एकदा एक वाघूळ, काटेरी झाड आणि समुद्रपक्षी यांनी भागीदारीने व्यापार करण्याचे ठरविले. व्यापारासाठी वाघुळाने भांडवल घातले. काटेझाडाने कापड आणले आणि समुद्रपक्ष्याने पितळ आणली सगळा माल जहाजात घालून ते व्यापारास निघाले. परंतु, वाटेत प्रचंड वादळ होऊन जहाज समुद्रात बुडाले. ते तिघे मात्र मोठ्या मुष्किलीने वाचले. तेव्हापासून वाघूळ, घेणेकर्याचे तोंड चुकवत दिवसा ढोलीत बसून राहू लागले. काटेझाड आपले गेलेले कापड मिळावे म्हणून येणार्या-जाणार्यांचे कपडे फाडू लागले व समुद्रपक्षी समुद्रात सारख्या उड्या मारून आपली पितळ शोधू लागला.
तात्पर्य - एखाद्याचे मोठे नुकसान झाले असता तो ते सहसा कधी विसरत नाही.