फिरावी गे त्यांच्या करुनि कविता श्रीयुत घरें ॥ न कोणी तो पावे मग भजन भावें प्रभुवरा । दिल्या हाका आला रघुपति दयासागर खरा ॥२६॥
मुनिजन सुखकारी सर्व संतापहारी । जनन मरण वारी राम कोदंडधारी ॥ दशवदन विदारी जो स्वभक्तांसि तारी । निशिदिनिं मदनारी गात ज्या प्रेमभारी ॥२७॥
चरित्र माझ्या प्रभु राघवाचें । गातां मुखें नाम नुरे भवाचें ॥ या प्रत्यया घेउनियां पहावें । साधूनि हा योग सुखें रहावें ॥२८॥
माते समान परनारि सदा पहावी । हें दिव्य तेज पुरुषां रघुराज दावी ॥ बापा समान नर अन्य तुह्मीं विलोका । सीता स्त्रियांसि शिकवी हरि दुःख शोका ॥२९॥
मोठें धैर्य तिचें पहा स्वभजनीं नेतां दश्यास्यें तिला । केले यत्न परंतु जाण वश ती झालीच ना त्या खला ॥ चित्तीं ध्यान धरूनियां स्वपतिचें षण्मास ते राहिली । भेटे राम तिला वधी दशमुखा कीर्ती जनी गाइली ॥३०॥
स्त्रियांसि शिकवी सती जनकजा पतीसी भजा । सदा चरणतीर्थ घ्या न मनिं देव माना दुजा ॥ तप व्रतहि सर्व तें पति पदींच वासा करी । ह्मणूनि नियमें करा अति पवित्र ही चाकरी ॥३१॥
धंदा तो करितां सदा उबगला आला घरीं बैसला । ऐशा या पति मानसासि निववी जी धन्य मानूं तिला ॥ थोड्या त्या चवताळती पतिवरी क्रोधें जशा वाघिणी । त्यां धिःकार असो मला गमतसे त्या चाविर्या नागिणी ॥३२॥
प्रेमें सदा जे सुखवी पतीला । असो नमस्कार तया सतीला ॥ ते देवता धन्य गमे मनाला । सुमार्ग दावी सकळां जनांला ॥३३॥
पाळावें व्रत एकपत्नि पुरुषें प्रेमें मनापासुनी । दीक्षा एकचि हे सुकीर्ति फलदा जाती अघें नासुनी ॥ तैसी ते सदनीं सती पतिरता अन्या नरा बापसा । मानी या सुतपें प्रसन्न भगवान् सोडील त्यांला कसा ॥३४॥
सती सीतादेवी पतिचरण भक्ती करुनियां । जगद्वंद्या झाली तरति जन नामा स्मरुनियां ॥ तिला तो वामांकीं धरुनि बसला श्रीरघुपती । अशा गोड ध्याना स्व अमनिं वरुनी भक्त तरती ॥३५॥
शिकविलें सकलां करुणाघनें । सुजन हो तुम्हि या परि वागणें ॥ मग सुकीर्ति यशासि उणें नसे । सुविमळा कमळा हृदयी वसे ॥३६॥
चित्तैक्यें पति पत्नि नांदति जरी त्या पार सौख्यानसे । वैकुंठीं नरमाप्रबुद्ध वदती त्यांच्या घरीं ती वसे ॥ प्रेमानें हरिनाम नित्य वदनीं गाती तयां श्रीहरी । रक्षी देउनि अन्न वस्त्र सुयशा अंतीं गती दे बरी ॥३७॥
बंधुधर्म सकळां भरतानें । दाविला स्वसुख लाभ रतानें ॥ स्वामि सेवक नया विनयानें । बोधिलें वर मरुत्तनयानें ॥३८॥
बंधु प्रीति जरी घरीं बसतसे कांहींच त्याला उणें । नाहीं हें शिकवी जना भरत तो जो शोभला सद्गुणें ॥ श्रीमद्राघव काननांत असतां जीं जीं व्रतें आचरे । तीं तीं सर्वहि तो असूनी सदनीं सप्रेम पाळी बरें ॥३९॥
दशरथा परि राघव मानितो । कधिं न त्यासि पहा अवमानितो ॥ भरत बंधु समान दुजा नसे । जगतिं या मज सत्य गमे असें ॥४०॥
सुनिर्मळ करा मना विषय वासना सोडुनी । सुबंधु जनहो तुम्हां विनवितों करां जोडुनी ॥ अखंड सुख व्हावया सदनिं एक चित्तें रहा । सुकीर्ति मिळवा खरा सुजन बोलती लाभ हा ॥४१॥
श्री मारुती सांगत दास लोकां । न वेतना त्या तुम्हिं चित्तिं लेखा ॥ स्वामी पुढें नम्र सदा असावें । अन्य स्थळीं मानस तें नसावें ॥४२॥
स्वामी ईश्वर मानुनी निशिदिनी कार्यासि राहे पुढें । देहाची ममता उडे सुजन तो जाई न कोणीकडे ॥ जाणे एकचि चाकरी नच कधीं मानापमाना पुसे । ऐसा सेवक लाभला तरि उणें स्वामीस कांहीं नसे ॥४३॥
फळें सेवी श्रीमत्पवन सुत तो जाउनि वनीं । करी सेवा भावें दशरथ सुताची गुणखनी ॥ प्रतापाची राशी सकळ अघनाशी कपिपती । चिरंजीवी झाला निजपद रतां देत सुगती ॥४४॥
स्वामी त्या विकळा अनंत सुख दे सन्मान त्याचा करी । ऐसी होय फळप्रदा मज गमे त्या सेवका चाकरी ॥ निष्ठा एकचि सर्व कार्य करिते ऐसी तिची थोरवी । ती प्रेमें वरितां मनांत धरितां सत्कामना पूरवी ॥४५॥
ऐसें दिव्य चरित्र तो रघुपती श्रीसद्गुरूनीं घरीं । प्रेमें आणियला करूनिभजना भक्तिप्रिय श्रीहरी ॥ केलें पूर्ण सुखी तयां भवभया वारूनि सिंहासनीं । बैसे ध्यान अखंड चित्तिं धरितां जाती अघें नासुनी ॥४६॥
उपासना जो करि राघवाची । भीती न त्या चित्तिं कधीं भवाची ॥ आत्मानुसंधान बळें तयाला । न वासना बंध सुखें निवाला ॥४७॥
दाता श्री रघुराज एक कथितों मी घेउनी प्रत्यया । माझ्या सद्गुरुनीं मला निरविलें जातां स्वधामीं जया ॥ केलें पालन पोषणा आजवरी ऐसा दयेचा निधी । जो त्याच्या पदिं चित्त अर्पण करी त्या तो न सोडी कधीं ॥४८॥
सासू श्रीजनकात्मजा बघ तुझी श्रीराम तो सासरा । देईल स्वपदीं तुला भवभया वारूनि जो आसरा ॥ त्याच्या वांचुनि अन्य दैवत नसे निष्ठा धरीं अंतरीं । सेवा त्या प्रभुची करीं निशिदिनीं जो सर्व दुःखें हरी ॥४९॥
देवा समान पतिला निज चित्तिं मानी । सेवा करूनि सुखवी न कदापि हानी ॥ अभ्यागतांसि बहु तोषविं अन्नदानीं । राधे फळेल तव हेंचि तुला निदानीं ॥५०॥
रामाचें निजरूप सद्गुरुवरें श्रीस्वात्मतत्वामृतीं । केलें स्पष्ट पहा मनीं धरुनियां श्रद्धा बरी निश्चितीं ॥ वाटे ग्रंथ लहान पूर्ण परि तो विश्वीं असे व्यापला । आत्मानात्म विचार नित्य करुनी घे शोध तूं आपला ॥५१॥
जें रामतत्त्व कथिलें मज सद्गुरूनीं । राधे करीं श्रवण तच्चरणा स्मरूनी ॥ एकाग्र चित्त करिसी तरि लाभ याचा । होईल जाण मग लेश नुरे भयाचा ॥५२॥
आसक्ती त्यजुनी प्रपंच करितां चिता न बाधा करी । साधाया हित आपुलें मज दिसे ही सज्जनोक्ती खरी ॥ गेलें होउनि काय हो आजवरी होईल कैसें पुढें । चिंता हे न करीं असंग मन हें होतां स्वरूपीं जडे ॥५३॥
राधे भाग्य तुझें अपार ह्मणुनी हें स्थान लाभे तुला । सेवा त्या प्रभुची अखंड करुनी घे साधुने हेतुला ॥ येतां दीन अनाथ पंगु सदनीं सप्रेम भावें तया । सन्मानें करिं अन्नदान सुकृत असीमाच नाहीं यया ॥५४॥
मुकुंदराजा प्रिय तूंचि माझा । त्त्वद्देह लावीं हरि भक्ति काजा ॥ अखंड भक्ती करिं राघवाची । आज्ञा अशी प्रेमळ सद्गुरूंची ॥५५॥
श्रीदासबोधा प्रति तूं न सोडीं । रामा पुढें बैसुनि घेइं गोडी ॥ माता पिता राघव हेचि मानी । त्या वांचुनी कोणि नसे निदानीं ॥५६॥
जाईं शरण संतांसी । विचारीं तत्व हें तयां ॥ कथितील तुला सारें । भवाच्या हरुनी भया ॥५७॥
सद्गुरू बोलिले बाळा । यापरी जरि वागसीं ॥ होसी कृष्ण जगन्नाथा । अत्यंत प्रिय मानसी ॥५८॥
प्रेमें बाळपणीं मला गुरुवरें, ऐशापरी बोधिलें । आशिर्वाद वदूनि चित्त जवळीं घेऊनियां शोधिलें ॥ झालें चित असंग चिन्मय नसे कांहीच चिंता मला । राधे जें मज पूर्ण सौख्य दिधलें तें काय सांगूं तुला ॥५९॥
हा बोध तारक करूनि परंपरेला । देहात्मताजनित तो भ्रम दूर केला ॥ ऐसा पिता जगिं सुदुर्लभ चित्तिं वाटे । आनंद अंतरिं तयां स्मरतांचि दाटे ॥६०॥
आज्ञा सद्गुरुची मनीं धरुनियां तैशा परी वागलों । झालें प्राप्त असंग शस्त्र ह्मणुनी दुःखें न मी भागलों । श्रीरामीं मन रंगलें सकळही सृष्टी सुखाची दिसे । या तत्वा गुरुभक्त जाणति जयां श्रद्धा गुरूक्तीं असे ॥६१॥
राधे ते एकट्याला मजचि करुनि हा बोध गेले न मानी । जेजे आहेत होती स्वकुळिं सकळ त्यां बोलिले मोक्षदानी ॥ कृष्णानंदासवें तूं हृदयिं धरुनियां प्रेमवाक्या तयांच्या । स्वानंदीं मग्न होईं स्मरुनि निशिदिनी गोड नामा प्रभूच्या ॥६२॥
ज्या वासना उठति अंतरिं मूळ त्यांचें । सच्चित्सुखस्वरुप आपण एक साचें ॥ अभ्यास साधक जरी करि या परी तो । आत्मैक्य चिन्मय निवृत्ति पदावरी तो ॥६३॥
निवृत्ति सुख जें स्फुरे स्वरुप आपुलें तें पहा । अलक्ष अवलोकुनी उलट दृष्टिनें तूं रहा ॥ नसे कधिंच नाश त्या सुजन राम हे बोलती । वरूनि हृदयीं तया अनुभवें सदा डोलती ॥६४॥
ग्रंथ श्री गुरुबोध सद्गुरुवरें प्रेमें करूनी मला । स्वप्नीं देउनि दर्शना लिहविला तारील तो कीं तुला ॥ त्या ग्रंथीं रघुराज रूप कधिलें एकाग्रचित्तें पहा । अभ्यासा करुनी सुखस्वरुप तूं होऊनि आंगें रहा ॥६५॥
केला हा उपदेश निर्मळ मनें जो राधिके मी तुला । प्रेमें वागवुनी सदोदित मनीं त्वां उद्धरावें कुला ॥ साराचें निजसार नाम हरिचें त्याची असो दे स्मृती । त्या वांचूनि नसे गती सुजन हें अत्यादरें बोलती ॥६६॥
उत्कंठा मानसी ही बहुत दिन वसे तीर्थ यात्रेसि जावें । भावें संतां नमावें त्यजुनि सकळ हें साधु संगीं रहावें ॥ आला तो योग आतां दिसत मज असे राधिके येतसें मी । कृष्णानंदीं सदा हो रत खचितचि तूं पावसी सौख्य धामीं ॥६७॥
कृष्णानंद तशीच तूं उमयतां नांदा सुखानें सदां । साधा श्रीहरि भक्ति तो रघुपती लागों न दे आपदा ॥ आशीर्वाद असा वदूनि गुरुच्या पायांसि मी लागतों । या विश्वासि सुखी करीं चरणिं त्या प्रेमादरें मागतों ॥६८॥
गुण बाणाष्ट भूशा कीं श्री प्रजापति वत्सरीं । उपदेश तुला राधे केला तो हृदयीं धरीं ॥६९॥
इत्युपदेश संपूर्णम्
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP