श्रीगणेशाय नमः ॥ अथ श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्रप्रारंभः ॥
सदा प्रार्थितों श्रीगूरूच्या पदांसी ॥ धरीतों शिरीं वंदितों आदरेंसीं ॥
धरूनी करीं तारिं या बाळकासी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥१॥
मतीहीन मी दीन आहें खरा हो ॥ परी दास तूझा करीं पाखरा हो ॥
जसें लेंकरूं पाळिते माय कूशीं ॥ नमस्कार० ॥२॥
लडीवाळ मी बाळ अज्ञान तुझा ॥ गुरुवांचुनीं पांग फेडील माझा ॥
तुझ्यावीण दूजा कुणी ना अम्हांसी ॥ नमस्कार० ॥३॥
पिता माय बंधू सखा तूंचि देवा ॥ मुलें मित्रही सोयरे व्यर्थ हेवा ॥
कळोनी असें भ्रांति होई अम्हासीं ॥ नमस्कार० ॥४॥
चरित्रें गुरूचीं करी नित्यपाठ ॥ जया भक्ति लागे पदीं एकनिष्ठ ॥
तयाचे कुळीं दीप सज्ञानराशी ॥ नमस्कार० ॥५॥
वसे उंबरासन्निधीं सर्व काळ ॥ जनीं काननीं घालवी नित्य काळ ॥
तया सद्गुरूचें नाम कल्याणराशी ॥ नमस्कार० ॥६॥
श्रमोनी गुरूपाशिं तो म्लेच्छ आला ॥ तया स्फोटरोगांतुनी मुक्त केला ॥
कृपेनें तसें स्वामि पाळीं आम्हांसी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥७॥
सती अनुसूया सूधी आदिमाता ॥ त्रयीमूर्ति ध्यानीं मनीं नित्य गातां ॥
हरे रोगपीडा दरिद्रासि नाशी ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥८॥
करोनी मनीं निश्चयो अष्टकाचा ॥ जनांनो करा पाठ दत्तस्तुतीचा ॥
करी माधवाच्या सुता दासदासीं ॥ नमस्कार हा स्वामि दत्तात्रयासी ॥९॥
इति श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्रं संपूर्णम् ॥