१
भवतारक या तुझ्या पादुका वंदिन मी माथां । करावी कृपा गुरूनाथा ॥धृ०॥
बहु अनिवार हें मन माझें चरणीं स्थिर व्हावें । तव पदभजनी लागावें ॥
कामक्रोधादिक हे षड्रिपु समूळ छेदावे । हेंचि मागणें मला द्यावें ॥ चला ॥
अघहरणा करिं करुणा दत्ता धांव पाव आतां । करावी कृपा गुरूनाथा ॥१॥
तूंचि ब्रह्मा तूंचि विष्णु तूंचि उमाकांत । तूची समग्र दैवत ॥ माता पिता इष्ट बंधू तूंचि गणगोत ।
तूंचि माझें सकळ तीर्थ ॥ चाल ॥ तुजविण मी गा कांहिंच नेणें तूंची कर्ता हर्ता । करावी कृपा गुरूनाथा ॥२॥
तनमनधन हें सर्व अर्पुनी कुरवंडिन काया । उपेक्षूं नको गुरूराया ॥ कर्महीन मी, मतीहीन मी, सकळ श्रम वायां ॥
लज्जा राखीं गुरु सदया ॥ चाल ॥ मातृबालकापरि सांभाळीं तूंचि मुक्तिदाता । करावी कृपा गुरूनाथा ॥३॥
शेषा ब्रह्मया वेदां न कळे महिमा तव थोर । तेथें मी काय पामर ॥ वियोग नसुं दे तव चरणांचा हाचि देई वर ।
शिरीं या ठेवीं अभकर ॥ चाल ॥ हीच विनंती दर्शन द्यावें दासा रघुनाथा । करावी कृपा गुरूनाथा ॥४॥
२
श्रीगुरूचे चरणकंज हृदयीं स्मरावे ॥ध्रु०॥
निगमनिखिलसाधारण सुलभाहुनि सुलभ बहू । इतर योग योगविषयपंथिं कां शिरावें ? ॥१॥
नरतनुदृढनावेसी बुडवुनि अतिमूढपणें । दुष्ट नष्ट कुकर-सुकरतनु कां फिरावें ? ॥२॥
रामदास विनवी तुज अजुनि तरी समज उमज । विषयवीष पिउनियां फुकट कां मरावें ? ॥३॥
३
श्रीगुरुमहाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू ॥ध्रु०॥
चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू । जय०॥१॥
रूप जयाचें मन-बुद्धीपर वाचे अगोचरू । जय० ॥२॥
अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू । जय० ॥३॥
बद्ध मुमुक्षू साधक शरणागता वज्रपंजरू । गुरू० ॥४॥
आत्मारामीं रामदास गोपाल करुणाकरू । गुरू० ॥५॥
४
झाल्यें बाई ! वेडी । दरबार गुरूचा झाडीं ॥ध्रु०॥
देहपीतांबर फाडिला । नवरत्नांचा हार काढिला । सद्गुरूचे गळां घातला । वासना सोडीं ॥ दरबार० ॥१॥
कल्पनाकाचोळी काढिली । त्रिगुणांची वेणी सोडिली । चारि देहांची मुक्ति साधिली । परी ती थोडी ॥ दर० ॥२॥
वेडी झाल्यें सद्गुरुघरची । चिंता हरपली मनाची । सोय दाखविलि स्वसरूपाची । लागली गोडी ॥ दर० ॥३॥
चिन्मयस्वरूप दाखवीलें । आपणामध्यें मेळवीलें । पूर्णानंद गुरुनें केलें । पाय न सोडीं ॥ दरबार० ॥४॥
५
तो मज आठवतो । गुरुराजा । प्राणविसांवा माझा ॥ध्रु॥
श्रवणीं पाजुनियां । अमृत । मस्तकिं ठेवुनि हस्त ॥१॥
विवेकसिंधूचीं । चिद्रत्नें । लेवविलीं मज यत्नें ॥२॥
अखंड देउनियां । स्मरणासी । द्वैतभयातें नासी ॥३॥
अक्षयप्राप्तीचा । सुखदाता । केशवकवि म्हणे आतां ॥४॥