विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( श्री. पां. मा. चांदोरकर )
सदरची पोथी लहान आहे. तिच्या आदी व अंतीं कवीनें आपलें नांव “ कवि विप्र गोविंद ” वा ‘ विप्र गोविंद ” असें दिलें आहे. पोथी ६ बोटें रुंद व १२ बोटें लांब आहे. कागद जीर्ण झालेला आहे. एकंदर ५ पानें म्हणजे १० पृष्ठें आहेत. पैकीं १० वें पृष्ठ कोरें असून नवव्याच पृष्ठावर ग्रंथ संपविला आहे. ग्रंथाच्या एकंदर स्वरूपावरून ग्रंथ येथेंच संपला नसावा, पुढें चालूं असावा, असें मानण्याकडे प्रवृत्ति होते. पण नवव्या पृष्ठावर २८ आंकड्याच्या पुढें छकार काढून पुढें लेखन केलेलें नाहीं, बरें, तेथें कोठें ग्रंथाचा समाप्तिदर्शक शब्दहि नाहीं, तेव्हां साहजिकच अनुमान होतें कीं, ग्रंथ पुढें सुरूं असावा. आतां कदाचित् सदरहू लेखक तो पुढचा मजकूर लिहिण्यास विसरला असेल अगर दुसर्‍या निराळ्या पानावर लिहिला असेल.
या ग्रंथाचा एक विशेष आहे, तो मात्र आजपर्यंत माझ्या पहाण्यांत कोठेंही आला नव्हता. चोंभा कवी किंवा माहानुभावी, मानभवी ग्रंथकर्ते आपल्या ओंव्या गणतां धांवत्या गणतात; म्हणजे प्रत्येक अध्यायाला पहिल्यापासून पुन्हां सुरुवात न करितां, पहिल्या अध्यायाच्या शेवटीं जर ३१४ ओंव्या झाल्या असतील तर दुसर्‍या अध्यायाच्या आरंभींच्या ओंवीला एकाचा अंक न लिहितां ३१५ हा अंक लिहितात. ही रीति आपल्या अवलोकनांत आहे. पण आजच्या या ग्रंथकाराची ओंवी - गणनपद्धति फारच विचित्र आहे. तीन तीन अगर चार चार ओंव्या झाल्या म्हणजे अंकाचा आंकडा घातला आहे. क्कचित् पांच ओंव्या झाल्यावरसुद्धां अंक मांडला आहे. चुकून असें झालें असेल असें म्हटल्यास तें खरें दिसत नाहीं, कारण आरंभापासून शेवटापर्यंत हीच पद्धति एकसारखी स्वीकारलेली आहे. असो.
पोथीचा विषय शिल्पशास्त्राचा आहे. ग्रंथ लहानसाच आहे. महाराष्ट्र कवींनी नुसत्या आध्यात्म -  वेदांतावरच काव्य केलें असा जो त्यांच्यावर इतिहासनभिज्ञ लोकांचा कटाक्ष आहे तो वृथा आहे, हें सिद्ध करण्याकरितां गुरुवर्य राजवाडे यांच्या जवळील ज्योतिष, औषधी, वैद्यक, शालिहोत्र वगैरे विषयांवरील अनेक ग्रंथांचा संग्रह बस्स आहे, तसाच हाहि ग्रंथ, वरील कटाक्ष वृथा ठरविण्यास सहायक आहे. संशोधन केलें पाहिजे आणि संग्रहकार जाणता म्हणजे दाता अथवा प्रकाशक पाहिजे.
आतां हा कवी कांहीं मोठासा चांगला आहे असें नाहीं, एवढेंच नव्हे तर तो अर्वाचीनहि असावा असें त्याच्या काव्यावरून दिसत आहे, ( अठराव्या शतकाच्या पूर्वाधांतील कवि असावा असें मला वाटतें ). ग्रंथ लहानच असल्यामुळें तो संपूर्णच येथें दिला आहे.
कवीनें आपला काल दिला नाहीं. तसेंच त्याच्या गुरूचें नांव काय याचाहि ग्रंथांत उल्लेख नाहीं. तो ( किंवा लेखक ) “ ख ” बद्दल सर्वत्र “ ष ” च लिहितो, स्त्रियांप्रमाणें “ मागेसर, पूस, माही ” अशीं महिन्यांचीं नांवें लिहितों. “ आव ” हा शब्द या ग्रंथांत फार ठिकाणीं आलेला आहे. या “ आव ” चा काय अर्थ असावा ! काव्याची भाषा कुणबाऊ आहे. काव्याची व्याख्या याला लावल्यास हें तिच्या कितपत कसोटीस उतरेल याची शंकाच आहे. “ सेष ” शब्दहि यांत फार आला अहए, त्याचाहि अर्थ समजला नाहीं. यांत मंदिराची जी मोजणी केली आही, तसेंच घर बांधण्याबद्दल जें कांहीं सांगितलें आहे तें त्या ( शिल्प ) शास्त्रज्ञास जास्त समजेल.
आपल्यापुढें आहे तेवढ्याच ग्रंथांत घर बांधण्यास कोणच्या महिन्यांत, कोणच्या तिथीस, कोणच्या वारीं, कोणच्या नक्षत्रीं आरंभ करावा; पाया कसा खणावा, पायांत काय सांपडलें असतां त्याची घरधन्यास काय फलें मिळतात; आव (?) कसा काढावा, त्याचे प्रकार किती, त्याचीं फलें काय, पाया खणण्याचे प्रकार; स्तंभस्थापना कशी व कोठें करावी, इतके विषय आलेले आहेत. तेव्हां उघडच आहे कीं यापुढें ग्रंथ अजून आहे, येथेंच संपला नाहीं.

ग्रंथ याप्रमाणें आहे --

॥ श्री ॥
प्रथम नमूं गणा आनंदा : निर्विकारा आनंदकंदा : चैतन्यासहिता अहलादा : तुझा ठावाः ॥ तुझी कृपाशक्ती सारजा : ते नटली बरवी वोजा : पावे कविकुळाचें काजा : करी उपाव ॥ करूं सद्गुरुसी नमस्कार : त्यान्हें मज केलासे उपकार : ज्ञान देउनी साचार : भासविला देव ॥ मग नमिला विश्वकर्मा : सकळ श्रुष्ट लाविली कामा : काये सांगू त्याची महिमा : रचिली माव : ॥१॥
मंदिरें आकारिलीं देवाचीं : वेद स्तुती करिती त्याची : रचिली द्वारका श्रीकृष्णाची : इंद्रचंद्रसूर्याचीं मंदिरें केलीं : ॥२॥
तोचि विश्वकर्मा अवत्रला पवेठणीं : कोकवाढी होऊनी : च्यार सहश्र सिस्ये तयालागुनी : करिती मृत्येलोके उभवनी : ॥ कवि विप्र गोविंद बोले अमृतवाणी : विनती करी करजोडूनी : सिलपशास्त्र सांगेन प्राकृत वाणी : साधूसंताचे कृपें करुनी : ॥३॥
मंदीरें भीता घालितां मुष सेषाचें चुकविजे : भाद्रपद आश्वीन कार्त्तिकी मुष पूर्वे जाणिजे : ॥ मार्गेस्वर पुंस माहो दक्षिणे आवांकिजे : फालगुण चैत्र वैसाषीं पस्थेमे मुष टिकाविजे : ॥४॥
जेष्ठ आषाड श्रावण मासीं : मुष सेषाचें उत्तर दिसीं : मंदीरें आरंभितां सेषासीं :  चुकवावें : ॥ कवणे महीना आरंभिजे : उत्तम मधीम मास निवडीजे : तें आतां सांगेन सहजें : तुम्ही आयेकावें : ॥ चैत्र मासीं आरंभिजे : सुष संतोष होये जाणिजे : वैसाष मासीं फळ पाविजे : सत मानावें : ॥ जेष्ट मासीं जुडे संपत : आषाडीं निर्फळ नेमस्त : श्रावण मासीं फळ प्राप्त : सत जाणावें : ॥५॥
भाद्रपद महिना सर्व मुन : आस्वीनीं उपजे कळी भांडण : कार्तिकीं धन होये निर्माण : धन संपत हे प्रमाण : मार्गेस्वर मासीं : ॥६॥
पुंस महिना वर्जीत असे पूर्ण : माहो महिना टाळून : धन संपत जुडे तो महिना फाळगुण : आतां उत्तम महिना सांगेन : ॥ पाडीवा तीज पंचमी षष्ठीचा दीनमान : सपतमी अष्टमी मिळून : नवमी एकादशी पाहा विचारून : घर कीजे उत्तम दिन पाहून : ॥७॥
आतां वारभे आइका देउनी चित्त : सोम श्रुक आणि बुधवार ब्रस्पत : या चहुं वारामध्यें मंदीर कीजे नेमस्त : वरकड तीन वार वर्जित मंदिरास : ॥८॥
पूर्वा उत्तरा श्रवण : मृग अनुराधा मिळून : ये नक्षत्रीं उभवण : उभवावी : ॥ तीथ वार आणि नक्षेत्र : महिना निवडावा पवित्र : शुभ मोहुर्त्त विचित्र : जागा पाहावी : कीजे मंदीर उभवणी : काम लावावें सुदेनीं : ठाव चाळावा चहुं कोनीं : साक्ष घ्यावी : याचा सांगेन मी निवाडा : अस्ती निघती होये पभु पीडा : गुण शुभ अशुभ शुघडा : अनुभवीं : ॥९॥
निघे लोषंड काळे केश : तरी हानी होये गोत्रास : मनुसास्ती गौसींग भूस : या वस्ता निघती तरी उदास : घरधनी मरे : ॥१०॥
भस्मकूट निघे तरी अशुभ आणा मनी : सांगूं शुभ वस्ता निवडनी : रुपें तांबें पितळ सुवर्ण दिसे नयेनी : निघती घागरीया चौंहु कोनीं : ॥ इतुकी वस्ता उत्तम सुष बोगे घरधनी : वारुळ बरवें मध्य स्छानीं : याउपरी येर रचावा आव बरवा पाहुनी : षनीत लावावें शुभ लज्ञीं : ॥११॥
आइका कन्यालज्ञ आणीक व्रश्वीकलज्ञ तीसरें अवधारी चातुरा मिथुन लज्ञ : मंदीर आरंभितां हें उत्तम लज्ञ जाण : वरकड मध्येम लज्ञ पाहा विचारून : ॥१२॥
प्रथम घर स्वामीचे हातीं : आव पाहावा बरवे रीती : मंदिर मोजावें निगुती : दीर्घ विस्तीर्ण : च्यार्‍ही कोपरे मोजिजे : त्याची त्रिगुण वाढवीजे : त्यांत एक हात उणा कीजे : बेरीज करून : त्यासीं आठें भाग द्यावा : उरेल तो आव जाणावा : याचा प्रकार आयेकावा : चित देऊन : येके हातीं आव ध्वजाचा : दुसरे हातीं आव धूर्माचा : तिसरे हातीं आव सिहांचा । पाहे भेदून : ॥१३॥
चौथे हातीं आव स्वानाचा : पांचवे हातीं आव वृशभाचा : साहावे हातीं आव षराचा : सातवे हातीं आव गजाचा : आठवां ढांकी । ॥१४॥
जेणें मंदिरींष्वजांचा आव आहे : तेणें घरीं सुकृतार्थ होये : आव धूर्माचा आतडला असेल पाहे : तरि स्वामी मरून जाये : आळ सिहांचा आतुडे आन्येथा नोहे : तेथें नितजयेजयेकार होये : आव स्वानाचा रोगिष्ट सांगुं काये : कहिं सुषाचा दिवस नये ॥१५॥
वृशभाचा आव तरि लाभ तिये घरी : षराचा आव असे जेवाचा नस अवधारीं : गजाचा आव असे तरी सर्व सधि निर्धारीं : ढाकी आव निर्फळ अठवां या परी : ॥१६॥
अनुराधा कर्क रासी : हीजे वृशभ आव जयासी : मुष पूर्व दक्षणेसी : वार आहीत : ॥ तरि होये पंधरावे वरुसीं : घरविनाश आश्विन मासीं : आणीक आणावें मनासी : सावचीत : पाहे पां वृशभ आणि मिथुन : कर्क कन्या धन मकर मीन : या रासीस आव देणें : ध्वज विक्षांत : जन्म सिंह राशीचा असे : मघा नक्षत्र प्रकाशे : चाळिसां वरुसां घर विनाशे : अज्ञ प्राप्तः ॥१७॥
तूळ वृश्चीक कुंभ रासी : जरी तूं गजाचा आव देशी : विसाषा नक्षेत्र दिनमानासी : पूर्व दक्षिण मुष उत्तरेसी : तें घर विनाशे : ॥१८॥
कर्क तूळा सहित वृशभ आव आइका : नक्षेत्र शततारका : जन्म सिंहराशीचा चाळीस वरुसें देषा : घराचें आर्बळ न कळे मूर्षा : वायो उदकें विनास होये नेटका : पाहे पां तूं कवि रंका : आणिक वृशभ सिंह रासीचा आवाका : धन प्राप्त होये मनीं राषा : ॥१९॥
पुषां फालगुणीं जरी आव दिसे सिंहाचा : उत्तर दक्षेण पूर्व मुष जन्म सिंह रासीचा : साठ वरुसें आव राहे त्या मंदिराचा । अज्ञ प्रप्तीनें विनास होइल त्याचा : ॥२०॥
तूळ वृश्चीक कुंभ मीन : जरी गजाचा आव देणे : आसळका नक्षेत्र जन्म जाण : कर्क रासीला : पूर्व उत्तरें मुष असे आर्बळ पंचवीस वरुसें : वायोजळ - प्राप्तीनें नासे : विचार केला : कन्या तूळ मकर मेषाचा : आव दीजे सिंहाचा : तरी फालगुणीं कन्येचा : जन्म जाला : चाळीस वरुसें घर राहे : अज्ञीं तृणें जळुनी जाये : ऐसा प्रकार लवलाहें : सांगीतला: ॥२१॥
कर्क मिथुन कन्या धन मकर : यासी गजाचा आव देसी जर : शततारका नक्षेत्रावर : पाहे चोविसां वरुसां उपर : अज्ञीनें जळ : ॥२२॥
कर्क सींह वृश्चिक धन इतुकीया रासीतें : सिंह आव दीजे निरुतें : जन्म सिंह रासी विशाषा नक्षेत्रांतें : पूर्वे उत्तरे मुष त्यातें : चवेताळीस वरुसें आर्बळ मंदिरातें : अज्ञी प्राप्त होये घरातें : यापरी मांडणी सांगितली श्रोतयातें : पाया षानावा सिल्पमतें : ॥२३॥
पाया षानीतां दोष सांगेन बरवे रीतीं : सेषाचें मस्तकीं घाव लागे जरी निगुती : तरी मायेबापें मरुनीयां जाती : पृष्टी आतुडे रोग उपजे सकळा प्रति : ॥२४॥
घाव देतां आतुडे पुंस : अस्त्रीबाळकां होये विनास : मग येकला उरे उदास : घरस्वामी : पाया षानीतां प्रसिध : उजवी भुज असे नीबंद : तरी होइल गोत्रवध : आयेका तुम्हीं : षानतां डावी भुज आतुडे : तरेइ धन लक्षेमी जुडे : आणि पुत्रलाभ घडे : सांगतों आम्हीं : सेष चुकविजे येणें रीती : मग उभारावीया भीती : षांब धीरावीजे सुमोहुर्ती : घराश्रमीं : ॥२५॥
सेषा मस्तकीं षांब दीजे : मायेबापें मरती सहजें : घरधन्यातें दुष उपजे : गोत्रहानी होये जाणिजे : षांबाचा गुण ॥२६॥
सेषाचे सेप वर जो प्राणि स्छावरे : ते घरीं लक्षेमी न धारे : सहश्रा हाताची कमाइ कहीं न पुरे : घरधनी उपवासी मरें : वामकुसी षांब दीजे तरी होईल बरें : यापरी दोश जाणावे चातुरें : ॥२७॥
महुर्त्त पाहुनि मग पाचारिजे सुतार : आषनी करुनी षांब तासविजे साचार : झिलपी उडे तेथुनी सुभ सांगीतिला प्रकार : विप्र गोविंद सांगे सिल्पशास्त्रीचा निर्धार : ॥२८॥x॥x॥
असा हा त्रुटित (?) ग्रंथ आहे. सबंध सांपडेल तर कवीच्या चरित्रावर जास्त प्रकाश ( कदाचित् ) पडेल व आपल्यालाहि या शास्त्रावरील एक संपूर्ण ग्रंथ लाभेल.
 या सबंध ग्रंथांत एक अतिशय ठळक गोष्ट डोळ्यापुढें येत आहे, ती ही गोविंद विप्रानें ज्या ठिकाणीं एकाचा अकं दिला आहे त्याच्या पुढील ओंवित “ रचिली द्वारका श्रीकृष्णाची ” असे शब्द आले आहेत. नुसत्या एवढ्याच शब्दांनीं मनांत कांहीं अर्थ उद्भवणार नाहीं, म्हणून लागलीच पुढील तिसर्‍या ओंवीच्या आरंभींच्या मनांत कांही अर्थ उद्भवणार नाहीं, म्हणून लागलीच पुढील तिसर्‍या ओंवीच्या आरंभींच्या चार चरणांकडे लक्ष द्यावें, तीं चरणें अशीं :- “ तोचि विश्वकर्मा अवत्रला पयेठणीं : कोकवाढी होउनी : च्यार सहस्र सिस्ये तयालागुनी : करिती मृत्येलोके उभवणी : ” याचा सरळ अर्थ ओंवी वाचितांच ध्यानांत येण्यासारखा उघड आहे. तेव्हां पैठणास अवतार घेऊन, चार हजार ( पुष्कळ ) शिष्य उपदेष्टून या मृत्युलोकीं ( निराळ्या पंथाची ) उभवणी करणारा हा विश्वकर्मा कोण ? ‘ विश्वकर्म्या ’ चा उलगडा असा -
मानभवी ग्रंथकार आपल्या नांवामागें ‘ मुनि ’ ‘ विप्र ’ ‘ कवि ’ हे शब्द प्रामुख्यानें लावितात हें, ज्यानें त्यांचे बरेचसे ग्रंथ पाहिले असतील त्याच्या चटकन् लक्षांत येईल. असल्या प्रकारचा जातीविशिष्ट नामनिर्देश सहसा सनातन धर्माभिमानी कवीच्या काव्यांत प्रामुख्यानें सांपडत नाहीं. तो आपली हकीकत देण्याचा प्रसंग आला असतां आपली जात त्यावेळीं तेथें प्रकट करील, पण जेथें जेथें नांवाचा प्रसंग येईल तेथें तेथें तिचाहि उल्लेख करण्याची त्याची सर्वसाधारण रीति नाहीं; तेव्हां स्वतःच्या नांवामागें “ विप्र ” व “ कवि ” जोडणारे व “ द्वारकेच्या श्रीकृष्णाचा ” प्रामुख्यानें उल्लेख करणारे हे गोविंद कोणत्या धर्माचे ? जातां जातां हेंहि येथें नमूद करावेसें वाटतें कीं, ही पोथी, मला ज्या मठांत मानभवांचे बरेचसे ग्रंथ मिळाले, त्याच मठांत मिळालेली आहे ! पोथी माझ्या संग्रहास आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP