शिवरात्र - शिवदातृत्व
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
तृतीय पूजनोत्तर
तिसरे प्रहरींची पूजा त्वां घेतली । सिद्धता बनवली परमार्थासी ॥१॥
परमार्थ आम्हां तुवां जवळि केला । मार्ग दाखविला सुलभ जो ॥२॥
जया मार्गामध्ये सकळ सुखसोई । कल्यणचि होई जातां जेणे ॥३॥
ऐसा सुलभ मार्ग आम्हां उघडिला । आम्हांसी मार्गाला लावियेले ॥४॥
दृष्टीच्या टप्यांत आणिला परमार्थ । आमुचा अनर्थ चुकवीला ॥५॥
परमार्थाचा ठेवा गुरुकिल्ली त्याची । दिधली तुवां साची आमुचे करी ॥६॥
कपाट कैसे मुक्त करायाचे आम्हां । दाविले पूर्णकामा कृपाळुत्वे ॥७॥
लावुनीयां किल्ली उघडूं आतां द्वार । परमार्थ दूर नाही आम्हां ॥८॥
ब्रह्मादिकां नाही गवसला ठेवा । आम्हांसी तो देवा दावियेला ॥९॥
स्वाधीन केला निधि दातृत्व तुझे ऐसे । नाही भरंवसे उपमान ॥१०॥
अनुपम देणे तुज शंकराचे । वदावे काय वाचे मानवाने ॥११॥
रावणासि आत्मलिंग तुवां दिले । मागे पुढे पाहिले नाही तुवां ॥१२॥
त्याचिया भजने भुललासी देवा । आत्मलिंग शिवा दिधलेंसी ॥१३॥
दिली निजभार्या सर्वस्व ओपिले । दातृत्व हे भले अनुपम ॥१४॥
विनायक म्हणे तुजसम दाता । नाही उमाकांता त्रैलोक्यांत ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 21, 2020
TOP