मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पाचवा|
श्लोक ३२ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


कृष्णवर्णं त्विषा कृष्णं, साङगोपाङगास्त्रपार्षदम् ।

यज्ञैः संकीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः ॥३२॥

कलियुगीं श्रीकृष्णदेवो । वर्णूं कृष्णवर्णप्रभावो ।

प्रभा इंद्रनीळकीळ-समुदावो । मूर्ती तशी पहा हो शोभायमान ॥४२॥

मूर्ति सर्वावयवीं साङग । वेणुविषाणादि उपांग ।

चारी भुजा पराक्रमी चांग । आयुधें अव्यंग शंखचक्रादिक ॥४३॥

पृष्ठभागीं निजपार्षद । नंदसुनंदादि सायुध ।

कलियुगीं प्रज्ञाप्रबुद्ध । यापरी गोविंद चिंतिती सदा ॥४४॥

मधुपर्कादिक विधान । साङग केलें जें पूजन ।

तेंही मानोनियां गौण । आवडे कीर्तन कलियुगीं कृष्णा ॥४५॥

नवल कैसें राजाधिराजा । कीर्तन तेचि महापूजा ।

ऐशी आवडी अधोक्षजा । कीर्तनें गरुडध्वजा उल्हासु सदा ॥४६॥

कीर्तन पढियें गोविंदा । यालागीं सन्मानी नारदा ।

तो कृष्णकीर्ती पढे सदा । नामानुवादा गर्जतु ॥४७॥

कीर्तन करितां नामानुवाद । संकटीं रक्षिला प्रल्हाद ।

कीर्तनें तुष्टे गोविंद । छेदी भवबंध दासांचा ॥४८॥

गजेंद्रें नामस्मरण । करितां पावला नारायण ।

त्याचें तोडोनि भवबंधन । निजधामा आपण स्वयें नेला ॥४९॥

अधमाधम अतिवोखटी । तोंडा रामु आला अवचटीं ।

ते गणिका कीं वैकुंठीं । कृष्णें नामासाठीं सरती केली ॥३५०॥

महादोषांचा मरगळा । अतिनष्ट अजामेळा ।

तोही नामें निर्मळ केला । प्रतापु आगळा नामाचा ॥५१॥

नामें विनटली गोविंदीं । ते संकटीं राखिली द्रौपदी ।

नाम तोडी आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी दासांची ॥५२॥

अंतरशुद्धीचें कारण । मुख्यत्वें हरिकीर्तन ।

नामापरतें साधन । सर्वथा आन असेना ॥५३॥

कीर्तनीं हरीची आवडी कैशी । वत्सालागीं धेनु जैशी ।

कां न विसंबे जेवीं माशी । मोहळासी क्षणार्ध ॥५४॥

तेवीं नाम स्मरतया भक्ता । अतिशयें आवडी अच्युता ।

दासांची अणुमात्र अवस्था । निजांगें सर्वथा निवारी स्वयें ॥५५॥

यालागी हरिकीर्तनीं गोडी । जयासी लागली धडफुडी ।

त्यासी नाना साधनांच्या वोढी । सोसावया सांकडीं कारण नाहीं ॥५६॥

ज्यासी कीर्तनीं कथाकथनीं । चौगुण आल्हाद उपजे मनीं ।

तो उद्धरला सर्व साधनीं । पवित्र अवनी त्याचेनी ॥५७॥

एकचि जरी नाम वाचे । सदा वसे श्रीरामाचें ।

तरी पर्वत छेदोनि पापाचे । परमानंदाचें निजसुख पावे ॥५८॥

आवडीं करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे श्रीजनार्दन ।

त्याहोनि श्रेष्ठ साधन । सर्वथा आन असेना ॥५९॥

थोर कीर्तनाचें सुख । निष्ठा तुष्टे यदुनायक ।

कीर्तनें तरले असंख्य । साबडे लोक हरिनामें ॥३६०॥

यालागीं कीर्तनाहूनि थोर । आन साधन नाहीं सधर ।

मा कवण हेतू पामर । कीर्तन नर निंदिती ॥६१॥

एवं नामकीर्तनीं विमुख । ते स्वप्नींही न देखती सुख ।

कीर्तनद्वेषें मूर्ख । अतिदुःख भोगिती ॥६२॥

ज्यांचे हृदयीं द्वेषसंचार । जळो जळो त्याचा आचार ।

सर्व काळ द्वेषी नर । दुःख दुस्तर भोगिती ॥६३॥

कलियुगीं जे बुद्धिमंत । ते नामकीर्तनीं सदा निरत ।

गौरवूनि नाम स्मरत । हर्षयुक्त सप्रेम ॥६४॥;

नाना अवतार अतिगहन । त्यांत श्रीराम कां भगवान् कृष्ण ।

यांचें चरित्र अतिपावन । त्यांचें चरणवंदन सांगत ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP