मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दत्त उपासना|
करुणाशतक

करुणाशतक

या करूणाशतकाच्या भावविश्वात पांडुरंग व दत्तात्रेय एकाकार झाले आहेत, ज्याची रचना श्री. अनंतसुत विठ्ठल यांनी केलेली आहे.

१.

येई पांडुरंगा कृपाळू उदारा । दीनाच्या दातारा मायबापा ॥१॥

नको वेळ दावूं धावोनिया येई । कृपादृष्टी पाहीं मज दीना ॥२॥

तुझ्या भेटीसाठीं जीव कासावीस । पुरवीं तूं आस नारायणा ॥३॥

मज पामराची येऊं दे करुणा । रुक्मिणीरमणा जीवलगा ॥४॥

अनंता धांवोनी त्वरें घालि उडी । सुताची आवडी जाणूनियां ॥५॥

२.

देवा संसारीं पावलो मी शीण । यातना दारुण तडातडी ॥१॥

म्हणूनिया धांवा मांडिला केशवा । येई रमाधवा तारीं मज ॥२॥

भवाब्धि सागरीं जातसे पाहून । जळचरें दारुण तोडिताती ॥३॥

कोणी सोडविता मज येथें नाहीं । तुजवीण पाही तया सिंधु ॥४॥

अनंता दयाळा त्वरें ये धांवत । कासावीस सुत शीण पावें ॥५॥

३.

तुम्हांसी शरण जालो जीवें भावें । दीनांलागी पावें विठ्ठले तूं ॥१॥

उदारांचा राणा होसी कृपासिंधु । आणि दीनबंधु नाम तूझें ॥२॥

ऐसिया नामाची ऐकूनियां कीर्ति । शरण कमळापति जालो तूज ॥३॥

अन्यायी अपराधी पतित मी खरा । तुम्हीं दोनोद्धारा आपंगावें ॥४॥

अनंता दयाळा सुता देई भेटी । लागलीसे दिठी तुम्हांकडे ॥५॥

४.

मायबाप धणी विठ्ठल तूं होसी । तुजविण आम्हांसी कोण असे ? ॥१॥

बंधु-बहिणी आप्‍त सोयरा सांगाती । तुजविण कमळापति नाहीं दूजे ॥२॥

तूंचि गणगोत इष्टमित्र सखा । होसी पाठिराखा विठ्ठला तूं ॥३॥

विठ्ठला तूं तारु सकळ आधारु । दीनाचा दातारु प्राण विठो ॥४॥

विठ्ठला अनंता, कृपाळा गुणवंता । भेटि देई सुता आपुलिया ॥५॥

५.

भेटीसाठीं जीव पिसा । कधीं आशा पुरवीसी ॥१॥

धांव घाली ऊठाऊठीं । देई भेटी दीनांते ॥२॥

तळमळी मन । होतो प्राण घाबरा ॥३॥

मागें पुढें वाट पाहे । करुणा गा ये पुढती ॥४॥

सुत दिसे दीनवाणा । येऊं दे करुणा अनंता ॥५॥

६.

सापडलो आडचणी । किती काचणी सांगावी ? ॥१॥

कृपावंत विठ्ठराया । दावी पायां झडकरी ॥२॥

वोंगळ ते पसरले । काय जळे प्राणेंसी ॥३॥

विखाराचे बिळीं । सुख काळीं आसेना ॥४॥

अनंता हा सुत । झाला ग्रस्त सोडवी ॥५॥

७.

कृपाळु बा पांडुरंगा । भेटी देई आज सगां ॥१॥

माझें आतां समाधान । तुझ्यावीन करील कोण ? ॥२॥

होसी अनाथांचा नाथ । माझी परिसावी मात ॥३॥

माझी येऊं द्या करुणा । दीनबंधु नारायणा ॥४॥

पाहे कृपाळु अनंता । दुजा ठाव नाहीं सुता ॥५॥

८.

धुंडिता हें त्रिभुवन । नाहीं सखा तुज विण ॥१॥

सर्व सांगाती सुखाचे । कोणी नाहीं निदानीचे ॥२॥

वर्ण जाणोनी मानसीं । शरण येतो हृषीकेषी ॥३॥

पतितपावन विश्वंभरा । काय पाहसी दातारा ? ॥४॥

स्वामी कृपाळु अनंता । दुजा ठाव नाहीं सुता ॥५॥

९.

बहु पीडलो संकटीं । धाव घाली जगजेठी ॥१॥

आतां न लावा उशीर । वाट पाहे मी पामर ॥२॥

येई येई दयाघना । भेटी देई वेगीं दीना ॥३॥

चिंतानळे ग्रस्त झालो । तुज काकुळती आलो ॥४॥

काय पाहसी अनंता । धीर धरवे ना सुता ॥५॥

१०.

किती वाट पाहूं तुझिया भेटीची । करुणा दीनाची कां गा न ये ? ॥१॥

काय तुज झालें लागला उशीर । मज तो आतां धीर धरवेना ? ॥२॥

कवणीया ठायां गेला देवराया । सांडोनिया माया माझी सोय ? ॥३॥

विसर पडला माझा नारायणा । किंवा हरी कोणा भुललासी ॥४॥

अनंता दयाळा नेणवेची कांहीं । सुत चिंताडोहीं बुडलासे ॥५॥

११.

देवा पतितपावना । दीनबंधु नारायणा ।

मज अंगिकारीं दीना । विज्ञापना पायासी ॥१॥

नका उपेक्षू दीनासी । कृपा करावी हृषीकेशी ।

तुजवीण गा उदासी । दिवानिशी दयाळा ॥२॥

नको पाहूं गुणदोष । झालो चरणीचा दास ।

तोडी देवा भवपाश । करी नाश दुरिताचा ॥३॥

त्रिविध तापे मी तापलो । जीवीं बहुत पोळलो ।

तुम्हां काकुळती आलो । वायां गेलो न करी हें ॥४॥

धाव घाली रमाकांता । माझ्या कृपाळु अनंता ॥

भेटि देवोनियां सुता । नीरसी चिंता आतांचि ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP