शिवरात्र - कार्य करवून घेतल्याबद्दल कृतज्ञतावचन
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
अष्टमपूजनोत्तर
कृतकृत्यता की आमुची त्वा केली । कृपेची माउली आम्हांसी तूं ॥१॥
वार्षिक ह कार्य तुवां करविले । आम्हां बळ दिले तुवां नाथा ॥२॥
निरामय आम्हां प्रसन्न ठेविले । साधनात दिले मेळवूनी ॥३॥
सर्व अनुकूलता तुवां स्वये केली । आमुची पुरविली मनीषा की ॥४॥
सहाय्य थोर केले स्वये प्रगटोनी । कार्य संपादोनी स्वये तुवां ॥५॥
टिटवीने केला सागराचा शोष । तैसे हे विशेष कार्य झाले ॥६॥
पुण्याईचे नर आम्ही ते नव्हत । आम्हांपाशी दुरित बहु भल ॥७॥
आम्ही सुदैवाचे नव्हत की जन । प्रारब्ध गहन आमुचे की ॥८॥
आमुचे ललाटी, यासम पुण्याई । घडोनियां येई, ऐसे नाही ॥९॥
ब्रह्मदेवे नाही केली ही योजना । तूझे दयाघना कृत्य सारे ॥१०॥
आमुची दया आली तुजसी माधवा । तुज सदाशिवा दया आली ॥११॥
क्षणभरी तुवां प्रारब्ध दूर केले । प्रियपण राखिले निजभृत्यी ॥१२॥
क्षणभरी माझे दैव फ़िरवील । मध्यस्थीते केले ब्रह्मयासी ॥१३॥
आला होता यम घेउनीया पाश । तुवां जगदीश फ़िरवीला ॥१४॥
आयुष्य वर्धन माझे नाथा केले । माझेकडे दिले भजनकृत्य ॥१५॥
तुजला भजावे रात्रंदिन गावे । यशाते वानावे आहोरात्र ॥१६॥
सिद्धी वचनासी तुवां असे दिली । विजयश्रीने घातली कण्ठी माळा ॥१७॥
अनुग्रह केला अंगिकार केला । माझा त्वां दयाळा पूर्णकृपे ॥१८॥
सिद्ध बनविले मज धन्य केले । काय मागूं भले आणिक मी ॥१९॥
मागण्याचे नाही काहीच उरले । ऐक्यरुप झाले तुज मज ॥२०॥
तृप्तिचे ढेकर मजलागी आले । आनंदाचे भले वासुदेवा ॥२१॥
विनायक म्हणे मौनाची धरीतो । निजठायी राहतो संतुष्ट मी ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2020
TOP