शिवरात्र - विनायकाचा उद्धार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


षष्ठ पूजनोत्तर

बहु पुण्याईचा योग हा आजचा । सांपडला साचा तुझ्या कृपे ॥१॥
पदरांत आमुच्या पडली ही सेवा । तुझ्या कृपे देवा दत्तात्रेया ॥२॥
कृतज्ञ होवोनी घालूं लोटांगण । धरुं तुझे चरण कृपाळू बा ॥३॥
अष्टौ प्रहराची सेवा ऐशी घ्यावी । प्रसन्नता व्हावी आम्हांवरी ॥४॥
आंम्हां पामरांच्या दैवी काय योग । होता काय रंग ऐसा देवा ॥५॥
पातकी मी दुष्ट परम दुदैवाचा । परि केला दैवाचा तुवां देवा ॥६॥
परीसा लागतां लोहाचे सुवर्ण । तैसे झाले जाण माझे दत्ता ॥७॥
शेणाची कस्तूरी कांचेचा की हिरा । बनविले उदारा तुवां मज ॥८॥
मातीचे सुवर्ण तुवां बनविले । मोला चढविले मजलागी ॥९॥
मज खापराचा परीस तुवां केला । नरकाचा झाला स्वर्ग जणूं ॥१०॥
तैसे पापीयासी मज बनविले । दत्तरुप भले तुवां आज ॥११॥
पुण्याईचा योग योग तव सेवेचा । घडविला साचा मजलागी ॥१२॥
मनुष्याचा देव याच देही केला । अपूर्व हा भला चमत्कार ॥१३॥
बनलो शिवरुप बनलो दत्तात्रेय । धन्यता माझी होय तव कृपे ॥१४॥
विनायक म्हणे माझा तूं उद्धार । केला सद्गुरुवर आज साच ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP