लक्षणे - १८ ते २१

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१८
रामाचें चरित्र सांगता अपार । जाहला विस्तार तीहीं लोकीं ॥१॥
तीहीं लोकीं हरें वांटुनी दीधलें । तें आम्हां लाधलें कांहिं येक ॥२॥
कांहि येक भाग्य होतें पूर्वजांचें । पापियासी कैचें रामनाम ॥३॥
रामनामें कोटी कुळें उद्धरती । संशय धरीती तेचि पापी ॥४॥
पापीयाचें पाप जळे येकसरें । जरी मनीं धरे रामनाम ॥५॥
’रामनाम काशीं शिव उपदेसी । आधार सर्वांसी सर्व जाणे ॥६॥
सर्व जाणे अंतीं रामनामें गती । आणी वेदश्रुती गर्जताहे ॥७॥
गर्जती पुराणें आणी संत जन । करावें भजन राघवाचें ॥८॥
राघवाचें ध्यान आवडे कीर्तन । तोची तो पावन लोकांमध्यें ॥९॥
लोकांमध्यें तरे आणी जना तारी । धन्य तो संसारी दास म्हणे ॥१०॥

१९
ऐसें आत्मज्ञान उद्धरी जगासी । पाहेना तयासी काय करूं ॥१॥
काय करूं जना जन विवरेना । नेणतां सरेना जन्ममृत्यु ॥२॥
जन्म मृत्यु बाधी मानीना तयासी । कल्पतरू ज्यासी तुच्छ वाटे ॥३॥
तुच्छ वाते देव तोची तो निर्देव । तयासी सदेव कोण करी ॥४॥
कोण करी येका राघवावांचुनी । राम धरा मनीं सर्वकाळ ॥५॥
सर्वकाळ गेला दरिद्र भोगीतां । वैराग्य पाहातां तेथें नाहिं ॥६॥
नाहिं भक्तिज्ञान परमार्थाचें सुख । संसारींही दुःख दरिद्राचें ॥७॥
दरिद्राचें दुःख केलें देशधडी । रामराज्यागुढी उभविली ॥८॥
उभविली गुढी भक्तिपंथें जावें । शीघ्रची पावावें समाधान ॥९॥
समाधान रामीरामदासीं जालें । सार्थकानें केलें सार्थकची ॥१०॥

२०
जाणे सुखदुःख रामा माझा येक । येर तें माईक वैभवाचीं ॥१॥
वैभवाचीं सकीं वोरंगोनि जाती । आत्माराम अंतीं जीवलग ॥२॥
जीवलग नाहिं श्रीरामवांचुनी । हाची माझे मनीं दृढभाव ॥३॥
भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा । रामेंवीण कैचा अंतरंग ॥४॥
अंतरीची व्यथा श्रीराम समर्था । जाणवल्या चिंता दुरी करी ॥५॥
करी प्रतिपाळ शरण आलियांचा । राम त्रैलोक्याचा मायबाप ॥६॥
मायबाप धन सज्जन सोयरा । येका रघुवीरावीण नाहिं ॥७॥
नाहिं मज चिंता श्रीराम असतां । संकटीं बोहातां उडि घाली ॥८॥
उडी घाली मज अनाथा कारणें । राम सर्व जाणे अंतरीचें ॥९॥
अंतरीचें गुज राम सर्वबीज । रामदासीं नीज प्रगटलें ॥१०॥

२१
ऐका नव रस सुंदर सरस । जेणें होय रस सर्व काळ ॥१॥
प्रथम शृंगार दुसरा तो हास्य । तिसरा तो रस करूणेचा ॥२॥
रौद्र तो चतुर्थ वीर तो पांचवा । रस तो साहवा भयानक ॥३॥
मोहो तो सातवा वीभत्स आठवा । लज्या तो नववा रस जाण ॥४॥
रसीक बोलणें रसीकची गाणें । रसीक वाचणें प्रसंगींत ॥५॥
ज्याचें त्याचें परी आवडीसारीखें । बोलतां आरिखें लुब्ध होती ॥६॥
लुब्ध होती तरी मृदुची बोलावें । नेमस्त चालावें नीतिन्यायें ॥७॥
नीतिन्यायेंबहुतेकांसी मानतो । व्याप करील तो भाग्यवंत ॥८॥
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर । अखंड विचार चाळणेचा ॥९॥
चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा । अखंड शहाणा तोची येक ॥१०॥
प्रवृत्ती निवृत्ति चाळणा पाहिजे । दास म्हणे कीजे विचारणा ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP