लक्षणे - ५१ ते ५५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
५१
माझा स्वामी आहे संकल्पापरता । शब्दीं कैसी आतां स्तुती करूं ॥१॥
स्तुतीं करूं जातां अंतरला दुरी । मीतूंपणा उरी उरों नेंदी ॥२॥
उरों नेंदी उरी स्वामीसेवकपण । येकाकी आपणा ऐसें केलें ॥३॥
केलें संघटण कापुरें अग्नीसी । तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं ॥४॥
उरी नायिं कदा रामी रामदासा । स्वयें होय ऐसा तोची धन्य ॥५॥
५२
जेथें तेथें देव नाहीं रिता ठाव । ऐसा माझा भाव अंतरीचा ॥१॥
अंतरीचा देव अंतरीं जोडला । विकल्प मोडला येकसरा ॥२॥
येकसरा लाभ जाला अकस्मात । ब्रह्म सदोदीत सर्वां ठायीं ॥३॥
सर्वां ठाईं ब्रह्म पंचभूत भ्रम । साधुसंगें वर्म कळों आलें ॥४॥
कळों आलें वर्म आत्मनिवेदनें । ज्ञानें समाधान रामदासीं ॥५॥
५३
संसारीचें दुःख बहुसाल होतें । तें जालें परतें विचारानें ॥१॥
विचारानें सर्व संग वोरंगला । रामरंग जाल असंभाव्य ॥२॥
असंभाव्य सुख मर्यादेवेगळें । विचाराच्या बळें तुंबळलें ॥३॥
तुंबळलें सर्व चंचळ निश्चळ । द्वैत तळमळ तेथें नाहिं ॥४॥
तेतें नाहिं दैन्य वस्तु सर्वमान्य । तयासी अनन्य देवदास ॥५॥
५४
माया हे असार वस्तु आहे सार । कळें विचार साधुसंगें ॥१॥
साधुसंगें संग भंगे साधकांचा । सिद्ध साधकाचा होत आहे ॥२॥
होतसे साधक बरें विवरतां । विवेकें थिरतां परब्रह्मीं ॥३॥
परब्रह्मीं माया पाहातां दिसेना । येर निरसेना कांहीं केल्यां ॥४॥
कांहिं केल्यां तरी कांहिं होत नाहिं । आत्मज्ञानें पाहिं दास म्हणे ॥५॥
५५
माझीया देहाचें सांडणें करीन । तुज वोवाळीन चारी देहे ॥१॥
चारी देहे त्यांची व्यर्थ थानमानें । कुर्वंडी करणें देवराया ॥२॥
देवराया जीवें प्राणें वोवाळीन । हृदईं धरीन रात्रंदिवस ॥३॥
रात्रंदिवस मज देवाची संगती । तेची मज गती सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ माझा सार्थक जाहला । देव सांपडला भक्तपणें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP