भवभयहारक श्रीहरि । प्रणमूं वारंवार ।
जन्ममरण टाळूनि हे । करा शीघ्र भवपार ॥१॥
रेवातटवासी नमूं । वासुदेव यतिराय ।
मदनमनोहर मूर्ति ही । लागूं पुनि पुनि पाय ॥२॥
नानारुपीं तूंच तूं । नाना नामीं एक ।
भक्तजनांच्या कारणीं । धारिसी विधविध भेख ॥३॥
जन्मिलें नव्हतेंच हें । तूंच होता तधीं ।
रे ! राहिल ना हें तरी । राहशील तूं सत् चित् ॥४॥
मन बांधी मन सोडवी । मन रचना ही सर्व ।
’नाना नेह’ कथे श्रुति । एक अनेकीं शर्व ॥५॥
दत्त म्हणे कोणी तुला । रामकृष्ण अवधूत ।
दिनमणि शिवशत्त्वादि तूं । नामरुप सब जूठ ॥६॥
गंगा यमुना सरस्वती । नांवें भिन्न अनेक ।
बहुरुपी बहु नामीं या । जलस्वरुपीं एक ॥७॥
रसना नाम म्हणो सुखें । असो चित्र लक्ष्यांत ।
भवीं भव भावें मिळे । भक्त स्वयं भव होत ॥८॥
जन्म मरण त्याला नसे । स्वयं जनार्दन तोच ।
रेवा सागर संगमीं । दिसे न भेदाशौच ॥९॥
महातपस्वी योगिजन । भेदें गडबडतात ।
नानात्मैक्यज्ञानतः । ’रंग’ पार होतात ॥१०॥
दत्तदशक हें जो पढें । राखुनि लक्ष्यीं ध्यान ।
दत्तकृपा करिं त्यावरी । पावे तो निर्वाण ॥११॥
(इतिश्री दत्तपादारविंदमिलिंद श्री.पांडुरंगमहाराज (रंग अवधूत) विरचितं श्री दत्तदशकं समाप्तम् )