१
तीन शिरें सहा हात । तया माझा दंडवत ॥१॥
कांखे झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥
माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हातीं । पायी खडावा गर्जती ॥४॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥
२
नमन माझें गुरुराया । महाराजा दत्रात्रेया ॥१॥
तुझी अवधूत मूर्ति । माझ्या जीवाची विश्रांति ॥२॥
जीवीचें सांकडे । कोण उगवील कोडे ॥३॥
अनुसूयासुता । तुका म्हणे पाव आतां ॥४॥
३
दत्त दत्त म्हणतां नित्य । नामें करी गुणातीत ॥१॥
दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाळा ॥२॥
दत्त दत्त वाणीं । दत्तरूपी होय प्राणी ॥३॥
दत्तनामाचा छंद । नामे प्रगटे परमानंद ॥४॥
एका जनार्दनीं दत्त । अवघा स्वानंदभरित ॥५॥
४
माझी देवपुजा देवपुजा । पाय तुझे गुरुराजा ॥ध्रु०॥
गुरुचरणाची माती । तेचि माझी भागीरथी ॥१॥
गुरुचरणाचा बिंदु । तोचि माझा क्षीरसिंधु ॥२॥
गुरुचरणाचें ध्यान । तेंचि माझें संध्यास्नान ॥३॥
शिवदिन कंसरीपायी । सद्गुरुवांचुनि दैवत नाहीं ॥४॥