लक्षणे - ३१ ते ३५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


३१
छत्रसुखासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रिलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडले वर्म थोर भाग्य ॥४॥
थोर भाग्य ज्याचें राम त्याचें कुळी । संकटीं सांभाळीं भावबळें ॥५॥
भावबळें जेहीं धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंबेना ॥६॥
विसंबेना कदा आपुल्या दासासी । रामी रामदासीं कुळस्वामी ॥७॥

३२
काया हे काळाची घेऊनी जाणार । तुझेनी होणार काय बापा ॥१॥
काय बापा ऐसें जाणोनी नेणसी । मी माझें म्हणसी वायावीण ॥२॥
वायावीण शीण केला जन्मवरी । दंभ लोकाचारी नागवण ॥३॥
नागवण आली परलोका जातां । लोकिक तत्वता येंही लोकीं ॥४॥
केली नाहिं चिंता नामीं कानकोडें । आतां कोण्या तोंडें जात आहे ॥५॥
जात आहे सर्व सांडूनि करंटा । जन्मवरी ताठा धरूनियां ॥६॥
धरूनीयां ताठा कासया मरावें । भजन करावें दास म्हणे ॥७॥

३३
पूर्ण समाधान इंद्रियदमन । श्रवण मनन निरंतर ॥१॥
निरंतर ज्याचे हृदई विवेक । उपासना येत कोची धन्य ॥२॥
धन्य तोचि येक संसारीं पाहातां । विवेकें अनंता ठाइं पाडी ॥३॥
ठाईं पाडी निजस्वरूप आपुलं । असोनी चोरलें जन्मोजन्मीं ॥४॥
जन्मोजन्मीं केलें पुण्य बहुसाल । तरीच घडेल संतसंग ॥५॥
संतसंग जया मानवा आवडे । तेणें गुणें घडे समाधान ॥६॥
समाधान घडे सज्जनाच्या संगें । स्वरूपाच्या योगें रामदासीं ॥७॥

३४
साधु आणी भक्त व्युत्पन्न विरक्त । तपोनिधी शांत अपूर्वता ॥१॥
अपूर्वता जनीं शुद्ध समाधानी । जनाचे मिळणीं मिळों जाणें ॥२॥
मिळों जाणे जना निर्मळवासना । अंतरिं असेना निंदाद्वेष ॥३॥
निंदाद्वेष नसे जनीं लक्ष असे । जेथें कृपा वसे सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ जेणें सार्थकीं लाविला । वंश उद्धरीला नामघोषें ॥५॥
नामघोष वाचे उच्चारीं सर्वदा । संतांच्या संवादा वांटेकरी ॥६॥
वाटेकरी जाला सायुज्यमुक्तीचा । धन्य तो दैवांचा दास म्हणे ॥७॥

३५
विश्रांतीचें स्थळ स्वरूप केवळ । द्वैततळमळ जेथें नाहिं ॥१॥
जेथें नाहिं काया नाहिं मोह माया । रंका आणी राया सारिखेंची ॥२॥
सारिखेंची सदा सर्वदा स्वरूप । तेंच तुझें रूप जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वयें तूंची आपणासी । सोहंस्मरणासी विसरतां ॥४॥
विसरतां सोहं स्मरण आपुलें । मग गुंडाळलें मायाजाळीं ॥५॥
मायाजाळीं तुझा तूंची गुंतलासी । यातना भोगिसि नेणोनीयां ॥६॥
म्हणोनीयां होईं सावध अंतरीं । सोहं दृढ धरीं दास म्हणे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP