( पै. शि. ला. आतार )
शक ११०० पासून शक १७४० पर्यंत महाराष्ट्रांत जवळजवळ ७०० वर संतकवि झाले व त्यांनीं काव्यवाड्मय पुष्कळ निर्माण केलें. त्यांत कांहीं मुसलमान संतकविहि होते. शेख महंमद, शेख सुलतान, काजी महंमद, जिंदो फकीर, दादू पिंजारी, शेख फरीद फाजिलखां, महंमदबाबा, शाहाबेग प्रभृति पन्नास साठ मुसलमान कवींची व त्यांच्या कृतींची आपणांस माहिती झाली आहे. नवीन नवीन मुसलमान संत - कवींचा व त्यांच्या कृतींचा शोध आपणांस लागत आहे. हे जे पूर्वकाळीं मराठी भाषेचे मुसलमान साहित्यसेवक होऊन गेले ते सर्व किंवा त्यांपैकीं बहुतेक विठ्ठलभक्तीनें प्रेरित झालेले असल्यामुळें त्यांची कविता बहुतेक विठ्ठलभक्तिपरच आहे. आमच्या ह्या कवींनीं वैष्णव कवींचें अनुकरण करून ही रचना केली आहे. त्यामुळें ती एक प्रकारें हिंदूंचीच ग्रंथसंपत्ति आहे हें उघड आहे. तींत मुसलमानांच्या विचाराचें, भावनेचें किंवा संस्कृतीचें प्रतिबिंब नाहीं. यामुळें त्या साहित्याला मुसलमानांचें जातीय साहित्य म्हणतां येत नाहीं. ती रचना मुसलमानांनीं केली आहे, म्हणून त्याला मुसलमान साहित्य म्हणजे मुसलमान - द्वारां निर्माण झालेलें साहित्य, हवें तर म्हणतां येईल. पण तें आमचें जातीय साहित्य नव्हे. आमचें जातीय साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्वीं झाला नाहीं, असें नाहीं. कांहीं मुसलमान कवींनीं हिंदुशाहीर वर्गाचें अनुकरण करून मोहरमच्या सणांत ‘ करबल ’ मध्यें म्हणण्याकरितां “ रिवायती ” म्हणुन एक प्रकारचीं कवणें रचलेलीं आहेत. तीं पद्यें नाना प्रकारच्या चालींवर केलेलीं असून त्यांमध्यें करुण व वीर हे रस भरलेले आहेत. त्यांत अली खलिफांचे पुत्र व महंमद पैगंबराचे नातू हसन - हुसेन यांनीं करबलाच्या रणक्षेत्रावर यजदशीं जंग करून धारातीर्थीं देह ठेवला त्याचें चित्ताकर्षक हृदयंगम वर्णन आहे. तें साहित्य मुसलमानांचें जातीय साहित्य होय.
आपले इकडे मोहरमच्या सणामध्यें मुसलमान लोक ताबूत काढतात व कोठें कोठें त्याबरोबर नालपीर व पंजेहि बसवितात. या मोहरमच्या दहा दिवसांत सोंगें, खेळ, मेळे वगैरे काढतात. मोहरमांतील हे मेळे म्हणजे ‘ करबल ’ चा खेळ होय. त्या करबलांत टिपर्यांच्या तालावर हसन - हुसेन त्यांनीं यजिदाशीं जो युद्धप्रसंग केला. त्याच्या वर्णनाचीं पद्यें म्हणतात. अरबी भाषेंत करबला येथील रणसंग्रामाचें यथातथ्य वर्णन करणारें “ जंगनामा ” म्हणून एक वीर व करुणरसप्रधान काव्य आहे. त्याचें उर्दूंतहि भाषांतर झालेलें आहे. त्या काव्यावरून आमच्या महाराष्ट्रीय मुसलमान कवींनी ह्या रिवायती रचलेल्या आहेत व त्या या मोहरमच्या उत्सवांत म्हणत असतात.
ह्या मोहरमच्या उत्सवाचे चाल आमच्या हिंदुस्थानांतच आहे. इतर मुसलमान राष्ट्रांत त्याचा फारसा बोलबाला नाहीं. हिंदुस्थानांत मूळे ही चाल बाबर बादशहानें पाडली. बाबर हा सुन्नी पंथी मुसलमान बादशहा असून हसन - हुसेनांचा भक्त होता. तो तुर्कस्थानांत असतांना दरसाल करबलाच्या रणक्षेत्रांतील हसन - हुसेनांच्या तुरबतीचें दर्शन घेण्यास जात असे. पुढें तो हिंदुस्थानांत आल्यावर त्याला तिकडे जाण्याचें जमेना. म्हणून त्यानें हसन - हुस्नांच्या तुरबतेचीं प्रतिमा काडेहून ती जाहीर रीतीनें मिरविण्यास प्रारंभ केला. त्याचें रूपांतर सांप्रतचे ताबूत होय. त्यांत नंतर आमोद - प्रमोदाकरितां सोंगें, खेळ, मेळे व हैदोसचा खेळखंडोबा यांची भर पडली. या उत्सवांत देवांच्या म्हणून कांहींतरी प्रतिमा पाहिजेत म्हणून पंजे व नालपीर यांची योजना करण्यांत आली. पंजे म्हणजे हसन - हुसेनची आई बिबी फातिमा यांच्या हस्ताची निशाणी व नालपीर म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या नालांची प्रतिमा होय. या मूळ घटनेवर या सर्व खेळाची उभारणी आहे. हा मोहरमचा प्रकार सर्वसामान्य मुसलमान लोकांना प्रिय असला, तथापि तो विद्वान्, समंजस व ज्ञात्या पुरुषांना मान्य नाहीं. इतकेंच नाहीं तर हसन - हुसेनच्या पवित्र नांवाखालीं हा जो प्रकार चालतो त्यास ते लोक “ मोहरमचा शिमगा ” असेंच संबोधितात. अस्तु. त्यांत म्हटल्या जाणार्या रिवायती आपल्यापुढें मांडण्याचें ठरविलें आहे.
ह्या रिवायती आपणाला भाषेच्या, काव्याच्या, इतिहासाच्या, समाजसंस्काराच्या व अध्यात्मशास्त्राच्या अशा सर्व दृष्टीनें उपयोगी होतील. यांची भाषा म्हणजे मुसलमानी - मराठी अशी खिचडी भाषा आहे. काव्य कारुण्य व वीर ह्या रसांनीं भरलेलें असें आहे. त्यानें सामान्य श्रोत्यांस तर चटका लावून सोडलाच आहे पण गोषांतील मुसलमान स्त्री - समाजावरहि त्यांचा कांहीं थोडा परिणाम झालेला नाहीं. त्याही त्यांचें श्रवण करून ढळढळ अश्रू गाळतात. इतिहासाच्या दृष्टीनें पहातां महंमद पैगंबर, अली खलिफा आणि त्यांचें कूळ यांचा समग्र इतिहास त्यांत ग्रथित झालेला आहे. समाजसंस्काराच्या दृष्टीनें पाहतां त्यांत पितृमेम, पुत्रप्रेम, भ्रातृप्रेम, मातृप्रेम, कर्तव्यप्रेम इत्याइ उच्च भावनांचा कितीतरी परिपोष झालेला आहे. अध्यात्मशास्त्राचे दृष्टीनें पाहतां त्यांत कित्येक गूढ प्रमेयें प्रतिपादिलेलीं आहेत व त्यांचें रहस्यहि कथन केलें आहे. हें ह्या मुसलमान साहित्याचें म्हणजे रिवायतींचें सामान्य स्वरूप आहे. तें आतां आपणापुढें सोदाहरण स्पष्ट करितों.
(१) हिंदू लोक धर्मकार्यामध्यें किंवा कोणत्याही समारंभामध्यें प्रारंभीं देवदेवतांस नमन करतात. तसे मुसलमान लोक आपल्या कार्याच्या आरंभीं पूज्य पूरुषांना सलाम करतात. त्या सलामीची रिवायत पहा -
श्री प्रथम बिसमिल्ला ॥ वंदितो मी भगवानाला ॥ परमेश्वराच्या मित्राला ॥ दरुद सलाम बिसमिल्ला ॥ होते त्यांच्या हो कचेरिला ॥ आबा बखरो आलिमौला ॥ उमर खताब उसमान आल्ला ॥ दरुद सलाम बिसमिल्ला ॥ शरण येऊन चरणाला ॥ आर्ज्य हाय माझा तुम्हाला । हासन हुसेन बंधुला ॥ दरुद सलाम बिसमिल्ला ॥ सलाम सार्या हो मंडळीला ॥ फकिर आवतरि विषफल्ला ॥ सदरा ईसबुचा केला ॥ दरुद सलाम बिसमिल्ला ॥ शर्ण माता हो पितराला ॥ गुरु आणि माझ्या वस्तादाला ॥ आबदुल म्हणे राज्य भास्कराला ॥ दरुद सलाम बिसमिल्ला ॥ x x x x
(२) इसः क आल्ला मुनो फकरुल्ला ॥ सलाम मुजरा ज्यय आला ॥ पडो आले नबीरपसल्लेला ॥ नबिपर सल्लेला ॥ इत्यादि ॥२॥ x x x x
(३) प्रथम सलाम नबीसाहेबाला ॥ कन्या हो त्याची बिबी फातमेला ॥ बिबिफातिमाला, मौला आलिला, हासन हुसेन दोघे बंधूला मा व या बंधु मौला आलिला ॥ त्याच्या पोटीं एक पुत्र जन्मीला ॥ पुत्र जन्मीला ॥ तो काळ झाला, हासेन - हुसेन दोघे बंधूला । बंधु होता तोची दुश्मन झाला ॥ आन त्याचे खाऊन परतुन पडला ॥ परतुन पडला, मुनकिर झाला, बापानें नांव त्याच यजिद ठेविला ॥३॥
शाहे हासनसाब वडिल बंधूला ॥ येजिद मुनकिर वैरि साधिला ॥ वैरि साधिला, विष घातला, प्रतिवादि धनि गादिचा गेला ॥४॥
शाहे हुसेनसाब धाकट्या बंधुला ॥ माया लाऊन त्यानं करबला न्हेला ॥ करबला नेला, फितुर केला, दहा दिवस पाणि न्हाई त्यानें दिला ॥५॥
तान लागली सार्या मुलामानसाला ॥ यजि पाणी दिनासा झाला ॥ देईनासा झाला, नदिवर गेला, फौजेसि आपुल्या ताकित केला ॥६॥
शाहे हुसेन साब निघाले नदिला ॥ पाहुन यजिद एक तिर सोडिला ॥ तिर सोडिला, साहेबासिं चुकला, गुल तेरे आसगर तान्या बाळाला ॥७॥
तिर लागुन प्राण बाळाचा हो गेला ॥ दुःख झालें हो सार्या लोकाला ॥ सार्या लोकाला ॥ लाऊन गळ्याला, माता हो रडती मारून उराला ॥८॥
आंगरखे टोपडे र्याहिले खुंटिला ॥ रंगित पाळणा हालक कोनाला ॥ हालऊ कोनाला, सरदार बोला, मजिसंगे बाळा हा कां तुम्हि रुसला ॥९॥
मांडिवर घेतले नाहीं कांरे तुला ॥ दुधानें उर माझा आवळुन गेला ॥ आवळुन गेला, पाजु कुनाला, कसले संकट वेळ तुझ्यावर घडला ॥१०॥
तिरानें फाटिला नाजुक गळा ॥ कसा उपडीलास कोंब माझा कवळा ॥ कोंब माझा कवळा, येजिद काळा, तोंड उघडु बोल माझ्या तू बाळा ॥११॥
कसे विसरू माझ्या तान्या तू मुला ॥ तुझ्या गोर्या मुखावर घाम किर आला ॥ घाम किर आला, कुठें पाहुं तुला हारनिच्या बाळा हा । कां तुम्ही रुसला ॥१२॥
उद्रिष्ट ब्रह्म्यानें जे लिहिलेला ॥ होणार गत कुठें नाहि चुकवीला ॥ नाही चुकवीला ॥ होणार हुयाला ॥ सांगतो ऐका हो सार्या सभेला ॥१३॥
दुःखाची बयान बसकर अबदूल्ला ॥ ठिकाना कागंवाडचा तो र्हाणेवाला ॥ र्हाण तो वाला, सलाम सभेला, शादावल्ली प्रसन्न होवो आम्हाला ॥१४॥
यांत करुणरस भरलेला आहे. अशी करुणगीतें पुष्कळच आहेत. आतां रूपकात्मक सलामाचा नमूना पहा :-
प्रथम सलाम सर्वाला ॥ लहान थोर सार्या सभेला ॥ चित्त देऊन ऐका ह्याला ॥ सत्तगुरुच्या वचनाला ॥१॥
फकिर झालो मि मोहरमचा ॥ प्रवरते शाहे हुशेनीचा ॥ निवरति आहे निरंजनाचा ॥ फकीर मी सात दिवसाचा ॥२॥
घालून विरशाचा लंगोटा ॥ घेऊन हिमतीचा हाती सोटा ॥ ध्यान नामाचा आहे मोठा ॥ भक्ति जपमाळ घेऊन बोटा ॥३॥
सयलि आमुची पंचरंगी ॥ झोळी हाजार ठिगळाची ॥ लाऊनि राख दर्शनाची ॥ धुनि लाविलि मी पंची ॥४॥
मी पंची केलि धुनी ॥ मोडुन घेतल्या सात शेनी ॥ पंच रस करुनिया अगनी ॥ निरंकार पेटलि धुनी ॥५॥
इरादा एक आहे आमुचा ॥ निघुन करबला जाण्याचा ॥ हुकुम घेऊन नबाबाचा ॥ अंतरि भेद समज ह्याचा ॥६॥
गरिब आबदूल असे म्हणि ॥ घ्याव गुरु पुत्र समजोनि ॥ आरेकाच्या च्याहो मैदानि ॥ येऊ आला वा खेळुनी ॥७॥