पंचांगात सांगितल्याप्रमाणे नक्षत्र जननशांती -
तिथि, नक्षत्र, योग, करण व इतर तिथि - कृष्ण चतुर्दशी, अमावस्या, क्षयतिथि,
नक्षत्र - अश्विनीची पहिली ४८ मिनिटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेषा पूर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण, चित्राचा पूर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, ज्येष्ठा पूर्ण, मूळ पूर्ण, पूर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनिटे,
योग - वैधृति व व्यतीपात करण - विष्टि (भद्रा) इतर - ग्रहणपर्वकाल, यमल म्हणजे जुळे जन्मल्यास, सदंत, अधोमुख किंवा माता पिता भाऊ बहिण यांचे पैकी एकाचे जन्म नक्षत्रावर जन्मल्यास, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुलानंतर मुलगी जन्मल्यास, सूर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग यापैकी असेल तर शांती करावी.
धर्मसिंधुप्रमाणे जननशांती शास्त्रार्थ
१) मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर पुत्राचा जन्म झाल्यास पिता मरण पावतो. तिसर्या चरणी धननाश व चतुर्थ चरणी कुलनाश होतो. तसेच मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर पुत्रीचा जन्म झाल्यास सासरा मरण पावतो. द्वितीय चरणी सासू मरण पावते. पुढील चरणांचे फल तसेच जाणावे. म्हणून मूळ नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्म झाला असल्यास शांती करावी. ज्येष्ठा नक्षत्राच्या शेवटच्या दोन घटिका म्हणजे ९६ मिनिटे व मूळ नक्षत्राच्या सुरवातीच्या दोन घटिका म्हणजे ९६ मिनिटे या १९२ मिनिटांच्या कालावधीस अभुक्त मूळ असे म्हणतात. अभुक्त मूळ असता जन्म झाल्यास आठ वर्षे बालकास अन्यत्र ठेवावे (म्हणजेच त्याचा त्याग करावा.) व त्यानंतर त्याची शांती करावी. मूळ नक्षत्राचा दोष आठ वर्षे पर्यंत असतो. म्हणून इतका काल पर्यंत मुलाचे दर्शन वर्ज्य करावे.
२) आश्लेषा नक्षत्राच्या द्वितीय चरणी धननाश, तिसर्या चरणी मातृनाश व चतुर्थ चरणी पितृनाश. तसेच सासू-सासरे यांचा नाश या करिता आश्लेषा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्म झाला असल्यास शांती करावी.
३) ज्येष्ठा नक्षत्रावर कन्या जन्मल्यास ज्येष्ठ दिरास मारते. ज्येष्ठा नक्षत्राचे समान दहा भाग केल्यास पहिल्या भागात बालकाचा जन्म झाल्यास - मातेची आई, दुसरा भाग - आईचे वडिल मरण पावतील, तिसरा भाग - मामा मरण पावेल, चौथा भाग - मातृनाश, पाचवा भाग - स्वतः मरण पावेल, सहावा भाग - गोत्रज मरण पावतील. सातवा भाग - पिता व माता अशा दोन्ही कुलांचा नाश, आठवा भाग - ज्येष्ठ बंधु मरण पावतो, नववा भाग - सासरा मरण पावेल व दहावा भाग - सर्वांना मारतो. याकरिता ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या बालकांची शांती करावी.
टीप - म्हणून मूळ, आश्लेषा, ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची शांती करून घ्यावी.
४) चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध - पुष्य नक्षत्राचे मधले दोन चरण, पूर्वाषाढा - तिसरा चरण, उत्तरा फाल्गुनी - प्रथम चरण या नक्षत्रांवर बालकाचा जन्म झाल्यास पिता, पुत्र, भ्राता व स्वतः यांचा नाश होतो. याकरिता - अ) चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध - गोप्रसवशांति करून नक्षत्र देवतेची पूजा व अजा दान करावे.
ब) पुष्य नक्षत्राचे मधले दोन चरण - गोप्रसव शांति करून नक्षत्र देवतेची पूजा व गाईचे दान करावे.
क) पूर्वाषाढा - तिसरा चरण - नक्षत्र देवतेची पूजा व सुवर्ण दान करावे.
ड) उत्तरा फाल्गुनी प्रथम चरण - नक्षत्र देवतेची पूजा व तिलपात्र दान करावे.
५) मघा नक्षत्राच्या पहिल्या चरणात जन्म झाल्यास मूळ नक्षत्राप्रमाणे फळ जाणावे त्या ठिकाणी गोप्रसवशांती, नक्षत्र देवतेचे पूजन व ग्रहमख ही करावी. मघा नक्षत्राच्या पहिल्या १९२ मिनिटात जन्म झाला असल्यास नक्षत्र गंडातशांती करावी.
६) रेवती नक्षत्राच्या शेवटच्या १९२ मिनिटात व अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या १९२ मिनिटात जन्म झाला असल्यास नक्षत्र गंडांत शांति करावी. अन्य वेळा जन्म असेल तर शांती नाही.
७) विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी जन्म झाला असल्यास फक्त ग्रहमख करावा. नक्षत्रशांती नाही.
८) इतर सर्व नक्षत्रांच्या शांती नाहीत.
९) शांतीचा मुख्य काल - जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी अथवा जन्मनक्षत्री अथवा शुभ दिवशी शांति करावी. जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी शांति करावयाची असेल तर सांगितलेली नक्षत्रे, आहुति, अग्निचक्रे इत्यादी पहाण्याची जरूरी नाही. इतर काली शांती करावयाची असेल तर अवश्य पहावे. अग्निचक्र पंचांगात दिलेले असते. ते पहावे किंवा शु. १ पासून चालू तिथिपर्यंत तिथि मोजून येणार्या संख्येत १ मिळवावा. रविवार पासून चालू दिवसांपर्यंत दिवस मोजावेत. तो अंक मागील अंकात मिळवावा. या बेरजेस ४ ने भागून बाकी ० किंवा ३ उरल्यास अग्नि भूमीवर, २ उरल्यास पाताळी, १ उरल्यास स्वर्गलोकी अग्नि जाणावा. शांतीचे दिवशी अग्नि भुमीवर असावा. आहुति पाहण्याचा प्रकार असा - सूर्यनक्षत्रापासून आरंभ करून चंद नक्षत्रापर्यंत नक्षत्रे मोजावीत. ३ ३ नक्षत्रे मिळून एक ग्रहाचे मुखी आहुति पडते. पहिल्या ३ नक्षत्री सूर्याचे मुखी, दुसर्या ३ नक्षत्री बुधाचे मुखी, तिसर्या ३ नक्षत्री शुक्राचे मुखी, चौथ्या ३ नक्षत्री शनीचे मुखी, पाचव्या ३ नक्षत्री चंद्राचे मुखी, सहाव्या ३ नक्षत्री मंगळाचे मुखी, सातव्या ३ नक्षत्री गुरूचे मुखी, आठव्या ३ नक्षत्री राहूचे मुखी, नवव्या ३ नक्षत्री केतूचे मुखी आहुति जाणावी. ज्या दिवशी शुभ ग्रहाचे मुखी आहुति पडते तो दिवस शुभ व पापग्रहाचे मुखी आहुति असेल तर तो अशुभ दिवस मानावा.
संस्कार, नित्यकर्म, काही निमित्ताने करावयाची नैमित्तिक कर्मे व रोगाने पीडित असताना करावयाची कर्मे असतील तर अग्निचक्र पहावयास नको.
शांतीकर्मामध्ये अग्निचक्र अवश्य पहावे.
तीन उत्तरा, रोहिणी, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पुनर्वसु, स्वाती, मघा, अश्विनी, हस्त, पुष्य, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे असताना, आणि गुरुशुक्राचा अस्त नसताना व मलमास नसेल तर तो दिवस शुभ मानावा.