श्रिया विभूत्याऽभिजनेन विद्यया, त्यागेन रूपेण बलेन कर्मणा ।
जातस्मयेनान्धधियः सहेश्वरान्, सतोऽवमन्यन्ति हरिप्रियान् खलाः ॥९॥
यापरी वर्ततां स्थिती । त्याहीवरी झालिया संपत्ती ।
तैं गर्वाचा भद्रजाती । तैशिया उन्नतीं डुलों लागे ॥४९॥
कां लेंडिये आला लोंढा । वाहवी वाळलिया लेंडा ।
कां मर्कटाचिया तोंडा । मदिरेचा भांडा सांपडे जैसा ॥१५०॥
तैसा मी एकु ज्ञाता फुडा । म्हणौनि नाचे तडतडां ।
सज्ञान आम्हांपुढां । कवण बापुडा आन आहे ॥५१॥
ऐशियाहीवरी अदृष्टता । रत्नें मोतिलगा वस्तुजाता ।
गजवाजिनृयानप्राप्तता । तेणें गर्वें इंद्रमाथां मोचे फेडी ॥५२॥
यज्ञीं यागस्वाहाकारीं । इंद्र आमुची आशा करी ।
त्याची आम्हांहूनि थोरी । कैशापरी मानावी ॥५३॥
मग शिष्य-सुहृत्-सज्जनीं । परिवारिल्या सेवकजनीं ।
मजसमान त्रिभुवनीं । समर्थ कोणी असेना ॥५४॥
जैशी कां कांटीभोंवतीं हरळी । तैशी शिष्यांची मांदियाळी ।
ते महिमेच्या गर्वमेळीं । मानी पायांतळीं ध्रुवमंडळ ॥५५॥
जैसें विंचुवा विष थोडें । परी प्रबळ वेदनेसी चढे ।
तेवीं विद्या थोडी परी गाढें । गर्वाचें फुडें अतिभरितें ॥५६॥
तो अज्ञानामाजीं सर्वज्ञता । मिरवी आपुली योग्यता ।
जेवीं अंधारीं खद्योता । सतेजता झगमगी ॥५७॥
अल्पज्ञाता विद्येसाठीं । वाचस्पती नाणी दृष्टीं ।
जेवीं मुंगी पांखासाठीं । गरुडाचे पृष्ठीं पाय देवों पाहे ॥५८॥;
निखळ तांबियाचें नाणें । देवों रिघे दामोक्यायेसणें ।
तेणें आपुलेनि दातेपणें । मानी ठेंगणें बळीतें ॥५९॥
कर्ण दातृत्वें मानिजे फुडा । तोही न मांडे आम्हांपुढां ।
प्रत्यहीं भारसुवर्णहुडा । उपजे, तेणें गाढा दाता कर्णु ॥१६०॥
आम्ही निजार्जितें वित्तें । दान देवों सत्पात्रातें ।
मा दातृत्वें कर्णातें । विशेषु येथें तो कायी ॥६१॥
सदा अपकारुचि जोडे । त्यासीही अल्प उपकारु घडे ।
इतुकियासाठीं न उकल पडे । सर्वस्व रोकडें बुडवी-सदा ॥६२॥
एवं अल्प दानासाठीं । दातृत्वाचे त्रिकुटीं ।
मेघाच्यापरी अतिउद्भटीं । स्वमुखें उठी गर्जतु ॥६३॥;
बरवेपणाचेनि पांगें । मदनासी विटावों लागे ।
सौंदर्य माझेनि अंगें । दुजें मजजोगें असेना ॥६४॥
कीं कावळा बरवेपणासाठीं । राजहंसा नाणी दिठीं ।
कां आस्वली मानी पोटीं । मीही गोमटी सीतेपरीस ॥६५॥
तेवीं बरवेपणाचा जाण । थोर चढे देहाभिमान ।
जेवीं देखोनि हिरवें रान । म्हैसा संपूर्ण उन्मादे ॥६६॥;
यावरी कांहीं एक पराक्रम । केलिया न मानी तीनही राम ।
जेवीं गोग्रहणीं संग्राम । शौर्यधर्म उत्तराचा ॥६७॥
कां अंगींचेनि माजें । रानसोरु न मानी दुजें ।
तैसा बळाचेनि फुंजें । स्वयें गर्जे मुसमुसितु ॥६८॥;
ते आधींच म्हणविती सज्ञान । त्याहीवरी 'याज्ञिक' हें महिमान ।
तें याज्ञिक कर्माचरण । दाविती आपण लोकांप्रती ॥६९॥
आलिया धनिक जनांप्रती । आपुली स्तविती कर्मस्थिती ।
मग कर्ममुद्रा नानायुक्ती । स्वयें दाविती लौकिका ॥१७०॥
ऐशियाही कर्माचारा । ज्ञातृत्वाचा गर्व पुरा ।
जेवीं दिवाभीतु अंधारा । निघे बाहेरा घुंघातु ॥७१॥
अजांचें लेंडोरें पेटे । तेथ ज्योतिज्वाळा कदा नुमटे ।
परी धुरकटलें धुपधुपी मोठें । धुवें थिकटे दिग्मंडळ ॥७२॥
यापरी नाना दंभोपाधीं । अतिगर्वाच्या उन्मादीं ।
अंध जाहली सद्बुद्धी । तो साधूतें निंदी हरिहरांसहित ॥७३॥
जेवीं दाटलेनि काविळें । दृष्टीतें करी पिंवळें ।
मग देखों लागे सकळें । आचूडमूळें पीतवर्ण ॥७४॥
तेवीं निंदोपाधी अतिगर्वीं । मंद जाहली प्रज्ञाछवी ।
मग निर्दुष्टीं दोष लावी । शुद्धातें भावी अतिमलिन ॥७५॥
जो योगियांच्या मुगुटीं । ज्यातें म्हणती धूर्जटी ।
त्याची पाहतां राहाटी । दिसे शेवटीं अतिमंद ॥७६॥
रागें उमा घेतली आगी । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी ।
सकामु तरी मोहिनीलागीं । नग्न लागवेगीं पाठीं लागे ॥७७॥
विष्णु सदाचा कपटी । कांहीं न देखों शुध्द दृष्टीं ।
वृंदा पतिव्रता गोमटी । तेणें केली शेवटीं व्यभिचारिणी ॥७८॥
जेथ विष्णु व्यभिचारवासी । ते वृंदेच्या वृंदावनापाशीं ।
जट्याळ गांठ्याळ मिळती राशी । केवीं साधुत्व त्यांसी मानूं आम्ही ॥७९॥
साधु मानूं सनत्कुमार । त्यांसीही वैकुंठीं क्रोध थोर ।
शब्दासाठीं हरिकिंकर । जयविजय वीर शापिले ॥१८०॥
श्रेष्ठ मानूं चतुरानन । तोही निलागचि हीन ।
उमा नोवरी देखोन । म्हणतां 'सावधान' वीर्य द्रवलें ॥८१॥
नारद ब्रह्मचारी निजांगें । तोही कृष्णदारा स्वयें मागे ।
तो कृष्णें ठकविला तत्प्रसंगें । साठी पुत्र वेगें स्त्रानीं व्याला ॥८२॥
ज्यातें म्हणती सत्य 'धर्म' । तोही केवळ अधर्म ।
गोत्रवधाचा संभ्रम । हा पूर्ण अधर्म धर्मासी ॥८३॥
व्यास तरी तो जारपुत्र । तेणेंचि कर्में पराशर ।
द्वेषिया वसिष्ठ-विश्र्वामित्र । अतिमत्सर परस्परें ॥८४॥
साधु म्हणों दुर्वास ऋषी । तो छळूं गेला अंबरीषासी ।
पितृद्रोह प्रल्हादासी । साधुत्व त्यासी केवीं मानूं ॥८५॥
एवं वाखाणिले पुराणीं । तेही साचे न मानती मनीं ।
मा आतांचे वर्तमानीं । साधु कोणी असेना ॥८६॥
ऐकोनियां अचाट गोष्टी । येरें धांवती येरांपाठीं ।
एक करिती तोंडपिटी । अतिचावटी उदरार्थ ॥८७॥
एक मुद्रावंत आसनीं । एक बसती बकध्यानी ।
परी सत्य माने मनीं । ऐसा साधु कोणी असेना ॥८८॥
ऐशी आपुलियाचि युक्तीं । साक्षेपें साधूंतें निंदिती ।
साधु असती हे वस्ती । अणुमात्र चित्तीं असेना ॥८९॥
जे जे हरीचे पढियंते । ते ते नावडती तयांतें ।
जेवीं दाखवितां दर्पणातें । क्षोभे निजचित्तें निर्नासिक ॥१९०॥
ज्या ईश्र्वराचेनि वर्तिजती । तो ईश्र्वरु आहे हें न मानिती ।
तो ईश्र्वर आहे कोणे स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन राया ॥९१॥