ज्या संगतीनेंच विराग झाला ॥ मनोदरींचा जड भाग गेला ॥
साक्षात् परात्मा मज भेटवीला ॥ विसरूं कसा मी गुरुपादुकांला ॥१॥
सद्योगपंथें घरिं आणियेलें ॥ अंगेंच मातें परब्रह्म केलें ॥
प्रचंड तो बोधरवी उदेला ॥ विसरूं कसा मी गुरु० ॥२॥
चरा चरीं व्यापकता जयाची ॥ अखंड भेटी मजला तयाची ॥
परंपदीं संगम पूर्ण झाला ॥ विसरूं कसा मी गुरु० ॥३॥
जो सर्वदा गुप्त जनात वागे ॥ प्रसन्न भक्तां निजबोध सांगे ॥
सद्भक्तिभावाकरितां भुकेला ॥ विसरूं कसा० ॥४॥
अनंत माझे अपराध कोटी ॥ नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं ॥
प्रबोध करितां श्रम फार झाला ॥ विसरूं क० ॥५॥
कांहीं मला सेवनही न झालें ॥ तथापि तेणें मज उद्धरीलें ॥
आतां तरी अर्पिन प्राण त्याला ॥ विसरूं क० ॥६॥
माझ्या अहंभाव असे शरींरी ॥ तथापि तो सद्गुरु अंगिकारीं ॥
नाहीं मना अल्प विकार झाला ॥ विसरूं क० ॥७॥
आतां कसा मी उपकार फेडूं ॥ हा देह ओंवाळुनि दूर सोडूं ॥
म्यां एकभावें प्रणिपात केला ॥ विसरूं क० ॥८॥
जया वर्णितां वर्णितां वेदवाणी ॥ म्हणे नेति नेति ती लाजे दुरूनी ॥
नव्हे अंत न पार ज्याच्या रुपाला ॥ विसरूं क० ॥९॥
जो साधुच्या अंकित जीव झाला ॥ त्याचा असे भार निरंजनाला ॥
नारायणाचा भ्रम दूर केला ॥ विसरूं क० ॥१०॥
इति श्रीनारायणविरचितं गुरुपादुकाष्टकं संपूर्णम् ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥