( श्री. पांडुरंग मार्तंड चांदोरकर )
संतकवी - काव्यसूचींत, सिद्धनाथ व केसरीनाथ या दोघांच्या नांवावर सिद्धांतसारग्रंथ आढळतात. आज, दामा कोंडदेव याची याच विषयांवरील कृति आपल्यापुढें येत आहे. दामा कोंडदेव हा कवि नवीन आहे. त्याच्या कालाचें गमक या ग्रंथांत आढळत नाहीं. भाषेवरोन तो सोळाव्या शतकांतेल होता एवढेंच अनुमान करितां येतें. ग्रंथाचा विषय योगा - हटयोगा - चा आहे. काव्य साधारण प्रतीचें आहे.
आरंभ -
श्रीगणेशाय नमः ॥ अलक्षीं अपारपराय नमः ॥
कथा ऐका पुण्यपावनी । महादोष हरणी । सांगतसे श्रुळपाणी । उमापासीं ॥१॥
पार्वतीये ऐक उपदेशु । जेणें होय महादोशां नाश्रु । चितीं धरी विश्वासु । भावें करुनि परियेसीं ॥२॥
शेवट -
ऐसा ह्या सिद्धांतु । गिरजेशंभूचा येकांतु । जे परियेसति पुण्यवंतु । तयाचें भाग्य उदयो पावे ॥११२॥
हा सिद्धांतु ईश्वरें उमेप्रति निरोपिला । तेथुनियां सिद्धपंथ कैसा चालीला । तो तुं सांगें पां वाहिला । दामयां कोडदेवा ॥११३॥
........ ऐसा सहजचि सहज कळा । जाणे तो महासिद्ध विरळा । दामा कोडदेव भोळा । म्हणे श्रोत्ययां प्रति ॥११९॥
.............. येकांतचें निरोपणा । सिद्धि परिसावी जी गुणरत्न । जे कां सदा मोक्षदायन । केवीं भक्तिवीण लाभती ॥१२१॥
मुगुटमोक्षसिद्धांतु ॥वोव्या॥१२१॥
इति श्री मोक्षमार्ग संपूर्णमस्तु श्रीशंकरार्पणमस्तु ॥x॥x॥
ओवी ४॥ चरणीं असोन, भाषा ‘ उ ’ कार विशिष्ट आहे व तिच्यावर सर्वत्र ज्ञानेश्वरांची छाया पसरली आहे.
---------------------------------------------
आणखी एक कान्हा
( श्री. पां. मा. चांदोरकर )
१ जसजसें संशोधन जास्त होत जाईल तसतसें ऐतिहासिक वृत्त जास्त दृष्टिगोचार होत जाणार हें तर खरेंच; पण संशोधकांच्या मार्गीत घोटाळेहि त्याच प्रमाणांत जास्त उद्भवणार ! दोन दास, दोन देवदास, दोन मुक्तेश्वर, तीन कृष्णदास, चार उद्धव वगैरे एकाच नांवाच्या संतांचा परिचय आपणांस झाला आहे, होत आहे व आणखीहि पुढें कितिकांचा होईल.
२ कान्हा ( हरिदास ), कान्हो ( त्रिमलदास ), कान्हो ( पाठक ), इतक्या कान्हांची निदान आपणांस माहिती आहे, पण आजचे हे महीधर कान्हा मात्र नवीन आहेत. यांच्या गुरूचें नांव महिधर, कां यांचेंच नांव महिधर, याचा उलगडा खालीं दिलेल्या पदांवरून होत नाहीं. त्याचप्रमाणें त्यांच्या काळाचेंहि अनुमान काढण्यास सध्यां तरि कांहीं गमक उपलब्ध नाहीं. महिधर अशा नांवाचा एकादा कवि झाल्याचें आठवत नाहीं ( सूचींतहि नाहीं ). मला त्यांचें हें एवढें एकच पद आढळलें. कसें हि असो, वरील तीन कान्ह्यांच्या जोडीला हे चवथे एक कान्हा आज येऊन बसत आहेत. संशोधकांनीं देवदास, दास उद्धव वगैरेप्रमाणें या कान्ह्यांबद्धलही सावध असावें !
३ पद याप्रमाणें :-
कोणी आणा गे, बाई ! आणा गे, ।
पंकजपाणी, पयाब्धीची खाणी, ।
मोतीयाचा दाणा ॥धृ०॥
वेद बोलती, ज्या नेति नेति, ।
सखे ! पूर्ण ब्रह्म, परात्पर ज्योति, ।
सखे ! दिनराती, जीवीचा संगाती,
वैकुंठीचा राणा ! गे बाई ॥१॥
सखे ! बाळ नव्हे, जगजेठी !
विधी जन्मला ज्या नाभी देठीं
पदांबुज दृष्टि, घालिन पायीं मिठी,
नंदा घरीं कान्हा ! गे बाई ॥२॥
सखे ! नेणों भुलला त्या कुब्जेसी, ।
सखे ! मी तो परदेसी, होइन तुमची दासी,
पुसे गौळीयांसी, ।
महीघर कान्हा ! गे बाई ॥३॥