मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पाचवा|
आरंभ

एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥

ओं नमो सद्गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा ।

मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥१॥

अवचटें मागतयासी । जैं भेटी होय तुजसी ।

तैं घोट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जीवें त्यातें ॥२॥

जे जे मागों येती तुजपासीं । ते बांधोन ऐक्यतेमाजीं सूदसी ।

शेखीं त्यांचे सोडवणेसी । भेटी दुसर्‍यासी स्वप्नींही नव्हे ॥३॥

अणुमात्र तुझी प्राप्ती । अवचटें चढे ज्याचे हातीं ।

त्याचिये संसारसंपत्ती । सर्वस्वें निश्चितीं नाडिसी तूं ॥४॥

मैंदाचा विडा घेतां । तो प्रवर्ते आपुले घाता ।

तेवीं तुझी प्रसन्नता । झालिया जीविता स्वयें नाशी ॥५॥

जे जे तुजपें मागों आले । ते ते सर्वस्वें नागवले ।

शेखीं नागवे तुवां केले । निर्लज्ज झाले तिहीं लोकीं ॥६॥

ऐशी तुझी निर्वाणगती । त्या तुझी उदार कीर्ती ।

घडे म्हणशी कैशा रीतीं । ते अगाध स्थिति अवधारीं ॥७॥

मागें उदार वाखाणिले । तेही आपणियांऐसे केले ।

मग सर्वस्व आपुलें । दान दिधलें दातृत्वें ॥८॥

षड्गुणैश्र्वर्यवैभवेंसीं । आपणियातें दाना देसी ।

दिधलें तें घेवों नेणसी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥९॥

आपणियां दिधलें दान । यालागीं तूं दासां अधीन ।

मग त्यांचेनि छंदें जाण । सर्वस्वें आपण नाचसी ॥१०॥

बळीनें सर्वस्व केलें दान । शेखीं तूं झालासि त्याअधीन ।

त्याचें द्वारपाळपण । अद्यापि आपण चालविसी ॥११॥

धर्में अर्पिलें अग्रपूजेसी । शेखीं तूं त्याची सेवा करिसी ।

नाना संकटें स्वयें सोशिसी । अंगें काढिसी उच्छिष्टें ॥१२॥

तुझा निजभक्तु अंबऋषी । त्याचे गर्भवास तूं सोशिसी ।

तुज गौळिये राखिती हृषीकेशी । शेखीं त्या गोपाळांसी रक्षिलें ॥१३॥

एवं स्वस्वरूप द्यावयासी । उदारत्व तुजपासीं ।

हें न ये गा आणिकांसी । हृषीकेशी कृपाळुवा ॥१४॥

तो तूं परम उदार ऐसा । राया रंका समभावें सरिसा ।

भावो तेथ भरंवसा । तूं आपैसा आतुडसी ॥१५॥

त्या तुझिया प्राप्तीलागीं । कपाटें सदा सेविती योगी ।

एक ते झाले भोगविरागी । एक ते त्यागी सर्वस्वें ॥१६॥

एक हिंडती दशदिशे । एक तुजलागीं झाले पिसे ।

परी तुझी भेटी स्वप्नींही दिसे । ऐसा न दिसे क्षण एक ॥१७॥

ऐशियाही तुझी प्राप्ती । सुलभ असे एके रीतीं ।

जरी संतचरणीं रंगती । अतिप्रीतीं सप्रेम ॥१८॥

संतचरणीं जो विनटला । तो निजप्राप्तीसी पावला ।

संतस्वरूपें अवतरला । स्वयें संचला परमात्मा ॥१९॥

यालागीं जीं जीं संतांचीं रूपें । तीं तीं श्रीहरीचीं स्वरूपें ।

म्हणौनि संतांचिये कृपे । अतिसाक्षेपें अर्जावें ॥२०॥

ते ज्ञानार्थाचे परम पिसे । यालागीं ग्रंथाचेनि मिसें ।

त्यांचे चरण अनायासें । सावकाशें वंदीन ॥२१॥

संतकरुणावलोकन । तें मज नेत्रींचें अंजन ।

चरणकृपा पाहतां जाण । श्रीजनार्दन प्रकाशे ॥२२॥

तया जनार्दनाचिये सेवे । गुरुत्वाचेनि आडनांवें ।

रिघालों निजस्वभावें । जीवेंभावें भजनासी ॥२३॥

भज्य-भजक-भजना । एके अंगीं त्रिविध भावना ।

दावूनियां जगज्जीवना । जनीं जनार्दना निजभक्ती ॥२४॥

हे अभेदभक्ती चोखडी । परम ऐक्यें भजनगोडी ।

अधिकाधिक चढोवढी । वाढे आवडी निजभक्तां ॥२५॥

देवो आपली सर्वस्वजोडी । वेंची भक्तांचिये वोढी ।

ऐशी अभेदभक्तीची गोडी । पढिये गाढी गोविंदा ॥२६॥

यालागीं भक्तांचा शरीरभार । स्वयें वागवी श्रीधर ।

आपुलेनि अंगें परपार । पाववी साचार निजभक्तां ॥२७॥

'निजभक्तांचा' देहभावो । निजांगें वागवी देवाधिदेवो ।

तरी अभक्तांचा देहो । वागवावया पहा हो काय आन आहे ' ॥२८॥

भक्तां नाहीं देह‍अहंता । यालागीं देवो वागविता ।

पूर्ण देहाभिमान अभक्तां । त्यांसी अतिबध्दता या हेतू ॥२९॥

यालागीं जो निरभिमान । तोचि भगवद्भक्त संपूर्ण ।

ज्याच्या अंगीं देहाभिमान । त्यासी भक्तपण कदा न घडे ॥३०॥

निजभक्त तारितां कौतुकें । त्याची रोमावळी केवीं दुखे ।

निर्भय करोनि पूर्ण हरिखें । देवो निजमुखें निजभक्तां तारी ॥३१॥

यालागीं निरभिमानता । जे विनटले भक्तिपंथा ।

ते पावो देवोनि विघ्नांचे माथां । पावती तत्त्वतां भगवत्पद ॥३२॥;

भक्तांची ऐशी स्थिती । तरी अभक्तां कवण गती ।

तेचिं पुसावया नृपती । प्रश्र्नार्थी प्रवर्ते ॥३३॥

पंचमामाजीं निरूपण । अभक्तांची गति लक्षण ।

युगीं युगीं पूजाविधान । सांगेल पावन हरीचें ॥३४॥

अवतारचरितपुरुषार्थु । सांगोन संपला चतुर्थु ।;

आतां अभक्तांचा वृत्तांतु । राजा पुसतु मुनीसी ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP