जग सगळे बनले रणकुण्डच भीषण
पातला काय प्रळयाचा निकट क्षण !
लक्षावधि पडती जीवांच्या आहुती
नररुधिराच्या खळखळा नद्या वाहती !
मानवते, का तू बडवुनि घेशी उर ?
उलटले तुझ्यावर तुझेच भस्मासुर
जी दिलीस भौतिक शास्त्रांची खेळणी
त्यांचिया करी, ती शस्त्रे झाली रणी !
संहार होत जो आज पुरा होउद्या
शांतीची किरणे दिसणारच ती उद्या
परतंत्र भारता, शस्त्रहीन तू पण
तव कवण महात्मा करील संरक्षण ?
भडकली आग कुणिकडे ! तयाची धग----
लागून इथे करि जीव कसा तगमग !
भाजला भयानक कोलाहल अंतरी
मी दूर दूर भटकलो पिसाटापरी !
शेवटी गाठिली घारकडयाची दरी
विमनस्क बैसलो एका दरडीवरी
संध्येची होती सौम्य उन्हे पांगली
अन् घारकडयाची दीर्घ पडे साउली
त्या सावलीत लाकडी जुना नांगर
कुणि हाकित होता बळिराजा हलधर
खांद्यावर आसुड, हालवीत खुळखुळा
घालीत तास तो सावकाश चालला
फोडीत ढेकळे फाळ जसा तो फिरे
बैलांच्या नावे गीत तयाचे स्फुरे
त्या श्रमिगीतातिल आशय का समजला ?
’पिकवीनच येथे मी मोत्यांचा मळा !’
तुम्हि याला भोळा खुळा अडाणी म्हणा
तुम्हि हसा बघुनि या दरिद्रनारायणा !
बळराम आणि बळिराजा यांच्या पुन्हा
मज याचे ठायी दिसल्या काही खुणा
हा स्वयंतुष्ट करि जगताचे पोषण
होऊन ’हलायुध’ करितो पण रक्षण
जरि भोळा, याच्या औदार्याची सरी
येणार न कोणा कुबेरासही परी
जाहला कशाचा गर्व तरी आपण ?
की ओळखल्या सृष्टीच्या खाणाखुणा ?
सृष्टीची कोडी सोडविता शेवटी
छांदिष्ट बंधुंनो, भ्रमिष्ट झाली मती
त्या भयासुराची दावुनि कारागिरी
तुम्हि मानवतेची फसगत केली खरी !
किति तुम्हांस कुरवाळुनी लाविला लळा
पण आपण भाऊ कापू सजलो गळा
एकान्त शांत शेतात पहा हलधर
हा ध्येयनिष्ठ हाकितो कसा नांगर !
हा दिसे दरिद्री, चिंध्या अंगावरी
गरिबांस घालितो खाऊ पण भाकरी
गंभीर, धीर हा स्थितप्रज्ञ का ऋषी !
मानिलें ध्येय, कर्तव्य एक की ’कृषि’
घारीपरि घाली विमान घिरटया वर
ये ऐकू याला त्याची नच घरघर !
ते बाँम्ब घटोत्कचनाशक शक्तीसम
पण स्फोट व्हावया ठरले ते अक्षम
रणगाडयांचा ये ऐकू नच गोंधळ
घनगर्ज गर्जती तोफा-हा निश्चळ !
त्या रणनौका, ते छत्रीधर सैनिक
ते पाणतीर, काही न तया ठाउक
या संहाराचा प्रेरक अग्रेसर
त्या माहित नाही कोण असे हिटलर !
क्रांतीची त्याने कदर न केली कधी
काळासहि त्याने जुमानले नच कधी
ही युद्धे म्हणजे घटकेची वादळे
का नांगर याचा थांबणार त्यामुळे !
लोटली युगे किति, तो ग थांबला कधी
येतील युगे किति, थांबेल न तो कधी
होतील नष्ट शस्त्रास्त्रे केव्हातरी
हा अखंड, अक्षय, अभंग नांगर परी !
जो जगन्नियंता विश्वंभर ईश्वर
धनधान्ये करितो समृद्ध जग सुंदर
हे पवित्र त्याचे प्रतीक हा ’नांगर’
वंदितो त्यास जो बळिराजा हलधर !