एत आत्महनोऽशान्ता अज्ञाने ज्ञानमानिनः ।
सीदन्त्यकृतकृत्या वै कालध्वस्तमनोरथाः ॥१७॥
काम क्रोधी अतिअद्भुत । क्रूरकर्मी जे अशांत ।
तिहीं आपआपणिया अनहित । निजात्मघात जोडिला ॥८८॥
स्वयें कर्म करिती अविधी । तेचि म्हणती शुद्ध विधी ।
अज्ञान तेंचि प्रतिपादी । ज्ञान त्रिशुद्धी म्हणोनियां ॥८९॥
ते काम्यकर्मीं छळिले । कां महामोहें आकळिले ।
गर्वदंभादि भेदें खिळिले । काळसर्पें गिळिले सद्बुद्धीसीं ॥२९०॥
गर्वादिज्वरितमुखें । गोडपणीं कडू ठाके ।
विषप्राय विषयसुखें । अतिहरिखें सेविती ॥९१॥
ऐशा विषयांलागीं पहाहो । आप्त मानूनि निजदेहो ।
रचूनि नाना उपावो । अर्थसंग्रहो स्वयें करिती ॥९२॥