लक्षणे - ७१ ते ७५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
७१
कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश । विद्येचा अभ्यास तेथें कैंचा ॥१॥
तेथे कैंचा देव कैचा तेथे धर्म । कर्माकर्म कळेचीना ॥२॥
कळेना परीक्षा चातुर्यमर्यदा । लागतसे सदा पोटधंदा ॥३॥
पोटधंदा नीच जनाची संगति । तेथें कैंची गती विवेकाची ॥४॥
विवेकाची गती सज्जनसंगती । दास म्हणे स्थिती पालटावी ॥५॥
७२
देवा तुझी पागा थोर देते दगा । धान्य वस्त्रें कीं गा नासीयेलीं ॥१॥
नासीयेलीं घरें पाडिली विवरें । घरांत उकीरें ढीग केलें ॥२॥
ढीग केले रानीं वनीं ते पर्वती । मोकाटें हिंडती चहुंकडे ॥३॥
चहुंकडे तया वेर्थ बाळगीसी । तुंहि लवंडसी क्षणक्षणा ॥४॥
क्षणक्षणा देवा रागहि येतोसी । दास म्हणे ऐसी स्थिती नव्हे ॥५॥
७३
पिंपळाची भक्ती केल्यां नव्हे मुक्ती । उगेची फिरती दुराशेनें ॥१॥
दुराशेची फेरी घेती नानापरी । कामना अंतरीं धरूनीयां ॥२॥
धरूनीयां भाव माईकची माव । तेणें मुख्यदेव अंतरला ॥३॥
अंतरला देव असोनी अंतरीं । दंभ लोकाचरी लोकलाज ॥४॥
लोकलाज कांहिं सेवट करीना । जन्म चुकवीना दास म्हणे ॥५॥
७४
शिमग्याचा खेळ बोंबेचा सुकाळ । बोलणें बाष्फळ जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें भंड उभंड वाचाळी । राख माती धुळी शेणकाला ॥२॥
शेणकाला पाणी तडक मारिती । तेथें न्यायनीती कोठें आहे ॥३॥
आहे तेथें आहे विचारूनि पाहे । बाष्फळ न साहे नेमकासी ॥४॥
नेमकाचा संग भाग्याचा उदयो । दास म्हणे जयो प्रपत होतो ॥५॥
७५
संसाराची आलें देवासी चुकलें । प्राणी आलें गेलें वायांविण ॥१॥
वायांविण सीण केला जन्मवरी । मायामोहपुरी वाहोनियां ॥२॥
वाहोनियां जीवें भोगिली आपदा । आत्महित कदा केलें नाहिं ॥३॥
केलें नाहिं आतां ऐसें न करावें । विवेकें भरावें निरूपणीं ॥४॥
निरूपणीं सारासार विचारणें । दास म्हणे येथें समाधान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP