पद १ लें.
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवीं आतां ॥ध्रु०॥
तूं केवळ माता जनिता सर्वथा तूं हितकर्ता ॥
तूं आप्त स्वजन भ्राता सर्वथा तूंची त्राता ॥चाल०॥
भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता ॥
तुजवांचुनि न दुजी वार्ता, तूं आर्ताम आश्रय दत्ता ॥शांत हो०॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा जरि दंडा धरिसि यथार्था ॥
तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा ॥चा०॥
तूं तथापि दंडिसि देवा । कोणाचा मग करुं धांवा ॥
सोडवितां दुसरा तेंव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ? ॥शांत हो०॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्हीं पापी ॥
पुनरपि ही चुकतां तथापि, आम्हांवरि न ज संतापीं ॥चा०॥
गच्छतः स्वलनं क्वापि, असें मानुनि नच हो कोपी ॥
निजकृपा लेशा ओपी, आम्हांवरि तूं भगवंता ॥शांत०॥३॥
तव पदरीं असतां ताता, आडमार्गीं पाउल पडतां ॥
सांभाळुनि मार्गावरता आणिता न दूजा त्राता ॥चा०॥
निज बिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता ॥
वळे आतां आह्मांवरता । करुणाधन तूं गुरुनाथा ॥शांत०॥४॥
सहकुटुंब सह परिवार, दास आम्ह्यीं हे घरदार ॥
तव पदीं अर्पुं असार, संसाराहित हा भार ॥चा०॥
परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो ॥
आम्हां अधलेश न बाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता ॥शांत०॥५॥
पद २ रें.
श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करीं आतां ॥ध्रु०॥
चोरें द्विजासी मारितां मन जें । कळकळलें तें कळकळो आतां ॥१॥
पोटशुळानें द्विज तडफडतां । कळकळलें तें कळकळो आतां ॥२॥
द्विजसुत मरतां वळलें तें मन । हो कीं उदासीन न वळे आतां ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां । वळलें तें मन न वळे कीं आतां ॥४॥
श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता । कोमल चित्ता वळवीं आतां ॥५॥
पद ३ रें.
जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ध्रु०॥
निज अपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरुं पावन ॥१॥
तुं करुणाकर कधीं आम्हांवर । रुससी न किंकर-वरद कृपाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोप लेश न वामन॥३॥
बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवीं भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥