तीन माचवीं चार गाते त्यावर निजलें होतें । रामनामीं मिळुन गेलें खाटलें पडलें रितें ॥१॥
सौरी झालें बाई । नाहिं त्याचे पायीं ॥ध्रु०॥
होउनि वेडी घालित फुगडी गेलें राउळांत । मला पाहुन देव भ्याला नाहिं देउळांत ॥२॥
होउनि वेडी फाडित लुगडीं आळोआळी नाचे । मागें पुढें रुंदावलें झालें गणोबाचें ॥३॥
तुका म्हणे सौरी झालें दादला मला भ्याला । संग नसतां पोरें झाली काय सांगूं तुला ॥४॥