लक्षणे - ६१ ते ६५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


६१
सर्व धर्म कर्म हातींचें सांडावें । सत्वर धुंडावें शाश्वतासे ॥१॥
शाश्वतासी ठाईं पाडावें विवेके । निरूपणें येकें साधुसंगें ॥२॥
साधुसंगें बोध साधूनीयां घ्यावा । वेगची करावा चमत्कार ॥३॥
चमत्कारें आतां प्रचीत बाणावी । स्थिती वोळखावी सज्जनाची ॥४॥
सज्जनाची स्थिती सज्जन जाणती । साधकांसी गजी दास म्हणे ॥५॥

६२
तीर्थें व्रतें तपें ज्यालागी शिणावें । त्यासी कां नेणावें विवेकानें ॥१॥
विवेकानें अविवेकची करावा । निस्चयो धरावा बहुविधा ॥२॥
बहुविध जरी बाणला निश्चयो । त्यासी होये लयो वेळ नाहिं ॥३॥
वेळ नाहिं बहु रूप संव्हारतां । शाश्वत पाहतां आडळेना ॥४॥
आडळेना जंव दिसेना लोचना । ठाउकें सज्जना दास म्हणें ॥५॥

६३
सृष्टीची रचना सर्वत्र पाहाती । विवेकें राहाती ऐसे थोडे ॥१॥
ऐसे थोडे जन जया आत्मज्ञान । नित्य निरंजन वोळखीला ॥२॥
वोळखीला देव वोळखीला भक्त । वोळखीला मुक्त योगीराज ॥३॥
योगीयांसी योग आहे निरंतर । वियोगें इतर वर्तताती ॥४॥
वर्तताती ऐसें कदा न करावें । सार्थक करावें दास म्हणे ॥५॥

६४
सृष्टी नांदताहे सर्व लोक पाहे । तयांवरी आहे परब्रह्म ॥१॥
परब्रह्म आहे निर्मळ निश्चळ । चंचळ चपळ सृष्टी नांदें ॥२॥
सृष्टी नांदें तेंची शोधवें अंतर । नित्य निरंतर वोळखावें ॥३॥
वोळखावें निजगुज वेदबीज । सहजीं सहज सदोदीत ॥४॥
सदोदीत देव येर सर्व माव । ऐसा अभिप्राव दास म्हणे ॥५॥

६५
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥
पावतसे दश भुजा उचलून । माझा पंचानन कईवारी ॥२॥
कैवारी देव हा व्याघ्राच्या स्वरूपें । भूमंडळ कोपें जाळूं शके ॥३॥
जाळूं शके सृष्टी उघडीतां दृष्टी । तेथे कोण गोष्टी इतरांची ॥४॥
इतरांची शक्ती शंकराखालती । वांचविली क्षिती दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP