लक्षणे - १११ ते ११५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


१११
माझें सर्व जावो तुझें नाम राहो । हाची माझा भावो अंतरीचा ॥१॥
पतीतपावन नाम हे जाईल । मग कोण राहिल तुजपासीं ॥२॥
यालागी राघवें भक्ता उद्धरावें । आपुलें राखावें ब्रीद देवा ॥३॥
रामदास म्हणे देवा तुझी आण । ब्रीदासाठीं प्राण देईजेतो ॥४॥

११२
संभवामि युगे युगे हें वचन । येणें समाधान होत नाहिं ॥१॥
होत नाहिं देवा श्लाघ्य येणें जिणें । कर्म हें भोगणें दीनाऐसें ॥२॥
दीनाऐसें कदाकाळीं हें न व्हावें । समर्थची व्हावें मुख्यपद ॥३॥
मुख्यपद दृढ धरूनीयां देवें । निश्चळची व्हावें दास म्हणे ॥४॥

११३
कां वो राममाये दुरी धरीयेलें । कठीण कैसें जालें चित्त तुझें ॥१॥
देउनी आळिंगन प्रीतीपडीभरें । कैं मुख पीतांबरें पुससील ॥२॥
घेउनी कडीये धरूनी हनुवटी । कैं गुजगोष्टी सांगसेल ॥३॥
रामदास म्हणे केव्हां संबोखिसी । प्रेमपान्हा देसी जननीये ॥४॥

११४
सोडवी जो देव तोची देवराव । येर जाण नांव नाथीलेंची ॥१॥
नाथीलेंची नांव लोकामधें पाहे । ठेवीजेत आहे प्रतापाचें ॥२॥
प्रतापाचें नांव येक राघवासी । रामी रामदासीं देवराव ॥३॥

११५
मुख्य समाधान आत्मनिवेदन । निर्गुणी अनन्य होता बरें ॥१॥
होतां बरें वस्तुरूपची केवळ । दृश्य तळमळ जेथें नाहिं ॥२॥
जेथें नाहिं चिंता होणाराची आतां । तोची तो तत्त्वता दास म्हणे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP