झिरुन सिकताकणांपरिस जाति आयुःक्षण
हळूहळु म्हणून हा डळमळे पहा हृत्तट
हुरुप नच राहिला, मतिहि जाहली अस्थिर
निरर्थक विचारितो निज मना, ’करु काय मी ?’
हिमाद्रि-शिखराहुनी अधिक उंच मद्ध्येय, ती---
जिवा सतत ओढणी गगनिच्या पतंगापरी
जिणे अजुनि पायथ्यावरिच राहुनी कंठितो
वरी नजर टाकिता नयन जाति हे फाटुनी !
विशाल दिसती उभे किति पहाड माझ्यापुढे
चढून अवघी मला चढण थेट जाणे असे
प्रवासपथ पाहुनी बिकट, वृत्ति हो कंठित
इथून मम जीव हा तळमळे समुत्कंठित !
उडून दिन चालले तरल या अवस्थेमधे
कसे न अजुनी पडे प्रगतिचे पुढे पाउल ?
वृथा बघत अंबरी निघुन आयु जाणार का ?
मनोरचित वैभवे विफल हाय ! होणार का ?
अशी अहह ! दुर्दशा बघु नकोस गे शारदे
तुझाच वसती करी नव ’निसर्ग’ ध्येयावर
क्षणात मज पोचवी बसवुनी तुझ्या वाहनी
सवे सुभग घेत मी कवनदेहिनी नंदिनी !
प्रभाव मग तू पहा जननि, तेथ जाताक्षणी
वसंत फुलवील ती रुचिर दिव्य आलापिनी
बघून नव वैभवा मग हवेतल्या देवता
’अहो नवल !’ बोलुनी तुकवितील माना निज
अदृश्य किमयांसवे उतरतील त्या खालती
सहर्ष कवितेत मी प्रगटवीन त्या अद्भुत
अनेक किमया सुधोपम मिळून गंगानदी
प्रसन्न, मधु गायिका सरस वाहु लागेल ती !
प्रवाह मग मी तिचा वरुनि खालती आणिन !
म्हणेल अवघे जगत्, ’अवतरे महाकाव्य हे !’
भगीरथ उभा असे जननि गे, परी प्रश्न हा
प्रवाह शिरि झेलुनी धरिल कोण गंगाधर ?
चमत्कृति करीन मी सकल उच्च ध्येयावर
भुईवरति रांगुनी अधिक पांगला होइन
त्वरा करुनि पोचवी मजसि शारदे, कारण
झिरुन सिकताकणांपरिस जाति आयुःक्षण !