आनंद मनीं, आनंद जनीं, आनंद वसे, काननिं विजनी ।
स्मित बहरु दे, सखये सदनीं, उत्फुल्ल हास्य भरु दे वदनीं ।
ते कमलावरिं हास्य फुले, बालकगण, प्रमुदित सकल झुले ।
अंतर्मन आनंदें भरले, आनंदाविण काहि न दिसले ।
उदयाचलि हसली, किरणप्रभा, हो लज्जित प्रांगणि करति नभां ।
कण, सुवर्णमय, गिरिशिखरिं तुरे, पक्षांचे सुस्वर गीत सुरें ।
झुळझुळते निर्झर गीत झरे, मधुमासि गुंजनिं भान नुरे ।
हा विश्व कलश मोदें भरला, जीवनांत सुख वितरायाला ।
ही मोदमयीं दुनिया उमले, आनंदकंद छंदांत डुले ।